Uncategorized

रत्नागिरीत २९ फेब्रुवारीला पत्रकारांसाठी ‘वार्तालाप’

रत्नागिरी : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पत्र सूचना कार्यालयातर्फे (मुंबई) २९ फेब्रुवारीला रत्नागिरी येथे एकदिवसीय ‘वार्तालाप’ माध्यम कार्यशाळेचे आयोजन शासकीय विश्राम गृहासमोरील हॉटेल सिल्व्हर स्वान येथे करण्यात आले आहे. ‘कोकण क्षेत्राचा शाश्वत आणि सर्वंकष विकास’ या विषयावर आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन सकाळी ९.४५ वाजता जिल्हाधिकारी एम देवेन्दर सिंग आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी-स्वामी आणि सहाय्यक संचालक निकिता जोशी उपस्थित राहणार आहेत.
भारत सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांबाबतच्या माहितीच्या प्रसाराचे कार्य करणारी पत्र सूचना कार्यालय ही एक महत्वपूर्ण संस्था आहे. हे कार्यालय थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रसारमाध्यम यांच्यातील मुख्य दुवा आहे. या कार्यशाळेत सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत विविध सत्रे होतील. यात ‘समुद्रातील जीवांच्या सुरक्षिततेला प्रोत्साहन : भारतीय तटरक्षक दल (डब्ल्यू.आर)’ या विषयावर तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे जनसंपर्क अधिकारी कमांडंट राजेश धौलखंडी यांचे सादरीकरण होईल. ‘शाश्वत स्थानिक उपक्रमांद्वारे कोकण प्रदेशातील पर्यटन क्षमता खुली करणे : भारतीय पर्यटन’ या विषयावर मुंबई पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक संचालक डी. वेंकटेशन मार्गदर्शन करतील. कोकणातील उपजीविका निर्मितीला चालना देण्यासाठी ‘कौशल्य विकास : कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय’ या विषयावर कौशल्य विकास मंत्रालयाचे (मुंबई) संयुक्त संचालक अभय महिषी हे मांडणी करतील.
शेवटच्या सत्रात ‘ग्रामीण भागातील माध्यमांचे विकासात्मक संवादात योगदान आणि जनसेवेसाठी माध्यमांना पीआयबीची कशी मदत होईल’ या विषयावर पत्र सूचना कार्यालयाच्या सहाय्यक संचालक निकिता जोशी मार्गदर्शन करणार असून शासकीय योजनांच्या लाभार्थींच्या अनुभव कथनाने कार्यशाळेचा समारोप होईल.

कार्यक्रमाची माहिती
कार्यक्रम : वार्तालाप एक दिवसीय माध्यम कार्यशाळा
तारीख : गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४
वेळ : सकाळी ९.१५ ते सायंकाळी ४.३०
ठिकाण : हॉटेल सिल्व्हर स्वान, शासकीय विश्राम गृहासमोर, रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button