शैक्षणिक

विद्यार्थ्यांना पैलू पाडण्याचे काम शिक्षकांचे : प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

रत्नागिरी : ‘कॉलेज म्हणजे काय तर तुम्ही हिरा असाल, तर तुम्हाला पैलू पाडले जातात आणि तुम्ही गारगोटी असाल तर तुम्हाला पॉलिश केले जाते. माझ्या मते प्रत्येक विद्यार्थी हा हिराच असतो आणि त्याला पैलू पडण्याची जबाबदारी शिक्षक म्हणून आमची आहे’, असे लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले.
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातर्फे मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आज (१ एप्रिल) आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे, प्रा. सौ. पूजा मोहिते उपस्थित होत्या.

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातर्फे आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलताना लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी. शेजारी प्रा. सौ. पूजा मोहिते, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आणि हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे.

प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवत असल्याने आपल्या आयुष्यात तो सर्वांत महत्त्वाचा असल्याचे नमूद करतानाच एक दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत, याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थी कसा असला पाहिजे हे त्यांनी सविस्तर सांगितले. कठीण परिश्रम, नियमितपणा आणि प्रामाणिकपणा हे कोकणी विद्यार्थ्यांचे तीन महत्त्वाचे गुण आहेत. या बरोबरच व्यक्तशीरपणा तुमच्या अंगी असेल तर जगात कुठेही तुमचा निभाव लागेल, असेही त्यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. हेगशेट्ये म्हणाले, ‘शारीरिक दुखण्यावर कसे मात करत पुढे जाता हे तुमच्या मानसिक पातळीवर अवलंबून असते आणि ती तुम्ही कशी तयार करता त्यावर तुमची दुर्दम्य इच्छाशक्ती अवलंबून असते आणि त्याच जोरावर तुम्ही आयुष्यात जे पाहिजे ते मिळवू शकता. आज स्थलांतर हे कोकणासमोर मोठे आव्हान आहे असे मला वाटते. स्वत:चा विकास पुणे, मुंबई किंवा परदेशात गेल्यावरच होतो असा समज आहे; मात्र आपल्या गावाचा, जिल्ह्याचा किंवा देशाचा उंबरठा ओलांडताना तो व्यापक ही असायला हवा. आपल्याला पदवी मिळाली पण आपली क्षमता काय आहे हे प्रत्येकाला ओळखता आले पाहिजे. गेल्या २५ वर्षांत श्रमप्रतिष्ठेचा निकष बदलला आहे. प्रत्येकात असलेले कौशल्य वेगळे असून, ते स्वत:ला ओळखता यायला हवे आणि हे करतानाच आपल्या मातीपासून आपण लांब जाणार नाही याची काळजीही घ्यायला हवी.’

एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातर्फे आयोजित पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभात बोलताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये. शेजारी प्रा. सौ. पूजा मोहिते, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी आणि हेगशेट्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. आशा जगदाळे.

आज आपण एक जादुई जगात वावरतोय हे सांगताना श्री. हेगशेट्ये यांनी आज आपण मोबाईल, लॅपटॉपच्या एक क्लिकवर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात क्षणभरात पोहचू शकतो, या तंत्रज्ञानाचा उपयोग करत शिकणे आणि शोधणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच सामान्य ज्ञान वाचा आणि वाढवा आणि वर्षातून किमान दोन ते तीन आत्मचरित्र वाचा, हे करताना व्हॉट्सअॅप युनिव्हार्सिटीपासून मात्र लांब राहा, असे आवाहन त्यांनी ययावेळी विद्यार्थ्यांना केले.
एनएसएस विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी सूत्रसंचालन केले. वाणिज्य विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका हुमेरा काद्री यांनी आभार मानले. यावेळी पल्लवी खेडेकर, तेजल सावंत, हीना अन्सारी, सादीया सारंग, झोया म्हसकर, मुस्कान मिरकर, ज्योती कक्केरकर, अक्षय राऊत, निहाल कोंडकरी, तेजस कुळकर्णी, कौशल चव्हाण, श्रावणी कांबळे, मंजिरी घवाळी, शिवानी उत्तेकर, सायली मालप, सेजल पंडेय, पौर्णिमा राजे, कोमल पाडावे, मैथिली सावंत, सायली चव्हाण, मनीष सावंत, रिना कांबळे, विद्या शिवगण या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

विद्यार्थिनीला पदवी प्रमाणपत्र प्रदान करताना मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button