एक पैशाची कपात सूचना ते कोकण रेल्वे…

भारताच्या लोकशाहीचा इतिहास लिहिताना राजापूर लोकसभा मतदारसंघ आणि तेथील प्रतिनिधी यांनी देशाच्या संसदेतील नियम, कायदे आणि उपलब्ध संविधानिक आयुधे यांचा बौद्धिक कसोटीच्या अत्यूच्च पातळीवरील वापर करून देशाच्या संसदेला जो अभिजात कल्पकता आणि बौद्धिक मुत्सद्दतेचा वारसा मिळवून दिला तो अत्यंत अभिमानास्पद आहे. अनेक शतके हा इतिहास पुढील पिढीसाठी त्याची नोंद घेतल्याविना पुढेच जाऊ शकणार नाही. यांतील तब्बल १५ वर्षे तीन वेळा राजापूर लोकसभेचे संसदेत प्रतिनधित्व करणारे बॅ. नाथ पै यांचा वसा फार मोठा आणि अनमोल आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉँग्रेसशी फारकत घेत समाजवादी विचारधारा प्रमाण मानत उभा राहिलेला प्रजासमाजवादी पक्षाचे युवा नेतृत्व होते बॅ. नाथ पै. युरोपियन लोकशाहीचे गाढे अअभ्यासक, विचारवंत आणि सामान्य माणसाच्या प्रश्नाशी थेट जोडलेले बॅ. नाथ पै विरोधीपक्षातून कोकणचे प्रतिनिधीत्व करत होते. असा प्रचंड विद्वान लोकप्रतिनीधी आपल्या पक्षाच्या मंत्रिमंडळात असावा, अशी इच्छा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अत्यंत सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक व्यक्त करूनही आपला विचार आणि राजकीय विचारधारा पक्ष यांच्या सोबतच एकनिष्ठ राहणारे बॅ. नाथ पै, कोकणातील कोकण रेल्वेचा प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करीत असत; मात्र विरोधीपक्षाच्या या नेत्याच्या मतांची दखल त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना घ्यावीशी वाटत नव्हती. दखल तर नाहीच परंतु सत्ताधारी नेते बॅ. नाथ पै यांच्या कोकण रेल्वे मागणीची सदैव खिल्ली उडवत, चेष्टा करत. कोकणच्या दऱ्याखोऱ्यात रेल्वे नेणे ब्रिटिश साम्राज्याला जमले नाही ते अशक्य म्हणूनच त्यांनी त्याचा विचार केला नाही, तेथे आपण डोके आपटण्यात काय हाशील आहे, असे म्हणून तो विषय नेहमी दुर्लक्षित केला जाई.
नाथ पै यांचा संसदेतील कायदे कानून आणि नियम अधिकार याचा अभ्यास अत्यंत चिकित्सक होता. १९६७ साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना संसदेत रेल्वेचे बजेट सादर करण्यात आले. शासन बहुमतात होते. सादर होणारे रेल्वे बजेट बहुमतांच्या आवाजी मतदानात मंजूर करावयाचे इतकीच प्रक्रिया बाकी होती. सभागृहात सत्ताधारी पक्षाचे मोजकेच खासदार उपस्थित होते. अनेक सत्ताधारी खासदार उठून गेले होते. बॅ. नाथ पै यांच्या ही बाब तातडीने लक्षात आली. त्यांनी रेल्वे बजेटवर १ पैशाच्या कपातीची सूचना मांडली. ही सूचना फेटाळण्यासाठी आणि बजेट मंजूर करण्यासाठी सभागृहात सत्ताधारी सदस्य नाहीत. अत्यंत अटीतटीचा प्रसंग उभा राहीला. कपात सूचना मंजूर होणे म्हणजे सरकारचा पराभव. पंतप्रधान इंदिरा गांधी अत्यंत अस्वस्थ झाल्या. त्यांनी बॅ. नाथ पै यांना चेंबरमध्ये बोलावून घेतले. तुम्हाला काय पाहिजे सांगा, परंतु ही १ पैशाची कपात सूचना मागे घ्या, अशी विनंती केली. बॅ. नाथ पै यांनी संसदीय आयुधांचा अचूक वापर करत विरोधीपक्षाकडे संख्याबळ नसताना पंतप्रधान इदिरा गांधी यांना अडचणीत आणले होते. नाथ पै यांची मागणी मंजूर केल्याशिवाय पर्यायच नव्हता. नाथ पै यांनी सांगितले कोकण रेल्वेच्या सर्व्हेचा निर्णय सरकारने घ्यावा, तरच मी कपात सूचना मागे घेईन. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते मान्य केले आणि रेल्वे मंत्री गुलझारीलाल नंदा यांनी २८ फेब्रुवारी १९७० मुंबई-मंगलोर पश्चिम किनारी कोकण रेल्वेच्या तपशीलवार सर्वेक्षणाचे आदेश काढले. लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे असो अथवा विरोधी पक्षाचे संसदेतील लोकप्रतिनिधींना असणारा अधिकार काय आहे, कसा आहे आणि तो कोण कोणत्या माध्यमातून वापरला जातो, त्यासाठी कोणती कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत असणारी आयुधे वापरता येऊ शकतात, तेथील मुत्सद्दीपणा बौद्धिक कसोटी यांचे विविध पैलू बॅ. नाथ पै यांच्या संसदीय कार्याचा एक अनमोल असा अभिजात ठेवा आहे. आजच्या प्रतिनिधींनी याचा अभ्यास करणे आणि समजून घेणे फार गरजेचे आहे. प्रगल्भ राजकारण हे गोंधळ आणि आकांडतांडव याच्या फार पलिकडचे असते. देशातील हा असा लोकसभा मतदारसंघ आणि लोकसभा प्रतिनिधी होते की जे लोकसभेतील चर्चा थेट गावाच्या चावडी, उंबरठ्यापर्यंत आणत होते. खेड्यातील खेडूतांला शेतकरी कष्टकरी मजूराला, विद्यार्थी, तरुण, भगिनी, माता यांना समजेल अशा भाषेत बॅ. नाथ पै लोकसभा अधिवेशनानंतरचा वृत्तात कथन करत आणि त्या सोबत येथील छोट्यातील छोटे प्रश्न समजून घेत. ते लोकसभेच्या पटलावर मोठ्या खुबीने मांडून त्याची तड लावत. यात विरोधक आणि सत्ताधारी असा कधी भेद आणि शत्रुत्व नव्हते. सत्ताधाऱ्यांवरील टीकेची धार तीक्ष्ण असे; मात्र त्यासाठी उच्च आणि दर्जेदार भाषा आणि सुभाषितांची त्याला पखरण असे. त्यामुळेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील एकमेकांची नातीही अनवट जिव्हाळ्याची असत. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या धोरणावर टीकेचे आसूड ओढताना बॅ. नाथ पै आणि त्यांच्यातील कौटुंबिक जिव्हाळा कधी कमी झाला नाही. बॅ. नाथ पै यांचा १९७१मध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधूमाळीत मृत्यू झाला. पत्नी क्रिस्टलने राजकारणात येऊ नये तिला ते जमणार नाही, असे नाथ पैंचे मत होते. त्यानंतर त्यांची परदेशी पत्नी क्रिस्टल व्हिएन्नाला जाण्यास निघाली, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी व्हिएन्नाला भारतीय दुतावासाची वेगळी कचेरी पर्यटन विभागाला जोडून सुरू करत, तेथे क्रिस्टलची व्यवस्था केली. हे जे राजकीय पक्षांतर्गत नाते होते हा वारसा उदात्त नैतिकता आणि आदर सन्मान या मुल्यांची जपणूक करणारा आहे. आज तो लूप्त होत तर नाही ना, अशी शंका मनात येत राहते.
– अभिजित हेगशेट्ये
Email : abhijit.shriram@gmail.com


