मुख्य बातमी

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवीत मार्चअखेर १६.५०टक्क्यांनी वाढ : ॲड. दीपक पटवर्धन

ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : ‘प्रतिवर्षी आर्थिक वर्षअखेरीच्या दिवशी आपली आर्थिक आकडेवारी घोषित करण्याचा स्वरूपानंद पतसंस्थेचा शिरस्ता आहे. त्याला अनुसरून संस्थेची सातत्यपूर्ण वृद्धिंगत होणारी आकडेवारी जाहीर करताना खूप अभिमान वाटतो, कारण प्रतिवर्षीप्रमाणेच या आर्थिक वर्षाअखेरीला संस्थेने सातत्यपूर्ण आर्थिक वृद्धी केली असून, २८ टक्के इतके विक्रमी भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) प्रमाण राखले आहे. ९९.५३ टक्के एवढी विक्रमी वसूली आणि ७ कोटींचा निव्वळ नफा ० टक्के नेट ( एनपीए) राखत ९ शाखांची वसुली १०० टक्के करण्यात यश संपादन केले आहे. संस्थेचा ग्रॉस एनपीए ही ०.८३ टक्के इतका नगण्य ठेवण्यात संस्था यशस्वी झाली आहे’, असे स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
ॲड. पटवर्धन म्हणाले की, ‘मागील वर्षीच्या तुलनेत मार्च २०२४अखेर संस्थेच्या ठेवीत १६.५० टक्क्यांनी वाढ होऊन संस्थेच्या ठेवी ३०८ कोटी ८० लाख झाल्या आहेत. तर कर्जवितरणात १८.१८ टक्क्यांची वाढ झाली असून, येणे कर्जे २१५ कोटी ११ लाख झाली आहेत. संस्थेच्या गुंतवणुका १४५ कोटींच्या झाल्या आहेत, तर संस्थेचे खेळते भांडवल ३७० कोटी झाले आहे. संस्थेचा स्वनिधी ४३ कोटींचा झाला असून, संस्थेची मजबूत आर्थिक ताकद दर्शक निधी म्हणून याकडे पाहिले जाते. स्वरूपानंद पतसंस्थेचा संमिश्र व्यवसाय ही ५२३ कोटी झाला आहे. संस्थेची गंगाजळी १३ कोटी ४५ लाख आहे, तर इमारत निधी २१ कोटींचा आहे.’
‘स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आपल्या व्यवहारात सातत्य राखले आहे. सर्व व्यवहार, धोरणे योजनाबद्ध पद्धतीने राबवली आहेत. व्यवस्थापन खर्चाचे खेळत्या भांडवलाशी प्रमाण १.७५ टक्क्यांनी असे पूर्ण नियंत्रणात राखले असून, खेळत्या भांडवलाशी नफ्याचे प्रमाण १.९० टक्के असे लक्षणीय आहे. आपले खर्च पूर्ण नियंत्रित ठेवत संस्थेने ठेवीवरील व्याज अदा करण्यासाठी १९ कोटी ५४ लाख खर्च केले असून, वेतनावर ३ कोटी १५ लाख तर एजंट कमिशन पोटी पिग्मी एजंटना ५९ लाख ५६ हजार खर्च केले आहेत. तर कर्जावरील व्याजापोटी २३ कोटी २० लाख उत्पन्न प्राप्त केले आहे. गुंतवणुकांवर ९ कोटी ०३ लाख प्राप्त केले असून १ कोटी इतर उत्पन्न प्राप्त केले आहे. या सर्व व्यवहारातून ७ कोटी ३ लाख इतका निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने आपले सर्व निधी योग्य पद्धतीने व्यवहारात फिरते ठेवल्याने योजनाबद्ध व्यवहार केल्याने उत्तम नफा संस्थेला प्राप्त झाला आहे’, अशी माहिती ॲड. पटवर्धन यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘केवळ ३०० सभासदांनी स्थापन केलेल्या संस्थेची सभासद संख्या ४४ हजार ८८९ इतकी विशाल झाली असून, ४४ हजारांपेक्षा जास्त सभासदांच्या भक्कम पाठिंब्यावर स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थविश्व खंबीर पणे मार्गक्रमण करत आहे. २० हजार ७४६ कर्जदार, १९ हजार ५०० ठेव खाती अशी ढोबळ मानाने आकडेवारी आहे. सहकार खात्याने लागू केले किमान ९ टक्के प्रमाण ठेवणे अनिवार्य असताना संस्थेचा सीआरएआर तब्बल २८ टक्के इतका लक्षणीय असून, संस्थेची आर्थिक भक्कम स्थिती या माध्यमातून दिसून येते. पतसंस्थेच्या सर्व सभासदांनी उत्तम सहकार्य केले. कर्जदारांनी कर्जाची नियमित परतफेड केली. ठेवीदारांनी वेळोवेळी ठेवी ठेऊन आपला सहभाग नोंदवला आहे. एक विश्वासार्ह संस्था म्हणून प्राप्त केलेला लौकिक संस्थेने अबाधित राखला याचे समाधान लाख मोलाचे आहे.’
नवीन आर्थिक वर्षात ४०० कोटी ठेवी आणि ३०० कोटींच कर्जवितरण आणि नव्या ५ शाखा असा संस्थेचे नियोजन असून नवीन आर्थिक वर्षात अधिक द्रुतगतीने पुढे जाण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे ॲड. पटवर्धन यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button