शैक्षणिक

नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयात आर्थिक साक्षरतेवर व्याख्यान

नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित ‘आर्थिक साक्षरता बचत आणि गुंतवणूक’ कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सहयोगी प्राध्यापक डॉ. सुवर्णा सूर्यवंशी. शेजारी डावीकडून प्रा. सुकुमार शिंदे आणि प्रा. डॉ. विजय ककडे.

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या नवनिर्माण कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे ‘आर्थिक साक्षरता बचत आणि गुंतवणूक’ या विषयावर व्याख्यान झाले. आर्थिक व्यवहारासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. सुवर्णा सूर्यवंशी आणि ‘सेबी’चे रिसोर्स पर्सन प्रा. डॉ. विजय ककडे उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांनी बचत कशी करावी, केलेली बचत योग्य कामासाठी कसे वापरावे, गुंतवणुकीचे महत्त्व सांगताना सुरक्षित बचत कुठे आणि कशी करावी, गुंतवणूकीचे परतावे कसे मिळवावे आणि आपल्याला हवा तेव्हा पैसा कसा उपलब्ध करून घ्यावा या विषयी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. विजय ककडे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना कशी काळजी घ्यावी यावर माहिती देतानाच कोणते मेसेज दुर्लक्षित करावे, बक्षीस घेताना सावधगिरी कशी बाळगावी, आर्टिफिशियल इंटलिजियन्सच्या (एआय) माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून कसे सावध राहावे, ओटीपीबद्दलची सावधगिरी, ट्रॅपपासून कसे सावध राहावे याविषयी विविध उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन मान्यवरांनी आले.
प्रारंभी कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांना पुस्तक भेट दिले. कार्यक्रमाला प्रा. प्रकाश पालांडे, मराठी विभागप्रमुख प्रा. सचिन टेकाळे यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button