शैक्षणिक

‘कोकणची भूमी ही शूरवीरांची, साहित्यिक, कलाकार, खेळाडू आणि बुद्धिवंतांची’ : अभिजीत हेगशेट्ये

स्पर्धेतील विजेत्यांना गौरवताना नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये. शेजारी मान्यवर.

दोडामार्ग : ‘कोकणची भूमी ही शूरवीरांची, साहित्यिक, कलाकार खेळाडू आणि बुद्धिवंतांची आहे. त्यांची ती उज्वल परंपरा टिकवण्याची जबाबदारी आजच्या तरुणाची आहे,’ असे प्रतिपादन अभिजीत हेगशेट्ये यांनी केले.
दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच आयोजित केला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर, संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये उपस्थित होत्या. या वेळी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.
श्री. हेगशेट्ये म्हणाले की, ‘२००१साली हे कॉलेज भाड्याच्या घरात चालत होते. आता इमारत आहे. भौतिक सेवा सुविधा वाढल्या आहेत. ग्रंथालयात वेगवेगळ्या विषयांची मुबलक पुस्तक, वर्तमानपत्र, मासिक, खेळाचे साहित्य आहे. तुमच्यासाठी वेळ देणारा कर्मचारी वर्ग आहे. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग करून स्वतःची कारकीर्द घडवा. आपली कर्तबगारी सिद्ध करा. रामा राघोबा राणे हे याच मातीतले होते. त्यांनी सैन्यात मोठी कामगिरी केल्यामुळे त्यांना जीवंतपणी परमवीर चक्र हे सर्वोच्च पदक मिळाले होते. तळकटची श्वेता श्रीनिवास बर्वे या तुमच्याच वयाच्या मुलीने पोफळीच्या फांद्यापासून चप्पल बनवून स्वतःच्या नावावर पेटंट मिळविले. थोर शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी तिचे कौतुक केले, हे आपले आयकॉन असले पाहिजेत; मात्र आजचे तरुण भलत्याच गोष्टींच्या मागे धावून आपल्या जीवनाची वाट चुकतात. आज विविध क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी मोठी संधी असतानाही मुले झोकून देऊन काम करत नाहीत. स्पर्धा परीक्षेमध्ये कोकणातली मुले बोटावर मोजण्याइतकी असतात. याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे.’
या वेळी श्री. केरकर यांनीही पर्यावरण व पर्यटन क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मोठी संधी आसल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. सावंत यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अहवालाचे वाचन प्रा. प्रियंका गवस यांनी केले. संजय खडपकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button