राजकीयलोकसभा २०२४

किंगमेकर ते किंग..

देशातील १८ व्या लोकसभेचे रणशिंग फुंकले गेले आहे. ”चारसो पार” या मोदीकी गॅरेंटीने सुरू झालेली काही महिन्यांपूर्वीची लोकसभा निवडणुकीचे जोरदार कॅम्पेन म्हणजे आता निवडणुका घेणे हे फक्त एक नाममात्र प्रक्रिया आहे एवढेच! असेच वाटत होते. देशात ‘अच्छे दिन’चा माहोल इतका बेमालूम बहरला आहे की जणू सारा देशच मोदींच्या प्रभावाने मोहोरुन आला आहे. आता एकच नाव फक्त मोदी आणि मोदी सरकार आणि मोदी सरकारची गॅरेंटी. कोणतेही टीव्ही चॅनल असो अथवा कोणतेही वर्तमान पत्र असो, फक्त एकच फोटो आणि एकच नाव. यामुळे सर्वांनाच खात्रीच होती की आता निवडणुका घेण्याची तरी काय गरज! जर सर्वांनाच एकाच चेहऱ्यावर संमत्ती द्यायची असेल, तर मग निवडणूक, त्याचा खर्च त्यातील वाद आणि त्यातून होणारी प्रचंड उलथापालथ कशासाठी? रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी पहा कशी ८०टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवत लोकशाही पध्दतीने निवडणूक जिंकली. तेथे म्हणे पुतीनना विरोध करणारा, त्यांच्या समोर विरोधात उभा रहणारा विरोधी पक्षच नाही, की विरोधी नेता नाही. बहुदा भारत याच लोकशाहीच्या मार्गाने मार्गक्रमण करेल त्यामुळे महागुरुंची ज्या चेहऱ्यावर नजर ते खासदार, भावी मंत्री इत्यादी इत्यादी असेच बहुतांश चॅनेल आणि मान्यवर ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक यांना वाटत होते. याच काळात भाजप इनकमिंगचा रेट ही फार वेगवान होता. आपले पक्ष फोडून भाजपच्या प्रंगणात जाण्याची जणू स्पर्धाच सुरू होती. महाराष्ट्रात शिंदेनी दादांना यांत हरवले याचे केवढे दुखः दादागटांतील आमदारांना झाले! मात्र ती कसर त्यांनी अगदी ओथंबल्या धरण जलाशयांनी भरून काढली.

लोकसभेची आचारसंहिता लागली आणि काही वेगळेच सूर उमटू लागले. एक एका म्यान्यात तीन तीन तलवारी, आता कोणाला जागा मिळेल हा प्रश्न निर्माण झाला. यांतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला मिळणार, हा प्रश्न सुरुवातीला फारच सहज सोपा होता, तसे वाटत तरी होते.  सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरीचे आमदार ना. उदय सामंत यांनी राजकारणारत ज्या वेगाने आपली पकड बसविली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वरिष्ठ पातळीवर त्यांचा असणारा दबदबा, त्यांच्याकडे असणारी महत्त्वाची पदे आणि त्याचवेळी सर्वसमावेशक संपर्क आणि प्रसंगी राजकीय व्यूहरचनेतील त्याची विलक्षण मुत्स­द्दी चाणक्य क्षमता, यामुळे फासे कसेही पडले तरी दान सामंत यांचेच असणार हे युधिष्ठीरही सांगू शकेल आणि संजय तो मेसेज फॅारवर्ड करू शकेल यात कोणताच संदेह नव्हता. कोविड काळातील कोविडवर मात करत त्यांनी वेगवान राबविलेली शासकीय यंत्रणा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री पदकाळातील त्यांचा तेथील प्रत्येक तालुका गावपातळीवर पोहोचलेला जनसंपर्क आणि विविध विकास कामे त्यानंतर नव्या राजकीय व्यूहरचनेतील त्यांची अठ्ठेचाळीसावी मुव्ह तेथून त्यांच्या गुवाहाटी-महाराष्ट्र सरकार ते दिल्लीपर्यंतचा राजकीय स्तर अधिकच उंचावत गेला आणि राज्याचे उद्योग थेट त्यांच्या दारी आले. हे सारे इतके काही जुळून येत होते, की रत्नागिरी लोकसभा उमेदवार कोण असणार याची सर्व सूत्रेच सामंत यांच्याकडे असणार या ब­द्दल कोणताही संदेह नव्हता.
सामंत यांच्या गेल्या २० वर्षांतील अत्यंत यशस्वी अशा वेगवान राजकीय वाटचालीतील मुख्य शिल्पकार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते ते आहेत किरण सामंत उर्फ भैयाशेठ. जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची भूमिका निभवणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या व्यवसाय एक नामांकित कॅान्ट्रक्टर असा आहे, मात्र त्याही पेक्षा त्यांचे शासकीय कामे त्यातील नियोजन आणि त्यामाध्यमातून जनसंपर्क मोठा आहे. प्रत्यक्ष समोर न येता अनेक मोठ्या कामांतील त्यांचा असणारा सहभाग त्यांना गेल्या काही वर्षांत ‘किंगमेकर’ ही पदवी बहाल करता झाला आहे. रत्नागिरीच्या लोकसभा जागेसाठी भाजप-सेना-राष्ट्रवादी या महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. आणि ही चर्चा गेले किमान सहा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आहे. उमेदवाराने आपणाला प्रमोट कसे करावे ह्याचे आजकाल फार नवनवे फंडे येत असतात. यांत किरण सामंत यांच्या व्हॉट्सअपवरील स्टेटसवर ठेवलेल्या मशाल चिन्हाच्या चर्चेने फारच धमाल उडवून दिली होती. तसे ते स्पष्टवक्ते म्हणूनही प्रसिध्द आहेत. त्यांनी या तुफानी चर्चेला आणखी अंगावर घेत मध्यंतरी ”आता मजा बघा, Landing Shortly” असा डीपी संदेश ठेवला याची दखल राज्यातीलच नाही, तर देशातील चॅनेलनी घेतली आणि उदय सामंत यांचे भाऊ म्हणून प्रतिमा असणारे किरण सामंत स्वतःच्या वेगळ्या व्यक्तिमत्वाने परिचीत झाले. पूर्ण तयारीनिशी आज ते लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी सज्ज आहेत. मात्र देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आणि त्यांनी भाजप ३४ जागा लढवणार असे जाहीर करत शिंदे-दादांची हवाच काढून टाकली. दिल्ली सरकारची मजल इथपर्यंत पोहोचली की, ‘आम्ही देतो त्यावरच समाधान माना!’ यामुळे विद्यमान खासदार असणारे मतदारसंघ तर टिकतील का? या चिंतेत विद्यमान आहेत. हा मतदारसंघ भाजपच्या कमळावरच लढविला जाईल, असा निर्धार भाजपने केला आहे. माजी आमदार प्रमोद जठार गेली दोन वर्ष लोकसभा निवडणुकीची तयारी करत असल्याचे सांगितले जाते. इकडे माजी आमदार बाळ माने यांनीही जोरदार कंबर कसली असून विविध क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल सुरू केली आहे. नारायण राणे यांच्या मनात नक्की काय आहे? कोणते हिशेब आहेत ? याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही, असे संभ्रम निर्माण करणारे वातावरण आहे.
यात सामंत यांचे राजकीय वजन सर्वाधिक महत्त्वाचे ठरणार आहे. तसे त्यांच्याकडे हुकमाचा एक्का आहे! तो वापरून ते बंधुराजांना तिकीट मिळवून देणार म्हणजे देणारच, असा राजकीय धुरंधरांचा अंदाज आहे. ‘किंगमेकर’ना आता ‘किंग’च्या भूमिकेत त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते पहात आहेत; मात्र देशाच्या राजकारणात राजापूर मतदारसंघ एका अवघड वाटेवर अडखळून बसला आहे. दुसऱ्या  बाजूला शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत अत्यंत आत्मविश्वासाने माझ्यासमोर पराभव होण्याची खात्री असल्याने कोणी उभे रहाण्याचे धाडसच करत नाही, अशा तुफानी आवेशपूर्ण मुलाखतींनी राजकीय क्षेत्रात धम्माल उडवित आहेत. रत्नागिरी (राजापूर) लोकसभा मतदारसंघ देशाच्या निवडणुकीतील एक महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न असणार हे नक्की!

-बाबुराव रोख ठोके

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button