‘नृत्य चक्र’मध्ये रत्नागिरीतील नृत्य कलाकारांचा सहभाग

रत्नागिरी : पुणे येथे नुकत्याच आयोजित केलेल्या ‘नृत्य चक्र’ या कार्यक्रमांतर्गत बाराशेहून अधिक कथ्थक नर्तक-नर्तिकांनी सलग २० मिनिटे नृत्य सादर केले. याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये करण्यात आली आहे. रत्नागिरीतील वेदश्री नृत्यालयाच्या संस्थापिका रूपाली लिमये आणि त्यांच्या विद्यार्थिनींचा यात समावेश आहे.
यात अकोला, अमरावती, नाशिक, मुंबई, पुणे, चिपळूण, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यांतील कलाकार उपस्थित होते. रूपाली लिमये आणि त्यांच्या विद्यार्थिनी चैत्राली लिमये, आकांक्षा भरवडे, पंकजा जाधव, जान्हवी वहाळकर, प्रियांका ढोकरे या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती गुरू अस्मिता ठाकूर आणि संयोजन गुरू ज्योति मनसुखानी यांचे होते. रूपाली लिमये गेली २५ वर्षे रत्नागिरीत कथ्थक नृत्याचे वर्ग घेत असून, त्यांनी अनेक नावाजलेल्या कार्यक्रमात नृत्य सादर केले आहे. रूपाली लिमये आणि त्यांच्या विद्यार्थिनींमुळे रत्नागिरीचे नाव मानाच्या पुस्तकात नोंदविले गेले असल्याने त्यांचे व त्यांच्या विद्यार्थिनींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



