महाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

नवे गाजर! हाँगकाँग, सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा विकास!

मुंबई : सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्टय़े यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे. तसेच ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात 2028 पर्यंत किमान 10 हजार घरे बांधण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आढावा बैठक झाली. यावेळी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. धारावीचा पुनर्विकास करताना तेथील नागरिकांचे रोजगार आणि उपजीविकेचे संरक्षण करतानाच धारावीतील संपूर्ण औद्योगिक आणि सामाजिक व्यवस्था कायम ठेवण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

   नेचर पार्कची संकल्पना प्रत्यक्षात येणार

धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये नेचर पार्कची संकल्पना मांडण्यात आली असून ती प्रत्यक्षात उतरवण्यात यावी. तसेच या प्रकल्पात पर्यावरणाचे संतुलन राखताना झाडांचे पुनर्रोपण व नवीन झाडे लावण्याचे नियोजन करण्यात यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी लागणारे सर्व परवाने एकाच ठिकाणी व जलदगतीने मिळावेत यासाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात यावा. यासाठीची प्रक्रिया रिइंजिनीयरिंग करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात यावीत, अशाही सूचना देण्यात आल्या.

धारावीतील चर्मोद्योग, वस्त्रनिर्मिती, पुनर्वापर उद्योग, मातीची भांडी आणि खाद्यपदार्थ या प्रमुख उद्योगांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी विशेष एमएसएमई योजना तयार केली जात आहे. खाद्यपदार्थ उद्योगांसाठी आधुनिक ‘क्लाऊड किचन’ संकल्पना विकसित करण्याची योजना आहे.

प्रकल्पांतर्गत बीकेसी ते धारावी मार्गावरील परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मध्यभागी हरित पट्टा, पदपथ आणि आधुनिक वास्तुरचना विकसित केली जाणार आहे. तसेच बस डेपोच्या जागेवर आधुनिक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जाणार आहेत.

10 वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

येत्या दहा वर्षांत धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. धारावीतील पुनर्वसन इमारतींचे काम 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. माटुंगा परिसरातील पुनर्वसनासाठी 39 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

देशातील पहिला मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत देशातील पहिला अत्याधुनिक मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब उभारण्यात येणार आहे. या केंद्रातून पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेसह विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जाणार आहेत. भविष्यात बुलेट ट्रेनची जोडणीही धारावीपर्यंत आणण्याचा सरकारचा विचार आहे. या केंद्रात विमान प्रवाशांसाठी ‘सिटी चेक-इन’ सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे प्रवासी धारावीतच सामानाची नोंदणी करून नंतर एअरपोर्ट एक्सप्रेसच्या माध्यमातून विमानतळावर पोहोचू शकतील. याशिवाय विमानतळापर्यंत जलवाहतुकीसाठी फास्ट जेट्टी उभारण्यात येणार असून भविष्यातील हवाई टॅक्सी सेवांचा विचार करून व्हर्टीपोर्टही विकसित केला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे, मेट्रो, रस्ता, जलमार्ग आणि हवाई वाहतूक अशा सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

कुंभारवाडड्याचे अस्तित्व जपणार

धारावीतील कुंभारवाडा हा केवळ मातीच्या भांडय़ांचा व्यवसाय करणारा भाग नसून धारावीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा महत्त्वाचा घटक आहे. धारावीला भेट देणारे अनेक पर्यटक कुंभारवाडय़ालाही आवर्जून भेट देतात. त्यामुळे त्याचे वैशिष्टय़पूर्ण अस्तित्व कायम ठेवण्यासाठी संबंधितांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यात यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button