मुख्यमंत्र्यांचा दावोस दौर्यावर ४० कोटींचा खर्च ?
मुख्यमंत्र्यांनी दावोसमधलं त्यांचं वेळापत्रक समोर आणावं; आदित्य ठाकरेंचं खुलं आव्हान

शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात मोठा दावा केला. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा अधिकृत कार्यक्रम चार दिवसांचा होता. या कार्यक्रमावरील अंदाजे खर्च ४० कोटींएवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या २८ तासांचा खर्च ४० कोटी एवढा झाल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मविआ सरकारच्या दावोस दौऱ्याचं वेळापत्रक वाचून दाखवत दावोसला जाऊन तुम्ही काय केलं हे समोरासमोर बसून बोलूया, असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं.
आदित्य ठाकरे म्हणाले, दावोसमध्ये राज्य सरकारचा चार दिवसांचा कार्यक्रम होता. याचा खर्च ४० कोटी एवढा झालाय. यापेक्षाही अधिक खर्च असू शकतो. कारण तिकडे त्यांचा सर्व मित्रपरिवारही गेला होता. चार दिवसांचा खर्च ४० कोटी होत असेल तर एका दिवसाचा खर्च साडे सात कोटी ते १० कोटींच्या घरात आहे. याचाच अर्थ त्यांनी १० कोटींचा खर्च प्रत्येक दिवसाला केला आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.



