‘प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचे, त्यावरच यश’ : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात १ हजार ५४७ जणांना पहिले प्रशिक्षण

रत्नागिरी : ‘कोणतेही काम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण हे खूप महत्त्वाचे असते. या प्रशिक्षणाच्या जोरावर निवडणूक तुम्ही सर्वजण यशस्वीपणे पार पाडाल,’ अशा शब्दांत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांतर्गत चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात काल (ता. ७) झाले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले, ‘मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग सर्वांनी काटेकोरपणे लक्ष देऊन करावे. त्यात कोणतेही अडचण येणार नाही. मतदान प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दरम्यान केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करावा. मतदान प्रक्रियेदरम्यान काय करावे आणि काय करू नये, हे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यादृष्टिने सर्वांनी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घ्यावे.’
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांनीही या वेळी मार्गदर्शन केले.
प्रांताधिकारी श्री. लिगाडे यांनी संगणकीय सादरीकरण करून अभिरुप मतदान प्रमाणपत्र नियंत्रण युनिट मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची कार्यवाही, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट बदलणे आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पहिल्या ७४७ तसेच दुसऱ्या सत्रात ८०० अशा एकूण १ हजार ५४७जणांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले.




