कौशल्यात वेळोवेळी वाढ करणे गरजेचे : अभय महिषी
‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चासत्रे

रत्नागिरी : ‘तंत्रज्ञानाची वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे आपली कौशल्ये सतत विकसित करणे ही काळाची गरज असून आपल्या कौशल्यात वेळोवेळी वाढ करणेही गरजेचे आहे,’ असे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे (मुंबई) संयुक्त संचालक अभय महिषी यांनी सांगितले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे (मुंबई) आयोजित ‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळा २९ फेब्रुवारीला शासकीय विश्राम गृहासमोरील हॉटेल सिल्व्हर स्वान येथे झाली. त्यावेळी ‘कौशल्य विकास’ या विषयावर पॉवर पॉईंट प्रेसेंटेशनद्वारे माहिती देताना ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘तरुणांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये आपला देश येत असल्याने गाव, जिल्हा, राज्य आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी या तरुणांचा उपयोग चांगल्या प्रकारे करून घेत येऊ शकतो. त्यासाठी त्यांनी आपली कौशल्ये विकसित करून त्यातून कुशल मनुष्यबळ निर्माण करता येऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शॉर्टटर्म स्किल, लॉंगटर्म स्किल, अप्रेंटिसशीप आणि इंटरप्रिनरशीप या चार महत्त्वाच्या भागांची सविस्तर माहिती दिली. गेल्या ४० वर्षांतील बाजारपेठेचा विचार करता त्यात खूप बदल झाल्याचे निदर्शनास आले आहे आणि हा बदल कौशल्ये विकसित केल्यामुळे झाला आहे. आपल्या मागणीप्रमाणे सेवा उपलब्ध होत आहे. औद्योगिकता, कौशल्य विकास आणि अभिमुखता यामुळे हे शक्य होत आहे.’

यानंतर भारतीय तटरक्षक दलाचे असिस्टंट कमांडंट मनीष सिंह यांनी प्रेझेंटेशनद्वारे ‘समुद्रातील जीवांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन’ या विषयावर माहिती दिली. समुद्रात असताना मच्छीमारांनी घ्यायची काळजी, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या वेळी भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक गिरीश चंदर, तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे जनसंपर्क अधिकारी कमांडंट राजेश धौलखंडी उपस्थित होते.

‘शाश्वत स्थानिक उपक्रमांद्वारे कोकण प्रदेशातील पर्यटन क्षमता खुली करणे : भारतीय पर्यटन’ या विषयावर पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक डी. वेंकटेशन यांनी माहिती दिली. या वेळी पर्यटन सूचना अधिकारी गौरी आपटे उपस्थित होत्या. भावी पिढीला गड-किल्ल्यांची ओळख व्हावी या हेतूने मुंबई पर्यटन मंत्रालयातर्फे युवा टुरिझम क्लबच्या माध्यमातून ‘फन टुर्स’चे आयोजन केले जाणार असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र हे केंद्राचे महत्त्वाचे पर्यटन केंद्र असून कोकण किनारपट्टी पर्यंटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोकणचे किनारे सर्वांत सुंदर आहेत त्यामुळे ब्रँडिंगसाठी या किनाऱ्यांचा वापर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी ऊक्षी, रुंढेतळी, बारसू सडा, कशेळी, देवाचे गोठणे, जांभरूण, देवी हसोळ, कुडोपी या ठिकाणची कातळशिल्पे जतन करण्याच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या पत्रकारांना या कातळशिलपांचा प्रसार आणि प्रचार नक्की करू, असे सांगतानाच पत्रकारांच्या तक्रारी आणि सुचनांचे स्वागत करून त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पर्यटनात तरुणांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांना समोर नेऊन युवा टुरिझम क्लबची स्थापना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी डेक्कन ओडिसी, कोकणातील पारंपरिक उत्सव, स्थानिक लोकोत्सव या अनुषंगाने अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्याचा पाठपुरावा या मंत्रालयातर्फे केला जाईल, असेही सांगण्यात आले.

पत्र सूचना कार्यालयाची माहिती देताना सहाय्यक संचालक निकिता जोशी यांनी सरकार, पत्रकार, नागरिक यांच्यातील संवाद हा कामाचा मुख्य भाग असल्याचे सांगितले. नागरिकांना माहिती देणे, सरकारला माहिती देणे, नागरिकांचा पाठपुरावा करणे, सरकारला सल्ला देणे, नागरिकांना कार्यरत ठेवले अशी कामे ‘पीआयबी’ करते. भारतातील सर्व भाषांमध्ये भाषांतर करून बातम्या देणारी संस्था असून या कार्यालयाची ८ क्षेत्रीय, तर ३४ शाखा कार्यालये असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषद, माध्यमांना संक्षिप्त माहिती देणे, मुलाखती, माध्यमांसाठी विशेष कार्यक्रम घेणे, वार्तालाप, ग्रामीण माध्यम परिषद, पत्रकारांसाठी भेट, सहलीचे आयोजन, कार्यशाळा ही ‘पीआयबी’तर्फे घेतल्या जात असल्याचे उपसंचालक जयदेवी पुजारी-स्वामी यांनी सांगितले.



