क्रीडामुख्य बातमी

रत्नागिरीतील पायल, अपेक्षा महाराष्ट्र खो-खो संघात

रत्नागिरी : भारतीय खो-खो महासंघातर्फे दिल्ली येथे २८ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या ५६व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो महिला संघ जाहीर झाले असून, यात रत्नागिरीच्या पायल पवार, अपेक्षा सुतारची निवड झाली आहे. महाराष्ट्राचे दोन्ही संघ स्पर्धेसाठी दिल्ली येथे रवाना होणार आहेत.
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना भारतीय महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अरुण देशमुख, माजी सचिव संदीप तावडे यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे मानवत (जि. परभणी) येथील के. के. एम. कॉलेज येथे राष्ट्रीय स्पर्धापूर्व सराव शिबिर झाले. यामध्ये खेळाडूंनी कसून सराव केला असून ते अजिंक्यपद खेचून आणतील, अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र संघात रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू पायल आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अपेक्षा सुतार या दोघींना राष्ट्रीय प्रशिक्षक पंकज चवंडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
महाराष्ट्राचे संघ पुढीलप्रमाणे : पुरुष गट : प्रतीक वाईकर, सुयश गरगटे, राहुल मंडल, वृषभ वाघ, आदित्य गणपुले (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, ऋषीकेश मुर्चावडे, निखील सोडीये, अक्षय भांगरे (सर्व मुं. उपनगर), लक्ष्मण गवस (ठाणे), अक्षय मासाळ (कर्णधार), सौरभ घाडगे (सर्व सांगली), विजय शिंदे (धाराशिव), शुभम जाधव (परभणी), वेदांत देसाई (मुंबई), प्रशिक्षक- शिरीन गोडबोले (पुणे), सहाय्यक प्रशिक्षक पवन पाटील (परभणी), व्यवस्थापक अनिल नलवाडे (परभणी). महिला गट : प्रियांका इंगळे, काजल भोर, कोमल दारवटकर, हृतिका राठोड (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे, किशोरी मोकाशी (सर्व ठाणे), गौरी शिंदे, संपदा मोरे (कर्णधार), ऋतुजा खरे, अश्विनी शिंदे (सर्व धाराशिव), पायल पवार (रत्नागिरी), सानिका चाफे (सांगली), मिताली बारसकर (मुं. उपनगर), अपेक्षा सुतार (रत्नागिरी). प्रशिक्षक- प्रवीण बागल (धाराशिव), सहाय्यक प्रशिक्षक प्राची वाईकर (पुणे), व्यवस्थापिका वैशाली सावंत (परभणी).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button