पाच वर्ष पक्ष बदलणार नाही याची हमी घेऊनच मतदान करा ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले
फॅसिस्ट शक्तीच्या उन्मादाला रोखा

रत्नागिरी :
पाच वर्ष राजकिय पक्ष सोडून अन्यत्र जाणार नाही अशी हमी घेऊनच मतदार करा तरच सांप्रदायीक शक्तींना रोखत हा देश संविधानाचे रक्षण करु शकेल. आणि ही ताकत फक्त आणि फक्त मतदारांच्या विवेकातच आहे. हा विवेकाचा जागर प्रज्वलीत करणे आपले आणि या चळवळीचे काम आहे असे प्रतिपादन जेष्ट पत्रकार निरंजन टकले यांनी केले.
भयाची, दहशतीची पेरणी करणे, जात-धर्म-पंथ यातून फूट पाडणे, जुने वाद उकरुन काढणे अशा अनेक माध्यमातून समाजामध्ये दुही माजवून आपले काम साध्य करणे हे सुरुच असून, विरोधकांचा आवाज क्रूरपणे मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेतकर्यांच्या आंदोलनातून सर्वसामान्य नागरिकांनी धडा घेणे आवश्यक असून, शेतकर्यांनी ज्या पद्धतीने योग्य सिस्टीममधून जुलमी सरकारला धडा शिकवला तसाच धडा फॅसीस्ट विचारसरणीला सिव्हील सोसायटीने शिकवायला हवा, यासाठी २०२४ ही डेडलाईन नसुन ही प्रक्रिया काही वर्षे चालू ठेवावी लागेल तेव्हाच फॅसिस्टचा पराभव होऊ शकतो. यासाठी मतदारांनीचीही भूमिका महत्वाची आहे, उन्मत्त शक्तीला रोखायचे असेल तर मतदारांनाही महाआघाडी करावी लागेल, असे आवाहन ज्येष्ठ शोध पत्रकार आणि हू किल्ड जस्टीस लोया? या पुस्तकाचे लेखक निरंजन टकले यांनी केले.
एस. एम. जोशी विद्यानिकेतन येथे पार पडलेल्या राष्ट्रसेवा दलाच्यावतीने आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या शोध पत्रकारीतेचा प्रवास आणि जीवनातील अनेक प्रसंग सांगितले. सत्य सांगा आणि सैतानाला उघडे पाडा या उक्तीप्रमाणे न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता हे जगासमोर आणण्याचा चंग बांधून काही झाले तरी देशातील सर्व शक्तीमान, शक्तीपुढे झुकायचे नाही असे ठरवून मी कामाला लागलो. न्या. लोया यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सर्वच लोक भयभीत झाले होते. पुत्र, कन्या सारेच हतबल झाले होते. मात्र अशा परिस्थितीत त्यांची भाची नुपूर बियाणी मला पुण्यात माझा मित्र जयंत सोनावणे याच्यासोबत भेटायवयास आली. तिने माझा सावरकर यांच्यावरील लेख तसेच २००८मधील धुळ्यातील दंगलीचे कव्हरेज पाहून तिने मामाच्या खुनाचा घटनाक्रम माझ्यासमोर विशद केला. मामाच्या खुनाला वाचा तुम्हीच फोडू शकता, असा विश्वास तिने माझ्यात निर्माण केला. येथूनच न्या. लोया यांच्या रहस्यमय मृत्यूचा शोध सुरु केला, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ज्यावेळी या घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून मला ट्रोलिंग करण्यात आले, छळ करण्यात आला, माझा पाठलाग करण्यात आला, अनेक बिकट प्रसंगांना मला सामोरे जावे लागले. परंतु माझ्या वडील आणि आजोबांनी दिलेल्या शिकवणीमुळे मी हे प्रकरण धसास लावण्याचा निश्चय केला. हू किल्ड जस्टिस लोया या पुस्तकाची सुरुवात १९७१च्या न्यायालयाच्या अवमानाबाबत कायद्यातील अनुच्छेद ५मधील तरतुदीनुसार कोणत्याही निकालाच्या खटल्यातील मुद्यांबद्दल काहीही टिप्पणी कुणी केल्यास तो न्यायालयाचा अवमान किंवा गुन्हा ठरु शकत नाही, या दाखल्याने केली असे त्यांनी सांगितले.
सोहराबुद्दीन केस चालवण्यासाठी सीबीआय विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. याचे पहिले न्या. जे. टी. उत्पात होते. त्यांची २०१४मध्ये बदली करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या २०१२च्या आदेशाचे हे उल्लंघन होते. उत्पात यांच्या जागी आणलेल्या न्या. लोया यांचा १ डिसेंबर २०१४च्या पहाटेस गूढ मृत्यू होतो. त्यांच्या जागी नवे आलेले एम. बी. गोसावी यांनी १५ डिसेंबरला सूत्रे हातात घेऊन २ दिवसात निकाल लावून चौकशीविना मुख्य आरोपीला सोडणे हे संपूर्ण धक्कादायकच होते. ज्यावेळी हा निकाल लावला गेला त्यावेळी टीम इंडियाचा कप्तान महेंद्रसिंग याची टीम क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करण्यात आली. खेळ सुरु असताना टेस्ट मॅच मालिकेच्या मध्यावर असताना ही निवृत्ती धोनीने नव्हे तर गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरीने घोषित केली. जागतिक क्रिकेटमधील पहिलीच अशी घटना होती, हे सर्व विलक्षण होते असे ते म्हणाले.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी सोहराबुद्दीन केसचा हवा तसा निकाल देण्यासाठी माझ्या भावाला १०० कोटीची ऑफर दिली अशी माहिती न्या. लोया यांच्या भगिनींनी दिली असल्याचा गौप्यस्फोट यावेळी टकले यांनी केला. हे पुस्तक बायपास झाल्यानंतर मी पूर्ण केले परंतु पुस्तकाला प्रकाशक मिळत नव्हते. हे प्रकरण हाती घेतल्यानंतर नोकरीही गेली होती. कॅरावानमध्ये नोकरी धुडकावली गेली. काही ठिकाणी अपॉईंटमेट लेटर मिळाले परंतु हजर करुन घेत नव्हते. द वायर, हिंदू या जगप्रसिध्द प्रकाशनाने पुस्तक छापण्याचे आश्वासन देऊनही नंतर ते छपाईला नकार दिला. पेंेग्वीन रँडमनेही पुस्तक छापायला आवडेल असे कळवले मात्र तीन महिन्यात त्यांचा नकार आला. हे केवळ दबावामुळे आणि दहशतीमुळे झाले होते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. ज्या पध्दतीने नुपूर बियाणीने निर्भयतेने मामाच्या खूनाला वाचा फोडली त्याप्रमाणे सर्व नागरिकांनी देशात चालेल्या दहशतीविरोधात निर्भयपणे लढणे आवश्यक आहे. यासाठी आजच्या जनरेशनवरती काम करणे गरजेचे आहे. ही जनरेशनच लोकशाही टिकवू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी निरंजन टकले यांनी आपल्या शोधपत्रकारिता करताना अनेक किस्से सांगितले. गुजरात येथे रफीक कुरेशीचे रुप घेऊन त्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मार खाल्ला असल्याचे सांगितले.
हे व्याख्यान एम.एम. जोशी विद्यानिकेतन येथे २६ जानेवारीरोजी सायं. ५ वा. पार पडले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिजित हेगशेट्ये, जिल्हा संघटक युयूत्सू आर्ते, विलास कोळपे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे ओघवत्या शैलीत प्रा. सचिन टेकाळे यांनी निवेदन करुन रंगत आणली. प्रास्ताविकामध्ये अभिजित हेगशेट्ये यांनी राज्यघटना स्वीकारुन ७५ वर्षे झाली असताना संविधानाच्या वाटेत अनेक अडथळे निर्माण केले जात आहेत. यापासून आपण पुढे कसे जाणार आहोत असा प्रश्न पडतो. लोकशाहीचे चार स्तंभ हे संकटात आहेत. पत्रकारितेचा स्तंभ शिल्लक आहे की नाही असाही प्रश्न पडतो. अशा क्षणी चौथ्या स्तंभाची ताकद निरंजन टकले यांनी तेवत ठेवली. कोणतीही तडजोड न करता मोठ्या शक्तीला त्यांनी अंगावर घेतले. त्यांच्यासारखे पत्रकार आहेत म्हणूनच संविधान आहे असे सांगितले. यावेळी अध्यक्षीय भाषणात विलास कोळपे यांनी लोया यांचा खून न्यायाधीशांचा नसून अनेकांच्या बलिदानातून मिळालेल्या लोकशाहीचा होता असे सांगितले. त्यांनी यावेळी दिलीप सोळंके यांची फेसबुकवरील पोस्ट वाचून दाखवली. व्याख्यानानंतर अनेक मान्यवरांनी निरंजन टकले यांना प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी मोठ्या दिलखुलास मनाने त्यांनी सर्वांशी संवाद साधला. रात्री साठेआठ वाजता हे व्याख्यान मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.



