श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आयोजित शिवज्योत दौडला प्रतिसाद

रत्नागिरी : ‘आपण सर्वांनी भारतमातेच्या पोटी जन्म घेतला आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. आपण सारे त्यांचे वारसदार आहोत, त्यामुळे छत्रपतींचे विचार आपण वर्तमानात आणि भविष्यातही आचरणात आणले पाहिजेत, त्यांचे विचार सतत तेवत ठेवण्यासाठी, राष्ट्र हितासाठी तरुणांनी योगदान द्यावे,’ असे प्रतिपादन माजी आमदार बाळासाहेब माने यांनी केले.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवज्योत दौड कार्यक्रमाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बाळासाहेब माने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीची पूजा तसेच दुधाचा अभिषेक करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळा आणि शिव ज्योत दौडला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवजयंतीनिमित्त येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नदुर्ग किल्यावरून पहाटे ६ वाजता श्री भगवती मातेचा आशीर्वाद घेऊन ‘शिवज्योत’ दौडत मारूती मंदिर येथे आणण्यात आली. त्यानंतर मारुती मंदिर येथील अश्वारूढ मुर्तीची पूजा आरती, दुग्धाभिषेक करून शिवरायांना ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देऊन आजची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं जीवन अर्पण करणारे अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त धारकऱ्यांनी अभिवादन केले.



