मुख्य बातमी

बाळाराम पाटलांची घोडदौड

कोकण शिक्षक मतदारसंघ

कोकण शिक्षक विधान परिषद मतदार संघाच्या येत्या ३० जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या निवडणूकीत शेकाप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या महायुतीचे उमेदवार, या मतदार संघातील  विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांनी प्रचारात जबरदस्त आघाडी घेतल्याचे चित्र असून, त्यांच्या पुनःश्च विजयाची खात्री त्यांचे कार्यकर्ते देत आहेत. त्याचवेळी रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी  युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या दक्षिण कोकणातील  प्रचाराची सुत्रे सर्वस्वपणे हाती घेत प्रत्येक तालूक्यातून संपर्क यंत्रणा राबवित निवडणूकीत विजयाच्या आत्मविश्वासाचा  रंग भरण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वाधिक महत्वाचा आणि प्रसंगी कळीचा ठरणार  ते युनायटेड जनतादलाचे उमेदवार धनाजी पाटील.  संपुर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावरील शिक्षक संघटेनत त्यांची असणारी मजबूत पकड त्यांना जबरस्त साथ देण्यासाठी शिक्षक आमदार कपिल पाटील स्वतः प्रचाराच्या रणांगणात कोकणात उतरले आहेत।

कोकण शिक्षक मतदार संघ हा ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग असा पाच जिल्ह्यांचा आणि ७०० किमी लांबीच्या किनारपट्टीचा मतदारसंघ. पारंपारीक हा भाजपचा बालेकिल्ला.  या मतदारसंघातून भाजपचे रामनाथ मोते प्रतिनिधीत्व करत होते.  त्यांचा संपर्कही जबरदस्त होता. त्यांचा पराभव करण्यासाठी यापुर्वीच्या २-३ निवडणूकांतून येथील शिक्षक संघटनांनी फार मोठी शक्ती लावली मात्र ते त्यात तग धरु शकले नाहीत.  २०१२ च्या निवडणूकीत शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे फक्त काही शे मतांनी पराभूत झाले।

२०१७ च्या निवडणूकीत भाजपने त्यांचे विद्यमान आमदार रामनाथ मोते यांना तिकीट नाकारात वेणूनाथ कडू यांना उमेदवारी दिली. याचा परिणाम भाजप या मतदारसंघातून पार फेकला गेला. त्यांच्या अधिकृत उमेदवाराला फक्त ३००० मते मिळाली तर भाजपचे बंडखोर उमेदवार रामनाथ मोते यांना तिसऱ्या क्रमांकाची ५९८८ मते मिळाली, शेकापचे- राष्ट्रवादी-काँग्रेसचे  उमेदवार  बाळाराम पाटील यांना ११८३७ मते मिळवून ते विक्रमी मतांनी विजयी झाले.  यावेळी अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दुसऱ्या क्रमांकाची ६८८७ मते मिळविली तर शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे यांना ४५३३ मते आणि टीडीएफचे नरसू पाटील यांना १२०० मते मिळाली.

ह्यावर्षीच्या मतदार नोंदणीनुसार पालघर- ९,०००, ठाणे- १५,७३६, रायगड- १०,०००, रत्नागिरी -४,३२८, सिंधुदुर्ग -२,४५६ अशी एकुण ४१,५२० मतदार नोंदणी झाली आहे. विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्या गेल्या सहा वर्षातील काम, आमदार म्हणून  संपर्क यातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी करुन घेतली आहे.  त्यांच्या या ताकदीला सोबत टीडीएफ ने त्यांना पाठींबा दिल्याने त्यांची २००० मतांची अधिकची बेगमी झाल्याचा त्यांचा दावा आहे. यामुळे ही निवडणूक किमान पंधरा ते सोळा हजार मते घेऊन ते जिंकून येतील असा त्यांना विश्वास आहे.

शिंदे (शिवसेना) गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रेची टक्कर ही अत्यंत ताकदीचीच म्हणावी लागेल.  मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी लढतांना त्यांनी फार मोठी कमाल केली होती.  कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसतांना त्यांनी ६८८७ मते आपल्याकडे खेचून आणली होती.  आज त्यांच्या जोडीला भाजपच्या निश्चित मतांचा कोठा आहे.  तसेच स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे सांगितले जात आहे.

या निवडणूकीत आमदार कपिल पाटील यांचा युनायटेड जनता चे उमेदवार धनाजी पाटील यांचा प्रभाव महत्वाचा आहे.  रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी ८० ते ९० टक्के मते आपल्याकडे खेचून घेण्याचे गणीत आहे.  त्याचवेळी आ.  कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांचा ठाणे, रायगड, पालघर  येथील संपर्क प्रभाव आणि शिक्षक पेन्शन प्रश्न या निवडणूकीची गणीते बदलू शकण्याची क्षमता अजमावत आहे. एकुणच निवडणूक अखेरच्या टप्यापर्यंत अत्यंत चुरशीची आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button