मातृभाषा, मराठी आणि महाराष्ट्र देश : एक दृष्टीकोन

भारताच्या विविधतेला जेव्हा तडा जातो, तेव्हा लोक अस्वस्थ होतात, पण त्या विविधतेच्या चौकटीत स्वायत्ततेच्या मागण्या झालेल्या आहेत. भाषावार प्रांतरचनेमुळे १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्राचा उदय झाला. अर्थात विविधता जपताना कधी सक्ती व्हायला लागली, तर प्रश्न सुटेनासे होतात. तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा लादायचा प्रयत्न केला गेला, तेव्हा १९६०च्या दशकात लोक संतापले होते आणि आजही शांत बसणार नाहीत. हिंदी बोलणाऱ्यांची संख्या खूप जास्त असली, तरी इतर भाषांकडे दुर्लक्ष झाले किंवा हिंदी इतर भाषिकांवर लादली गेली, तर त्यातून तणावच निर्माण होतील. सामंजस्य नसले, तर एका भाषेच्या आग्रहाचा खूप तोटा होऊ शकेल.
भाषांचा आणि विशेषतः मातृभाषेचा विचार जेव्हा मी करतो, तेव्हा मला नेहमी असे वाटते की, भाषा आणि समाजजीवन यांचा खरोखर फारच जवळचा संबंध आहे. भाषा ही नेहमी समाजजीवनात असते आणि समाजजीवन हेसुद्धा भाषेत असते. अर्थात भाषेतील वेगवेगळ्या शब्दांची ओळख होत असताना प्रत्येक व्यक्तीची तशी ओळख एका विशिष्ट संदर्भातच होत असते. उदाहरणार्थ, आमच्या लहानपणी मुंबईच्या शहरी वातावरणात दूध हा शब्द उच्चारला, तर तिथल्या मुलांना भैया जे सकाळी प्यायला आणून देतो, ते दूध असे वाटे. या उलट ग्रामीण भागात त्याच दूधाची ओळख अगदी वेगळी होत असते. मुलांना वाटे गाई अथवा म्हशींची पिळून धार काढल्यावर जे मिळते ते दूध. तसेच अनेक दलित कुटुंबांत वाढलेल्या मुलांना ‘पाणी’ या शब्दामागे अनेक अनुभूती असतात. अशा अनुभवाने पाणी आणण्यास दूर जावे लागणे, जातीय कलह अथवा तणावाचा भागही हमखास असतोच. तात्पर्य काय, तर मातृभाषेच्या नाळेशी आपण सारेच जोडले गेलेले आहोत.
जसजसे आपण आपल्या भाषेत बोलायला शिकतो, तसतसे आपले गंभीर विचार किंवा भावना मातृभाषेमध्ये सर्वात सहज मांडायला आपल्याला जमते. उत्तम संवादासाठी आणि आपल्या भावना किंवा विचार नेमक्या शब्दांत मांडण्यासाठी मातृभाषा किती गरजेची असते, याचा अनेक अर्थांनी आपल्याला पावलोपावली प्रत्यय येतो. मातृभाषेतील संवाद अक्षरशः अर्थपूर्ण होऊ शकतात असे आपल्या लक्षात यायला लागते. मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि आयुष्यातील पहिली बावीस वर्षे त्या भाषेतून संवाद करायची, विचार मांडायची आणि लिहायची सवयच मला जडून गेली. एकदा प्रयत्नांनी आत्मसात केलेली मातृभाषा जगात कोठेही हिंडलो, तरी ती विसरण्याचा प्रश्नच कधी माझ्याबाबतीत उरलेला नव्हता. त्यामुळे मराठी भाषा आणि महाराष्ट्र या दोन्हींवर मी कसा विचार करत गेलो, हेच मांडण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे. तो करताना काही कवितांचा आधार घेणार आहे आणि त्याबरोबरच राज्यशास्त्रासारख्या विषयाच्या मदतीने भाषा, राज्य आणि राष्ट्र यांचे परस्परसंबंध हळुवार उलगडण्याचा एक अवघड प्रयत्नही मी करणार आहे.
माझी मराठी भाषेशी ओळख अगदी ४-५ वर्षांचा असताना ज्ञानेश्वरीतील ओव्या पाठ करताना झाली. त्या ओव्यांतील अर्थ कळण्याइतका मी मोठा नव्हतो आणि कदाचित आजही मनाने तितका परिपक्व नसेन. पण ‘वाक्यम् रसात्मकम् काव्यम्’ या म्हणीचा ज्ञानेश्वरी वाचताना अनुभव आल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पुढील अमोल ओळींवर मी जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा मराठी आपली मातृभाषा आहे आणि आपण मराठी भाषिक आहोत या गोष्टीची मला खूप तीव्रतेने जाणीव होते. ज्ञानेश्वर महाराज लिहितात,
“माझा मराठाची बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजासी जिंके
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन”
अशा वरील उद्धृत केलेल्या अतिशय प्रतिभाशाली ओळी (ओवी) कुणी लिहू शकतो या गोष्टीचे मला वर्षानुवर्षे आश्चर्य वाटले आहे. माझ्या मराठी वाणीची किंवा तिच्यातील अक्षरांची क्षमता इतकी विस्मयकारक आहे की, ती अमृताच्या गोडीलाही मागे टाकेल याची तीव्र जाणीव ज्ञानेश्वरांनीच मला करून दिली. त्यात अर्थातच अतिशयोक्ती होती, कारण अमृताची गोडी फिकी वाटेल हे कळण्यासाठी अमृत चाखण्याचा अनुभव मी कधीच घेतलेला नाही. पण भाषेची थोरवी काव्यात्मक रूपात मांडण्याचा तो एक यशस्वी प्रयत्न आहे. शारदेचे लावण्यरत्न भांडार उघडून रसिकांची मने शतकानुशतके जिंकणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या अलौकिक प्रतिभेपुढे मी अतिशय उत्स्फूर्तपणे अनेकदा नतमस्तक झालेलो आहे. गीतेतील गहन विचार सोप्या आणि रसाळ भाषेत मांडणारे महान तत्त्ववेत्ते आणि महाकवी ज्ञानेश्वर झालेच नसते, तर पुढे शिवाजी महाराज आणि संत तुकाराम झाले असते का? हा प्रश्न मला अनेकदा पडला आहे.
याच संदर्भात डॉ. आंबेडकरांनी आपल्या Annihilation of Caste (अॅनिहिलेशन ऑफ कास्ट) या जात-पात तोडक मंडळासाठी लिहिलेल्या पॅम्पलेटमध्ये मला एक वेगळा विचार वाचायला मिळाला. डॉ. आंबेडकर म्हणतात की, सामाजिक क्रांती झाली तरच राजकीय क्रांती होणे शक्य आहे. प्राचीन भारतात प्रथम जैन आणि बौद्ध विचारांचा प्रसार झाला. त्यानंतर चंद्रगुप्त मौर्यांची कारकिर्द सुरू झाली. त्यांच्या नातवाने म्हणजे सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला; जो दया, उदारता, करुणा आणि समता इत्यादी मूल्यांचा आदर करतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांमुळे वारकरी संप्रदायाचा उगम झाला. या संप्रदायाचे लोक जातीजातींतला भेद विसरून समानतेच्या पायावर आपले परस्परसंबंध विकसित करू लागले. ‘समता वर्तावी अहंमता खंडावी’ हे जणू वारकऱ्यांचे ब्रीदवाक्यच होते. वारकरी संप्रदायाबद्दल नेहमी असे म्हणतात की, ‘ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस’ वारकरी संप्रदायाचे एक दिग्गज म्हणून तुकारामांनी प्रस्थापित कल्पनांना आव्हाने दिली. एक प्रभावी लोकशिक्षक आणि थोर समाजप्रवर्तक या नात्याने तुकारामांनी बहुजन समाजापर्यंत आपल्या आध्यात्मिक संकल्पना आणि विचार स्वतःच्या अभंगांतून अतिशय सुबोध शब्दांत मांडले. याचा अर्थ कळत-नकळत महाराष्ट्रात सामाजिक परिवर्तन किंवा क्रांती होतच होती, जी महाराष्ट्राच्या राजकीय परिवर्तनाला अनुकूल होती. डॉ. आंबेडकर सुचवितात की, त्यातूनच शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वराज्यासाठी सदैव केलेल्या प्रयत्नांची गाथा सुरू झाली असावी, ज्यातून रयतेच्या राज्याची कल्पना उदयास आली आणि विकसित होऊ लागली. मला असे वाटते की, जसजसा मराठी भाषेचा उत्कर्ष होत गेला, तसतसे संतकवी किंवा शिवाजींसारख्या राजकारण धुरंधर नेत्यांना मराठी भाषा आणि महाराष्ट्र देश राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या घडविण्याची संधी मिळत गेली.
यानंतर मराठी भाषा आणि महाराष्ट्र देश या दोन्हीचे अतूट आणि विलोभनीय नाते मला आवडलेल्या आणखी काही सुप्रसिद्ध कविता उद्धृत करून मी वाचकांपुढे मांडायचा प्रयत्न करतो. कवितांच्या माध्यमातून माझे म्हणणे वाचकांच्या मनावर वेगळ्या तन्हेने ठसविता येईल, हीच माझी अपेक्षा आहे. प्रथम माधव ज्युलियन (माधवराव पटवर्धन) यांची मराठी भाषेवरची मला खूप आवडलेली कविता का आणि कशी आवडत गेली यावर लिहितो. त्यासाठी अर्थातच मला रुचलेल्या किंवा खूप विचार करायला लावणाऱ्या कवितेतील काही ओळींचा मी आधार घेत आहे. त्या खालीलप्रमाणे आहेत.
मराठी असे आमुची मायबोली
जरी आज ती राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे
जरी पंचखंडातही मान्यता घे
स्वसत्ताबळे श्रीमंती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही
कुशीच्या तिच्या तीस केवीं त्यजी.
अतिशय सुबोध काव्यात माधव ज्युलियन यांनी आपल्या प्रिय मायबोलीची दयनीय स्थिती अगदी उद्द्वेगावस्थेतच सांगितली आहे. मराठी भाषेचे ते ऐश्वर्याचे दिवस नव्हते. पण तशा ऐश्वर्याच्या यशाची ते आशा जरूर करतात. आपल्या सत्तेच्या बळावर किंवा राजकीय समर्थनामुळे इंग्रजी भाषा मात्र पाच खंडांवर राज्य करीत होती. हा विचार किती खोल आणि यातना देणारा आहे, याची मला आयुष्यभर जाणीव होत गेली. साम्राज्यवाद, वसाहतवाद आणि लॉर्ड मेकॉलेच्या विचारांची कोणतीही पार्श्वभूमी न देता कवीने अगदी सोप्या पण हृदयाला भिडणाऱ्या शब्दांत गुलामी, आपल्या देशाला आलेले पारतंत्र्य, आपल्यातला सदैव हास होणारा आत्मविश्वास आणि स्वाभिमान यांची जाणीव आपल्याला करून दिली आहे. जेव्हा आपण स्वाभिमान गमावतो आणि आत्मविश्वास हरवतो, तेव्हा पारतंत्र्याने ग्रस्त झालेला सारा देश, समाज एखाद्या न्यूनगंडाच्या जाळ्यात सापडतो आणि साम्राज्यवादी देशातील लोकांचे अंधानुकरण करू लागतो. मला या गोष्टीची जाणीव होत गेली.
इंग्रज भारत सोडून गेले; परंतु दशकानुदशके आणि पिढ्यान्पिढ्या आपल्या लोकांनी अंगी बाळगलेली गुलामगिरीची प्रवृत्ती बदलणे इतके सोपे नव्हते आणि आजही नाही. येथील अभिजनांना (elite) सतत इंग्रजीतून शिक्षण मिळाल्यामुळे शेक्सपीअर, मिल्टन, वर्डस्वर्थ वाचणे हे महत्त्वाचे वाटू लागले. कोणी इंग्लडंला जाऊन आला, तिथल्या विद्यापीठात पदवी मिळवली किंवा समाजात अस्खलित इंग्रजी भाषेतून बोलला, तर त्या व्यक्तीला आपण हुशार समजून तिचा आदर करत होतो आणि आजही करतो.
समजा, भारताने इंग्रजांवर राज्य केले असते, तर परिस्थिती अगदी वेगळी झाली असती. तेथील लोकांना महाकवी वाल्मिकी, व्यास किंवा कालिदास वाचावे लागले असते. याचा अर्थ सत्तेचा आणि ज्ञानाचा किंवा ज्ञाननिर्मितीचा फार घनिष्ठ संबंध आहे. भारताचे युरोपमध्ये साम्राज्य ही एक भ्रामक कल्पना आहे, पण इंग्रजांचे भारतावरील राज्य ही एक क्रूर वास्तवता होती. त्यामुळे भारतातील उन्हाळी हवेतही इंग्रजांसारखा पोशाख करणे, श्रीमंत असल्यास गोल्फ खेळणे अणि संध्याकाळी एखाद्या क्लबमध्ये व्हिस्की पिणे ही प्रतिष्ठेची लक्षणे मानली गेली.
साम्राज्यवादाच्या काळात आपल्या मनाची इतकी हिंसा केली गेलेली आहे की, त्यातून आपल्याला एक विचित्र न्यूनगंड निर्माण झाला आहे. अर्थात कोणताही साम्राज्यवादी देश आपल्या राज्याचे समर्थन करण्यासाठी, साम्राज्यवादी देशातील लोक, त्यांची सभ्यता आणि संस्कृती ही पारतंत्र्यात जखडलेल्या लोकांपेक्षा किती जास्त सरस आहे, हेच गुलाम देशातील लोकांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करतो. सुरळीतपणे राज्य कारभार करायचा असेल, तर साम्राज्यवादी देशाची ही एक मानसिक गरज आहे. न्यूनगंडाचे भारतात पोषण अशासाठी झाले, कारण आपले विचार लादताना ‘कारण’ आणि ‘परिणाम’ हे एकच आहेत, हा विचार ‘कलोनियल जगात’ प्रकषनि मांडला गेला. अशा जगाचा विचार करताना फँझ फॅनो यांनी आपल्या सुप्रसिद्ध The Wretched of the Earth (दरेचेड ऑफ द अर्थ) या पुस्तकात कारण आणि परिणामाचा संबंध संवेदनशीलपणे हाताळला आहे. ते वंशवादाच्या संदर्भात लिहीत होते. याचा अर्थ ‘क्ष’ जर वर्णाने गोरा असला, तर तो बुद्धिमान, देखणा आणि सुसंस्कृत असेल किंवा कोणी सुसंस्कृत, देखणा आणि बुद्धिमान असेल, तर तो ‘गोरा’च असणार! या उलट अन्य वर्णांचा आणि विशेषतः कोणी काळा असेल, तर तो कुरूप, निर्बुद्ध, अकार्यक्षम आणि रानटी असेल! आफ्रिकेत जर कारण आणि परिणाम वर्णाच्या संदर्भात तसेच झाले किंवा वाटले, तर ही गोष्ट भारतातही भारत पारतंत्र्यात असताना नक्कीच घडली.
इतकंच काय, आजही भारतात इंग्लंडच्या किंवा अमेरिकेच्या उत्तम विद्यापीठांचे आकर्षण आहे. पंचाहत्तर वर्षांत आपण म्हणावी तशी दर्जेदार विद्यापीठे आजही उभी करू शकलो नाही. त्यामुळे भारत स्वतंत्र झाला, पण मानसिक गुलामगिरीतून पूर्णतः मुक्त होण्यासाठी आपल्याला अजून अनेक वर्षे संघर्ष करावा लागेल. ही जरी वास्तवता असली, तरी अशा संघर्षात भाग घेण्यासाठी माधव ज्युलियन यांच्या दोन ओळी आपल्याला प्रवृत्त करतात.
आपल्या अमृतमय मायबोलीला कठीण दिवस बघायला लागले, तरीही माधव ज्युलियन मातृभाषेची बांधिलकी सोडायला तयार नाहीत. सांस्कृतिक, बौद्धिक आणि भाषेच्या क्षेत्रात anti-colonial nationalism चा कुठे तरी ते पुरस्कार करतात. त्या ओळी मला स्वतःला इतक्या गोड वाटतात की, मी आजही त्या माझ्या मनात एक मराठी भाषिक या नात्याने गुणगुणतो. त्या ओळी अशा आहेत –
‘हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू
वसे आमुच्या मात्रं हन्मंदिरी
जगन्मान्यता हीस अर्पू प्रतापे
हिला बैसवू वैभवाच्या शिरी’
त्या काळात पारतंत्र्यात जगणाऱ्या मराठी बांधवांसाठी मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून तिला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचे ध्येय मला अतिशय सकारात्मक आणि आकर्षक वाटू लागले. मराठी भाषा इंग्रजीप्रमाणे कोणावर लादावी, असे मला मुळीच वाटले नाही. पण मराठीचा विकास आणि गौरव वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत असे मला शालेय दिवसांपासून वाटत गेले. असे वाटण्याचे प्रबल कारण म्हणजे मराठी भाषा आणि महाराष्ट्र देश यांच्या परस्परसंबंधावर मी विचार केला आणि मला महाराष्ट्राबद्दल एक वेगळीच आस्था शाळेपासूनच वाटायची. ती आस्था राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या महाराष्ट्रावरील कवितांमुळे वाटली.
गोविंदाग्रजांची ‘मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा’ ही कविता मला फार भावली. महाराष्ट्र देशाचे वर्णन करताना गोविंदाग्रजांनी ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’, ‘अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा’ आणि ‘बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा’ अशा ओळी आपल्या काव्यात लिहिल्या आहेत. मी दख्खनच्या खडकाळ परिसरात खूप प्रवास केला आहे आणि गोविंदाग्रजांनी त्या परिसराची मला वरचेवर भेट घडवून दिली. किंबहुना बरेच महिने किंवा वर्षे महाराष्ट्राबाहेर राहिल्यामुळे सह्याद्रीच्या डोंगरांवरून प्रवास केला, तेव्हा नेहमी घरी परतल्याचे समाधान मला लाभत गेले. महाराष्ट्राचा भौगोलिक परिसर आणि तिथल्या वनस्पतींचा परिचय हा एक भाग झाला, पण गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाशी एकरूप होऊन त्याकडे समरसतेने बघण्याची शक्ती आपल्या वाचकांना दिली. त्यांच्या मला आवडलेल्या ओळी मी मुद्दाम खाली उद्धृत करत आहे. त्या अशा आहेत –
मयूर कविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा
कवि कृष्णाच्या (केशवसुत) निर्यमका हे महाराष्ट्र देशा
देवी ज्ञानेश्वरी करि – जिथे भक्तीचा खेळ
तिथेंच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ
जिथे रंगली साधी भोळी जनाईची गाणी
तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी
विकायवयाला अमोल असली अभंगमय वाणी
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी
तुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ
वरील ओळी महाराष्ट्र देशाची कल्पना, तिथले काव्य आणि कवी, आणि तिथल्या आध्यात्मिक बैठकीची वाचकाला जाणीव करून देतात.
यमकमय कविता लिहिण्यात मोरोपंत पराडकर यांचा हातखंडा होता. परंतु अशा यमकमय छंदाच्या बेड्यांतून सुटून केशवसुत उर्फ कृष्णाजी केशव दामले यांनी वेगळेच काव्य सादर केले, ज्याला आधुनिक काव्य म्हणून संबोधले गेले.
केशवसुतांच्या काव्यात त्यांची स्वर्ग-समक्षता ही कल्पना अगदी मध्यवर्ती आहे. पृथ्वीतलावर स्वर्गाची निर्मिती करण्याची मनीषा त्यात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ‘आम्ही कोण’ या कवितेत स्थळ, काळ आणि दिशांच्या सीमा भेदून आरपार बघणाऱ्या दृष्टीचा त्यांनी जो उल्लेख केला आहे, त्याने माझ्या मनात घर केले. ते लिहितात, ‘दिक्कालातून आरपार आमुची दृष्टि पहाया सके’. त्यांची प्रतिभा जगावेगळीच होती, नाही तर ‘देवाचे दिधले असे जगत ये आम्हांस खेळावया सृष्टि या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लिलया’ असल्या ओळी सहज स्फुरणे अशक्यप्रायच आहे.
त्यापुढे गोविंदाग्रजांनी ज्ञानदेवांची भक्तिरूपाने ओथंबलेली विवेकशील आणि अमृतमय वाणी आणि आपल्या जीवनसंघर्षाच्या आधारावर, पण बुद्धिप्रामाण्यावर लिहिलेला गीतारहस्य हा टिळकांचा ग्रंथ महाराष्ट्रात कसे एकाच भगवद्गीतेचे दर्शन घडवितात, हे फार सुंदर मांडले आहे. तुकोबांची अभंगमय वाणी, जनाईची साधीभोळी गाणी आणि होनाजी बाळाची अमरभूपाळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याचा उत्तम परिचय करून देतात.
गोविंदाग्रजांप्रमाणेच कोल्हटकरांचे ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे गीतही माझ्या मनावर ठसले. त्यात महाराष्ट्राचा अनेक अर्थाने गौरव केलेला आहे. खऱ्या मराठी मनाची ‘विक्रम वैराग्य एक जागी नांदती, जरिपटका भगवा झेंडाही डोलती’ अशीच स्थिती असायला हवी. विक्रमाबरोबर वैराग्य पाहिजे. मराठी माणसाच्या पौरुषाला अडविले, तर ते त्याला सहन होत नाही. ‘पौरुषास अटक गमे जेथ दुःसहा’ अशा ओळीत थोडा खरेपणा आहे आणि ती काहीशी अतिशयोक्तीसुद्धा आहे. शिवाय मराठ्यांचे साम्राज्य पसरले आणि त्यांनी अटकेपार झेंडे लावले. कवितेत त्याचा उल्लेख आहे –
‘अटकेवरी जेथील तुरंगी जल पिणे
तेथ अडे काय जलाशय दाविणे’
मला असे वाटते की, आपण राष्ट्राबद्दल आत्यंतिक प्रेम आणि अभिमान बाळगला, तर देशाभिमान आक्रमक होण्याची खूप शक्यता असते आणि त्यातूनच साम्राज्यवादी प्रवृत्ती वाढते. मराठी माणसाने किंवा महाराष्ट्राने परक्या प्रांतातील लोकांवर सत्ता गाजवली हे आजही अभिमानाने सांगणारे लोक आहेत. याचा अर्थ आपण दुसऱ्या देशाचे / लोकांचे गुलाम झालो तर रागावतो आणि विद्रोहाची आयाळ पिंजारतो, पण आपले राज्य इतर प्रांतांवर किंवा राज्यांवर लादताना आपल्याला खटकत नाही. आपल्या आक्रमणाबद्दल किंवा विस्तृत साम्राज्याबद्दल आपण कितीही फुशारक्या मारल्या, तरी इतर प्रांतात आपल्याबद्दल काय बोलले जाते, याचा आपण विचार करतो का? उदाहरणार्थ, मराठ्यांना बंगालमध्ये बोर्गी असे संबोधतात आणि लहान मुलांना झोप येत नसेल, तर ‘लुटारू बोर्गी यायच्या आत झोपा’, असे सांगितले जाते. मराठी / मराठा साम्राज्यवाद्यांकडे लुटारू म्हणून बघितले जावे ही शरमेची गोष्ट आहे, पण त्याबद्दल शाळेत किंवा नंतर कोठेही कोणी बोलत नाही. आपण आत्ममग्न होऊन आपल्याच पराक्रमाची गाथा मुलांना पिढ्यान्पिढ्या ऐकवीत आलेलो आहोत. कदाचित साम्राज्यवादाचा प्रतिकार करणाऱ्या लोकांना स्वतःच्या साम्राज्यातील अन्याय आणि पिळवणूक यांची मनस्वी चीड येत नसेल, उलट आपल्या देशाचे मोठे साम्राज्य नाही या गोष्टीची खंतच जास्त वाटत असेल.
माधव ज्युलियन, गोविंदाग्रज आणि कोल्हटकर यांच्या कवितांमधून मराठी भाषा आणि महाराष्ट्र देशाची अस्मिता जागृत होतेच; परंतु अलीकडल्या कवींमध्ये वसंत बापटांच्या ‘केवळ माझा सह्यकडा’ या कवितेनेही मराठी मनाला प्रभावित केलेले आहे. त्या कवितेच्या तपशीलात मी जात नाही, पण मराठी बाण्याचे सार आणि महाराष्ट्राची नाडी त्यांनी आपल्या लयबद्ध आणि चपखल शब्दांतून अगदी अचूकपणे पकडलेली आहे. थोडक्यात सांगायचे तर, वरील उद्धृत केलेल्या अनेक काव्यपंक्तींतून एक गोष्ट मात्र नक्की सांगता येईल, ती म्हणजे राज्यशास्त्राच्या भाषेत बोलायचे तर महाराष्ट्र हे एक राष्ट्र आहे.
परंतु महाराष्ट्र राष्ट्र हे कोणत्या अर्थाने आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याला राज्य आणि राष्ट्र यातील मूलभूत फरक समजून घेणे आवश्यक आहे. राज्य ही कायद्यामुळे अस्तित्वात आलेली संस्था आहे, त्यामुळे राज्याचे अस्तित्व juridical किंवा कायद्यावर आधारलेले असते. राज्य निर्माण करण्यासाठी चार अनिवार्य घटकांची आवश्यकता असते. ते म्हणजे लोकसंख्या, भूभाग, सार्वभौमत्व आणि सरकार. एका विशिष्ट भूभागावर राज्यातील लोक राहतात, ज्यावर त्यांचे सार्वभौमत्व असते आणि सरकार हे राज्याच्या हातातील एक हत्यार (agency, instrument) असते. ज्याच्यामुळे धोरणांची अंमलबजावणी होते. नेहमी राज्याकडे कायदेशीर ताकद असते. (legitimate physical force) याचा अर्थ अशा ताकदीचा वापर करायला नागरिकांची संमती असते. अर्थात हा नियम हुकुमशाही किंवा लष्करशाही राजवटीला लागू होत नाही. परंतु सरकारे आपल्या हातातील शक्तीचा उपयोग करून राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आणायचा प्रयत्न करतात. त्यामुळे राज्यांतर्गत फुटीर प्रवृत्ती किंवा संघटना किंवा परकीयांच्या आक्रमणापासूनही राज्य आपल्या नागरिकांना संरक्षण देते. शेवटी असेही नमूद करणे जरूरीचे आहे की, जेव्हा इतर राज्ये एखाद्या राज्याला कायदेशीर मान्यता देतात, तेव्हाच राज्य म्हणून ते पूर्णत्वाने आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात येते. ही गोष्ट एक उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. पाकिस्तानात १९७१मध्ये गृहयुद्ध सुरू झाले, तेव्हा पूर्व पाकिस्तानने बांगला देश राज्य स्थापन केल्याची घोषणा केली. पाकिस्तानशी १९७१च्या डिसेंबरमध्ये युद्ध सुरू करण्यापूर्वी भारताने बांगलादेश या राज्याला अधिकृत मान्यता दिली आणि तशी कायदेशीर मान्यता दिल्यावरच बांगला देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाला पाठिंबा उघडपणे द्यायला सुरूवात केली. आज जगातील सर्व देशांनी बांगला देशाला मान्यता दिली आहे आणि ते राज्य – राष्ट्र म्हणून अस्तित्वात आले आहे.
पाकिस्तानच्या विघटनानंतर काही गोष्टी प्रामुख्याने सिद्ध झाल्या. पहिली म्हणजे कोणतेही राज्य भौगोलिक दृष्ट्या सलग असणे महत्त्वाचे आहे, त्याशिवाय ते टिकू शकणार नाही. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानमध्ये १२०० मैलांचे अंतर होते. दुसरी गोष्ट म्हणजे धर्माच्या आधारावर राजकारण करून दोन वेगवेगळ्या संस्कृतीच्या लोकांना राष्ट्राच्या स्वरूपात बांधता येत नाही. पश्चिम पाकिस्तानात उर्दू, सिंधी आणि पंजाबी भाषा बोलल्या जातात, तर पूर्व पाकिस्तानात बंगली भाषा बोलली जात असे. स्वातंत्र्यानंतर पूर्व पाकिस्तानावर उर्दू भाषा लादली गेली. त्यामुळे बंगाली भाषक लोकांची अस्मिता दुखावली गेली. बंगाली भाषेच्या मान्यतेसाठी आणि अस्तित्वासाठी १९५०च्या दशकात पूर्व पाकिस्तानात खूप जोरदार चळवळ झाली. १९५२च्या फेब्रुवारीमध्ये काही बंगाली तरुणांनी बंगाली भाषेसाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांची उर्दूप्रमाणेच बंगालीला राजभाषेचा दर्जा द्यावा ही मागणी होती. अखेर तशी मान्यता मिळाली. आजही २१ फेब्रुवारी हा बांगला देशमध्ये भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. असे बांगलादेश हा राज्य आहे आणि राष्ट्रही आहे. राज्य आणि राष्ट्र या संकल्पनांमधील फरक खालीलप्रमाणे सांगता येईल.
राज्य ही कायद्यामुळे अस्तित्वात येणारी संस्था आहे, परंतु राष्ट्र मात्र सायको-कल्चर किंवा सायको- सांस्कृतिक वास्तवता आहे. आपण राष्ट्र किंवा देश आहोत असे एखाद्या भौगोलिक भागातील लोकांना आतून वाटते. भाषा, संस्कृती धर्म, इतिहास, वंश आणि असे अनेक घटक मानसिक दृष्ट्या या लोकांना जोडतात आणि त्यांच्यातील राष्ट्रभावना दृढ होत जाते. राष्ट्र आपल्या मनात असते आणि कल्पनेतही असते. राष्ट्राच्या संकल्पनेला नेहमीच कायद्याचा आधार नसतो. श्रीलंकेतील उत्तरेकडे आणि उत्तरपूर्वेकडे राहणाऱ्या तामिळ भाषक-वंशाच्या लोकांना आपण एक राष्ट्र आहोत, अशी तीव्र जाणीव होत गेली आणि त्यातूनच तिथे 1983 पासून ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ एलाम (एलटीटीइ)’ सारख्या दहशतवादी संघटनांनी स्वतःच्या राष्ट्रासाठी स्वतंत्र राज्य मिळवण्यासाठी सशस्त्र संघर्ष केला. पण आपल्या देशाचे अखंडत्व टिकवण्यासाठी श्रीलंकेच्या तत्कालीन सरकारने अखेर तो संघर्ष मोडून काढला. श्रीलंकेचे अखंडत्व टिकवण्यासाठी अथवा तामिळ लोकांच्या नवराष्ट्र निर्मितीसाठी एकंदरच दोन्ही बाजूंनी श्रीलंकेमध्ये खूप हिंसा झाली. अर्थात राष्टनिर्मिती किंवा राष्ट्र संरक्षण होताना हिंसा ही होतेच. कारण राष्ट्र हे ‘आपण’ आणि ‘इतर’ या अस्मितेच्या
आधारावरच उभे असते. आपण आणि इतर यांच्यातील अंतर वाढले की, हिंसा ही अगदी अपरिहार्य होते.
किंबहुना ‘राज्य’ आणि ‘राष्ट्र’ यांचे परस्परसंबंध खूप जटिल (कॉम्प्लेक्स) आहेत. आणि जगातील प्रत्येक भागात त्याचा वेगळा प्रत्यय येतो. उदाहरणार्थ, आफ्रिकेतील अनेक देश जेव्हा स्वतंत्र झाले, तेव्हा तिथे राज्ये अस्तित्वात आली आणि अशा राज्यांच्या भौगोलिक सीमातच राष्ट्र बांधणीला सुरुवात झाली. जवळजवळ प्रत्येक राज्यात अनेक वंशांचे (Ethnic, tribal groups) समूह, भिन्न भाषा किंवा डायलेक्स आणि धर्म अस्तित्वात होते. त्या सर्वांना राज्याची अखंडता टिकवून एकत्र करण्याचे आव्हान फारच मोठे होते. काही मोठ्या राज्यात ते पेलणे अशक्यप्राय झाले, म्हणून सुदान आणि इथिओपिया हे देश फुटले आणि त्यानंतर दक्षिण सुदान आणि इरिट्रीया हे देश त्यातून निर्माण झाले. अनेकदा एकापेक्षा अधिक राज्यांत एखाद्या समुदायाला आपण राष्ट्र आहोत अशी जाणीव असते, पण त्यांच्याकडे स्वतंत्र राज्य नसते. आज कुर्ड वंशाचे लोक इराण, इराक, टर्की अणि सिरियात राहतात आणि त्या सर्वांची कुर्दिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र राज्य (नेशन – स्टेट) बनवण्यासाठी चळवळ चालू आहे आणि त्यांना आपले राज्य मिळेल, तेव्हाच ते मनोरथ पूर्ण होईल.
जगातील वरील घडामोडींचा विचार केल्यावर पुन्हा असा प्रश्न पडतो की, मराठी भाषा आणि महाराष्ट्र देश याकडे जगाच्या आणि भारताच्या दृष्टीने कसे बघता येईल.
जगाच्या दृष्टीने विचार केला, तर प्रथम आपल्याला आपल्या शेजारच्या म्हणजे बांगलादेश व पाकिस्तान या देशांबद्दल विचार करावा लागेल. पूर्व आणि पश्चिम बंगाल अगर भाषेच्या आधारावर तपासले, तर त्यांचे राष्ट्रीयत्व (नॅशनॅलिटी) एकच आहे. रवींद्रनाथ टागोरांची सुप्रसिद्ध कविता ‘आमार शोनार बांग्ला आमी तोमाय भालो बाशी’ हे आज बांगला देशाचे राष्ट्रगीत आहे. एकेकाळी १९०५च्या फाळणीनंतर पूर्व आणि पश्चिम बंगालमध्ये दुरावा निर्माण झाला. फाळणीनंतर १९४७मध्ये बंगाल हा देश भारत आणि पाकिस्तानात विभाजित झाला आणि आज बंगाली राष्ट्रीयत्वाचे लोक भारत आणि बांगला देशात आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या विभाजनानंतर पंजाबी राष्ट्रीयत्वाचे लोक पश्चिम पाकिस्तानात आणि भारतात विभाजित झाले.
दुसरे म्हणजे कधीकधी एका राज्यात अनेक राष्ट्र / देश असतात. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडमध्ये फ्रेंच, जर्मन आणि इटैलियन भाषा बोलणारे नागरिक आहेत आणि त्यांचे राष्ट्रीयत्वही फ्रेंच, जर्मन आणि इटॅलियन आहे. तसेच सोव्हिएट रशिया या संघराज्यातही १००हून अधिक राष्ट्रे होती, म्हणून त्याला बहुराष्ट्रीय राज्य मानले जात असे.
सोव्हिएट युनियनमध्ये रशियन भाषेचे वर्चस्व होते. रशियन भाषा ही सर्व संघराज्यांच्या घटकांना जोडणाऱ्या दुव्यासारखी वापरली जात असे. सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतरही बेलारूस, किर्गीस्तान, अझरबैजान, इस्टोनिया, जॉर्जिया, लॅटिव्हीया, मोलडोव्हा इत्यादी देशांत आजही रशियन भाषेचा संवादासाठी वापर केला जातो. देशाच्या निर्मितीसाठी भाषा हा एक महत्त्वाचा घटक असतो, परंतु केवळ एक घटकावर देशाची संकल्पना अस्तित्वात येत नाही. भाषा, इतिहास, धर्म, संस्कृती, सभ्यता, वंश इत्यादी अनेक घटकांच्या विलक्षण संमिश्रणामुळे लोकांना देशाची जाणीव होते. त्यामुळे सोव्हिएट युनियनची १९१७मध्ये स्थापना झाल्यावर लेनिन आणि स्टॅलिनसारख्या नेत्यांना तेथील अस्तित्वात असलेल्या शंभरपेक्षा अधिक देशांबद्दल विचार करावा लागला आणि राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नावर धोरण आपल्या मार्क्सवादी चौकटीत निश्चित करावे लागले.
स्वित्झर्लंड आणि सोव्हिएट युनियनसारखी बहुराष्ट्रीय राज्ये बघितली की, भारताला आपण कुठे बसवू शकू? भारतातही एका राज्याच्या अंमलाखाली अनेक राष्ट्रे आहेत का? भारत बहुराष्ट्रीय राज्य आहे की भारत एक देश होण्याचा प्रयत्न करत आहे (नेशन इन द मेकिंग)? भारतात सिव्हिलायझेशनचे राज्य आहे का? मला असे जरूर वाटते की, महाराष्ट्र, बंगाल आणि तामिळनाडूमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना इतर म्हणजे कर्नाटक, ओडिशा इत्यादी राज्यांपेक्षा प्रबळ आहे. भारत आपले अस्तित्व टिकवून आहे. कारण तेथील अखंडतेचे आणि एकतेचे संरक्षण करताना शक्यतो विविधता जोपासली गेली आहे.
भारताच्या विविधतेला जेव्हा तडा जातो, तेव्हा लोक अस्वस्थ होतात. पण त्या विविधतेच्या चौकटीत स्वायत्ततेच्या मागण्या झालेल्या आहेत. भाषावार प्रांतरचनेमुळे १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्राचा उदय झाला. अर्थात विविधता जपताना कधी सक्ती व्हायला लागली, तर प्रश्न सुटेनासे होतात. तामिळनाडूमध्ये हिंदी भाषा लादायचा प्रयत्न केला गेला, तेव्हा १९६०च्या दशकात लोक संतापले होते आणि आजही शांत बसणार नाहीत. हिंदी बोलणाऱ्यांची संख्या खूप जास्त असली, तरी इतर भाषांकडे दुर्लक्ष झाले किंवा हिंदी इतर भाषिकांवर लादली गेली, तर त्यातून तणावच निर्माण होतील. सामंजस्य नसले, तर एका भाषेच्या आग्रहाचा खूप तोटा होऊ शकेल.
मला आठवतंय, एक मराठी भाषिक म्हणून शाळेत असताना आमच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषा शिकायलाच लागल्या. त्या सक्तीच्या भाषा होत्या. परंतु मी जेव्हा उत्तर प्रदेशात राहिलो, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, तेथील बहुतांश विद्यार्थ्यांना हिंदीखेरीज दुसरी कोणतीही भाषा नीट येत नाही. भारतातील इतर भाषांशी तिथल्या विद्यार्थ्यांची तोंडओळखसुद्धा नाही. शिवाय १९६०च्या दशकापासून वर्षानुवर्षे ‘अंग्रेजी हटाओ’ या चळवळीने / धोरणाने तेथील विद्याथ्यांचे अमाप नुकसान झाले आहे. त्यांना इंग्रजी समजत नाही, मग बोलता कशी येणार? इंग्रजी भाषा हिंदीतून शिकवण्याचे पराक्रम आणि तेही एम.ए.च्या वर्गात प्राध्यापकांना करताना मी बघितले आहेत.
मला असे वाटते की, भारतात राहायचे असेल तर सर्वच लोकांनी बहुभाषिक व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. मातृभाषेखेरीज अनेक भाषा आपण शिकलो, तर अनेक नव्या विश्वांची आपल्याला कळत-नकळत ओळख होत जाते. परंतु जसा बहुभाषिक होण्याचा प्रयत्न व्हावा, तसा अजूनही आपल्या देशात होत नाही आहे. या संदर्भात हिंदी भाषिक लोक इतर भाषा बोलल्या की कशी प्रतिक्रिया देतात, हे लक्षात घेण्यासाठी मी माझे काही अनुभव सांगतो.
मी १९७०च्या दशकात पहिल्यांदा दिल्लीला गेलो, तेव्हा अस्सल हिंदी भाषिक लोक माझ्या मराठीसारख्या हिंदीची चेष्टा करीत असत. आमच्या वसतिगृहात बंगाली, मराठी अगर दक्षिणेकडील भाषा कोणी बोलल्या, तर हिंदी भाषिक विद्यार्थी ‘राष्ट्रभाषा’ बोला असे आवर्जून अगर ठणकावून सांगत असत. समूहात असल्यावर अर्थातच सर्वांना कळणारी भाषा बोलली जावी, पण ती जोडणारी भाषा हिंदी असावी की इंग्रजी असावी यावर त्या काळात आमचे वरचेवर प्रेमाचे वादविवादही होत असत.
दुसरा अनुभव म्हणजे मी अलाहाबादला कुलगुरू होतो तेव्हाचा आहे. तिथे मी जेव्हा पहिलीच कार्यपरिषदेची मीटिंग बोलावली, तेव्हा परिषदेतील एक सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री सत्यप्रकाश मालविय यांनी मला मीटिंगमध्ये हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह केला आणि सर्व मीटिंगच हिंदीमध्ये घेतली जावी अशी सूचना केली. का कोणास माहीत, पण त्या क्षणीच मला माधव ज्युलियन यांच्या खालील ओळी आठवल्या. ‘जरी मान्यता आज हिंदीस देई उदेले नवे राष्ट्र हे हिंदवी मनाचे मराठी मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी’
मला वरील ओळी आठवल्या, कारण मालवियांच्या स्वरात मला कुठे तरी सक्ती आणि बहुसंख्य लोकांची भाषा असलेल्या हिंदीपणाचा एक उद्दामपणा जाणवला. मी चटकन म्हणालो, ‘मराठी माझी राष्ट्रभाषा आहे आणि मी मराठीतून बोललो, तर तुम्हा सर्वांना कसे वाटेल? केंद्रीय विद्यापीठात कुलगुरूंनी केवळ हिंदीत बोलणे ही कल्पना मला सहन होत नाही. कारण अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठ झाल्यामुळे आपल्या विद्यापीठात दक्षिणेकडूनही नोकरवर्ग, प्राध्यापक आणि विद्यार्थी यायला सुरुवात होणार आहे. इंग्रजीतून कामकाज करण्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. अर्थात मीटिंगमध्ये ज्यांना आपले विचार हिंदीमधून व्यक्त करावेसे वाटतात त्यांनी ते जरूर करावेत.’
अनेक अर्थानी भाषेचा प्रश्न खरोखर नाजूक आहे. मी हिंदी प्रदेशात वावरलो, तरी मराठी भाषेवरचे प्रेम आणि महाराष्ट्र देशाची ओढ मला कायमच वाटत होती. तरीसुद्धा आपण हिंदी भाषिक लोकांत आहोत, याची मला पुरेपूर जाणीव होती. अलाहाबादच्या वास्तव्यात मी हळूहळू जाहीर सभांतून हिंदीमध्ये बोलू लागलो आणि हिंदी भाषेतून एम. ए. च्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र शिकवू लागलो. कारण आपल्या आजूबाजूला ज्या भाषेतून संवाद किंवा विचारांची देवाणघेवाण होते, ती भाषा आपल्याला अवगत असावी असे माझे प्रामाणिक मत आहे. तरीही कुठेही हिंदी लादायचा प्रयत्न झाला की, मी अस्वस्थ होतो. कधीकधी यू.जी.सी.च्या समित्यांवरही भारताच्या उत्तरेकडचे सदस्य थेट हिंदीतून बोलायला सुरुवात करतात आणि दक्षिणेतून आलेल्या सदस्यांना त्यांचे विचार चटकन समजत नाहीत.
मला असे वाटते की, हिंदी भाषिक लोक जर इतर भाषांचा आदर करू लागले, तर परिस्थिती बदलू शकेल. त्यांनी मल्याळम, कन्नड किंवा तामिळ भाषा शिकायचे धाडस का करू नये? असे धाडस केले नाही, तर हिंदी व्यतिरिक्त भाषा बोलणाऱ्या लोकांना दिलासा कसा मिळेल? भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांना समजण्याची, एकमेकांच्या भाषा आत्मसात करायची आणि विविधतेला सामोरे जाण्याची आज फार मोठी गरज अहे. एकता, समरसता किंवा इमोशनल इंटिग्रेशनच्या अशा नुसत्या गप्पा मारण्यात काय अर्थ आहे? याच संदर्भात साने गुरुजींची आंतरभारतीची कल्पना किती सार्थ होती, या गोष्टीचा मला अनेकदा प्रत्यय आला आहे.
अखेर भाषा हे मूलतः संवाद साधण्याचे आणि विचारांची किंवा भावनांची देवाणघेवाण करण्याचे मुख्य साधन आहे. आपल्या देशात अनेक समृद्ध भाषा आहेत. त्यामुळे आपल्या भाषेबद्दल वृथा अभिमान बाळगणे किंवा इतर भाषांना आणि त्या बोलणाऱ्या लोकांना कमी लेखणे यातून काहीही साध्य होणार नाही. परस्परांचा आदर करून आपण जितके शिकतो, तितके दुसऱ्याला कमी लेखून कधीच शिकत नाही. राष्ट्र किंवा देश अशा संकल्पनेकडेसुद्धा मानवतेच्या चष्म्यातून बघितले पाहिजे. संकुचित राष्ट्रवादापेक्षा मानव जात आणि मानवतावाद ह्या दोन्ही गोष्टी श्रेष्ठ आणि मोठ्या आहेत. ज्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेत स्वातंत्र्य, बंधुभाव आणि मानवी अधिकारांना स्थान नाही, तसा राष्ट्रवाद कितपत टिकू शकेल?
भारत स्वतंत्र झाल्यावर भारताने साम्राज्यवादी आणि वंशवादी विचारांशी आणि राजवटींशी लढणाऱ्या संघटना आणि चळवळींना खूप नैतिक पाठिंबा दिला. जसा जसा भारत बलवान देश झाला, तसा मटेरिअल सपोर्टही दिला. अर्थात पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारताचा राष्ट्रवाद संकुचित नव्हता. त्याला आंतरराष्ट्रीयतेची आणि मानवतावादाची झालर होती. म्हणूनच स्वतंत्र भारताने दक्षिण आफ्रिकेच्या वंशवादी राजवटीला संयुक्त राष्ट्रसंघात आणि राष्ट्रकुल परिषदेत कडाडून विरोध केला. भारताने घेतलेला पुढाकार आणि तटस्थ राष्ट्रांकडून भारताला मिळाला पाठिंबा यांमुळे 1961 मध्ये दक्षिण आफ्रिकेची राष्ट्रकुल संघातून हकालपट्टी झाली होती. त्याचप्रमाणे 1986 नंतर भारताने दक्षिण आफ्रिकेच्या वंशवादी धोरणाला विरोध करणाऱ्या आफ्रिकेतील झांबिया, टांझानिया, मोझांबिक, अंगोला इत्यादी आघाडीच्या राष्ट्रांना ‘अफ्रिका फंडा’तून मदत केली होती.
शेवटी कोणतीही भाषा आणि देश यांचे आपल्या दृष्टीने महत्त्व आहेत. परंतु भाषा, धर्म, प्रांत आणि राष्ट्र यांची कुंपणे स्वतःभोवती बांधून आपण जगू शकत नाही. कारण आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे आणि राजकारणामुळे आपण जगाशी जोडलेले असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्याला नव्या गोष्टी आत्मसात करणे जरूरीचे आहे. म्हणूनच चांगल्या शिक्षणासाठी आपली मुळे आणि त्यांचा पाया खूप भक्कम आणि सखोल असला पाहिजे. परंतु अशा पायाच्या साखळदंडाने स्वतःच्या मनाला आपण बांधून ठेवले, तर आपली प्रगती कशी होणार? उत्तम पायाबरोबरच आपण गरुड पंखांचे वरदान मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपले पाय जमिनीवर रोवलेले असले, तरी पंखांच्या वरदानाने गरुड भरारी मारण्याची धमक आपल्यात असायला हवी. तरच कलात्मक, सुंदर, सुसंस्कृत आणि समृद्ध जीवन आपल्याला जगता येईल; जे कूपमंडूकतेने ग्रासलेल्या मानसिकतेपेक्षा अतिशय मनोहर असेल.
थोडक्यात सांगायचे, तर काही कवितांच्या आधारावर माझे मराठी भाषा आणि महाराष्ट्र देश यांवरील विचार आणि प्रेम मी व्यक्त केले. अशा कवितांमुळे माझ्यातील मराठी अस्मिता विकसित झाली आणि माझ्या जगण्याला आधारही लाभला. महाराष्ट्र कसे राष्ट्र आहे किंवा भारत हे बहुराष्ट्रीय राज्य आहे का? या प्रश्नावर मी जरूर विचार केला. परंतु जागतिक राजकारणाच्या आखाड्यात आणि रहाटगाडग्यात अनेक राज्ये, राष्ट्रे, राष्ट्र राज्ये किंवा राज्य राष्ट्रे निर्माण झाली, पुढेही होतील आणि संपुष्टातही येतील याची मला जाणीव आहे. त्यांच्याकडे शेकडो वर्षांच्या मानवी इतिहासाचा एक भाग म्हणूनच बघितले पाहिजे. परंतु भाषा मात्र जास्त काळ टिकतील. भाषा ही अस्मितेची खूण म्हणून राहील. पण अशी अस्मिता वाढविताना आपण मानवी मूल्यांना विसरून चालणार नाही. आपण संकुचित विचारांच्या आहारी गेलो नाही आणि आधुनिक जगात वावरताना एक विशाल दृष्टी ठेवून सर्व विविधतेच्या लाटांवर तरंगलो, त्यांना कवेत घेतले आणि त्यांच्यातील आदर्श कल्पना आत्मसात केल्या किंवा समजून घेत गेलो; तर आपल्यात मूलभूत बदल घडेल. शेवटी आपल्या स्वतंत्र कल्पनाविश्वात आपण आपलेपण टिकवून वैविध्याला स्थान दिले, तर भाषा आणि देशाकडे बघण्याची नवी दृष्टी आपल्याला मिळेल, ज्यातून आपले आयुष्यच एखाद्या मोहक इंद्रधनुष्यासारखे वाटेल आणि दिसेल हेच खरे!
सौजन्य : साप्ताहिक साधना


