शिवरायांचं चरित्र कलंकित करणारे देशी मस्तक, विदेशी पुस्तक ✍️ ज्ञानेश महाराव (ज्येष्ठ पत्रकार- संपादक)

शिवरायांचं चरित्र कलंकित करणारे देशी मस्तक, विदेशी पुस्तक
✍️ ज्ञानेश महाराव (ज्येष्ठ पत्रकार- संपादक)
शिवराय आणि जिजामाता ह्यांचे चरित्र कलंकित करणारा विदेशी लेखक जेम्स लेन ह्याच्या वादग्रस्त पुस्तकाच्या प्रकाशकाने २३ वर्षांनी जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, “संघ- भाजप” परिवाराचा शिवचरित्राला बिघडवण्याचा सपाटा सुरूच आहे. ह्या हलकटपणाला टकमक टोक शिवभक्त कधी दाखवणार?
————————————-
स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? तर…
स्वराज्य क्रांती पणी लाविले, सर्व धर्म पंथ।
महान केला राष्ट्रीयतेचा,महाराष्ट्र धर्म॥
“भेदाभेद भ्रम अमंगल” हा संत तुकोबांचा संदेश आचरणात आणून शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी सर्व जाती-धर्मातील लोकांना “मावळे” म्हणून सज्ज केले. शिवरायांनी कधी जातीचा तोरा आणि धर्माचा ताठा दाखवला नाही; म्हणूनच ते सर्व “रयतेचे छत्रपती” झाले आणि काळाला पुरून उरले. असे असताना गेली काही वर्षे “संघ- भाजप”च्या अनेक गणंगांनी “शिवचरित्र” बिघडवण्याचा सपाटाचा लावलाय, तो अजूनही थांबत नाही. ताजी आगळीक “भाजप”चे केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी केलीय. गुजरातमध्ये “भाजप”ला मजबूत करण्याच्या कामातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा “खात्रीचा नेता” अशी सी.आर. पाटील यांची ओळख आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेला “मराठा समाज” राज्यातील राजकारणावर आपला प्रभाव पाडतो; तशीच करामत गुजरातेत “पाटीदार समाज” करतो. सी. आर. पाटील या समाजाचे आहेत. “पाटीदार” हा गुजरातमधील प्रमुख जमीनदार आणि शेतकरी समाज आहे. “लेवा” आणि “कडवा” ह्या पाटीदारांच्या प्रमुख उपजाती आहेत. हा संघटित समाज आहे. अनेक सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक केंद्रांच्या माध्यमातून त्यांचे समाज विकासाचे कार्य चालते. गुजरातेतील “लेवा पाटीदार” समाज महाराष्ट्रातील खानदेश भागात “लेवा पाटील” होतो. सुरत आणि धुळे-जळगाव पट्ट्यातील “लेवा पाटीदार” समाज व्यवसाय आणि नातेसंबंध यांनी जोडलेला आहे. सी.आर. पाटील ‘गुजराती’प्रमाणेच “खानदेशी मराठी”ही सफाईने बोलतात. सुरत शहरात मराठी व लेवा पाटीदार समाज मोठ्या संख्येने आहे. तेथील जाहीर सभेत बोलताना सी.आर. पाटील नुकतेच म्हणाले,”संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचं श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांना द्यायला हवं. सरदार पटेल हे पाटीदार समाजाचे होते. हेही सांगायला आनंद होतोय की, छत्रपती शिवाजी महाराज हेदेखील पाटीदार होते!”
शिवरायांना आपल्या जातीत कालवण्याचा खोटेपणा “भाजप”चा केंद्रीय मंत्री करीत असतानाच; मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील वॉर्ड क्रमांक १७५ मधील “भाजप” उमेदवाराच्या सभेचा व्हिडिओ सोशल मीडियातून फिरत होता. त्यात छत्रपती शिवराय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यांपुढे एक तरुणी अचकट विचकट हावभावात डान्स करताना दिसत होती. छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यावर “पोझ”मध्ये हात ठेवून फोटो काढून घेणाऱ्या राजश्री शिरवडकर यांनाही “भाजप”ने पुन्हा उमेदवारी दिली आहे. भंडारा नगरपालिका निवडणुकीत “भाजप”च्या महिला उमेदवाराने चौकातील शिवरायांच्या पुतळ्याच्या गळ्यात “भाजप”चा गमछा आणि जिरेटोपावर “भाजप”ची टोपी चढवण्याचा आगाऊपणा केला. शिवरायांना “आग्र्याहून सुटका” प्रकरणात “लाच” देणारे ठरवणारा अभिनेता राहुल सोलापूरकर आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना शिवराय व संभाजीराजांबद्दल अवमानकारी भाषा वापरणारा प्रशांत कोरटकर हे “संघ- भाजप परिवार”शी संबंधित असावेत, हा योगायोग निश्चितच नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या “ॲक्शन प्लान”मध्ये आघाडीचे वीर असलेल्या (विधान परिषद)आमदार प्रसाद लाड यांनी, तीन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाद निर्माण करणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांचे ‘बाप’ शोभावेत, असा पराक्रम केलाय ! शिवरायांचा जन्म “शिवनेरी”वर झाला असल्याचे जगजाहीर असताना प्रसाद लाड हे “शिवरायांचा जन्म रायगडावर झाला,” असं म्हणाले.
टिळकांनी शिवरायांच्या जन्मतिथी बरोबरच जन्मवर्षाच्या वादाचीही चूड लावली होती. वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ (म्हणजे ६ एप्रिल १६२७) की, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (म्हणजे १९ फेब्रुवारी १६३०) असा हा वाद होता. तो १०० वर्षं चालला. दरम्यान, आधी ‘फाल्गुन वद्य तृतीया’ ह्या तिथीवर एकमत झालं. त्यानंतर ’शिवजयंती’ तिथीने करायची की तारखेने करायची, यावर वाद सुरू झाला. तो २००१ पासून ‘शिवजयंती’ तारखेनुसार साजरी करायची, ह्या शासकीय निर्णयाने संपला.
अर्थात, हा वादाचा घोळ केवळ तिथी- तारखेचा नव्हता! तर शिवरायांच्या जन्मदात्याबद्दल प्रश्न निर्माण करणारा तो कुटिल, नीच, सनातनी डाव होता. तो पुणेरी ब्राह्मणी टोळक्याचा ‘डार्लिंग’ असणारा विदेशी संशोधक- लेखक जेम्स लेन याने उघड्यावर आणला. जी खाजगीत कुजबुज चालायची, ती त्याने ‘शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ ह्या पुस्तकात आणली. जेम्स लेन हा वाहक होता. त्याच्या माध्यमातून जिजाऊ- शिवरायांच्या चरित्राला ‘अफजुलखानी डंख’ अट्टल ‘कोब्रा’ नागांनी मारला होता. ह्या हरामखोरीचा समाचार मी कठोर शब्दांत वेळीच घेतला होता. (साप्ताहिक चित्रलेखा अंक : २२ डिसेंबर २००३) त्याने अस्सल मावळे जागे झाले. ‘संभाजी ब्रिगेड’च्या बॅनरखाली एकवटले आणि त्यांनी जेम्स लेनला तीन वर्षे पाहुणचार देणार्या पुण्यातल्या ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थे’वर हल्ला केला. हा हल्ला समर्थनीय नव्हता. पण तो का झाला, ह्याची चिकित्सा होणे आवश्यक होते. ती झाली नाही. तेव्हा आणि त्यानंतरही शिवचरित्राची छेडछाड करण्याचे प्रकार झाले; त्या प्रत्येक वेळी मी त्याचा समाचार घेतला. त्यामुळे लोकजागृती झाली. सनातनी हरामखोरीची चिरफाड करणारे लेखन मोठ्या प्रमाणात प्रकाशित झालं. त्यामुळे छत्रपतींच्या गाद्या सांभाळणाऱ्यांनाही आपल्या जबाबदारीचं भान आल्याचं चित्र दिसू लागलं. परिणामी, जेम्स लेन ह्याचं वादग्रस्त पुस्तक प्रकाशित करणाऱ्या “ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस”च्या प्रकाशकाने, आता २३ वर्षांनी संबंधित बदनामीकारक मजकुराबद्दल उदयनराजे भोसले यांची जाहिरातीतून माफी मागितली आहे. ती न्यायप्रविष्ट प्रक्रिया असल्याने तूर्तास इतकेच.
‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ह्या चित्रपटांच्या ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ आडून होण्याऱ्या इतिहासाच्या विकृतीकरणा विरोधात साताराचे छत्रपती उदयनराजे आणि कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी कठोर भूमिका घेतली होती. ती मराठेशाहीचा आब राखणारी होती. अशीच कठोर-निश्चयी भूमिका घेत दोघांनीही छत्रपती शिवरायांना “जुना-पुराना आयकॉन” ठरवणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांच्या राज्यपालपदाच्या खुर्चीखाली हकालपट्टीचे आग्रही सुरुंग लावले होते. सच्चे शिवभक्तही संतप्त झाले होते. मात्र, हा असंतोष भडकत असताना ‘भाजप’ नेत्यांनी तेव्हा राज्यपाल पदावर बसलेल्या कोश्यारींच्या बेतालपणा विरोधात निषेधाचे अवाक्षरही काढले नाही. उलट, तेव्हा मुंबई शहराचे ‘भाजप’ अध्यक्ष आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या ‘आग्र्याहून सुटका’ची तुलना ‘शिवसेना’मध्ये फूट पाडून सत्ताबदल घडवणाऱ्या सुरत- गुवाहटी- गोवा वारीशी केली! तर ‘भाजप’चे ‘राष्ट्रीय प्रवक्ते’ सुधांशु त्रिवेदी यांनी शिवरायांनी औरंगजेबला पाठवलेल्या तहनाम्यांची तुलना वि.दा. सावरकर यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमधून सुटका करण्यासाठी ‘बिटिश सरकार’ला पाठवलेल्या माफीनाम्याशी केलीय. प्रसाद लाड यांच्या म्हणण्यानुसार, “शिवरायांचा जन्म रायगडावर झाला!” तर दुसरे ‘भाजप’ आमदार गोपीनाथ पडळकर यांनी “अफजलखानाने शिवरायांचा कोथळा काढला,” असे अकलचे बिनडोक तारे तोडलेत! “शिवचरित्र”ची विटंबना करण्याची ही मालिका शिवरायांना “लेवा पाटीदार” करण्यापर्यंत पोहोचली आहे. हे अनवधानाने होतही असेल. परंतु, ते ‘संघ-भाजप’ परिवारातील नेत्यांकडूनच का होते? आणि छत्रपती शिवरायांच्या बाबतच का होते ? ह्या प्रश्नाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
विनायक दामोदर सावरकर यांना मौर्याची सत्ता नष्ट करणारा पुष्यमित्र शुंग आणि पेशवे महान वाटले; तर “शिवाजी कसला राजा; हा तर काकतालीय (म्हणजे, कावळा बसायला आणि फांदी तुटायला) न्यायाने झालेला राजा!” असे म्हणावेसे वाटले. ‘रा.स्व.संघा’चे ‘बायबल’ असलेल्या “विचारधन”मध्ये द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी संभाजीराजांना “मदिरा आणि मदिराक्षीमध्ये बरबाद झालेला छत्रपती” म्हणत, शिवरायांना ‘अपात्र पिता’ ठरवले आहे. जेम्स लेनच्या पुस्तकावर वाद भडकला होता, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते. त्यांनी जेम्स लेनमार्फत झालेल्या विकृतीला विचार ठरवून “विचाराची लढाई विचाराने करावी; पुस्तकावर बंदी घालू नये,” असा उपदेश केला होता. त्यावर शिवप्रेमींनी उद्रेक व्यक्त करताच वाजपेयींनी घुमजाव केले. अशीच वेळ प्रमोद महाजन यांच्यावर केंद्रीय मंत्री असताना आली होती. ते म्हणाले होते, “आमची सत्ता संपूर्ण देशभर आहे. शिवाजीराजांचे राज्य फक्त साडेतीन जिल्ह्यांपुरतेच होते!” मतांसाठी छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचे आणि सत्ता मिळाली की, छत्रपतींच्या चरित्राची विटंबना करायची, ही संघ संस्कारित ‘भाजप’ची वृत्तीच आहे.
ह्या दुष्मनीचे मूळ शिवरायांना स्वराज्याचं स्वप्न देणाऱ्या आणि ते साकार करण्यासाठी सर्वप्रकारचे मार्गदर्शन करणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक कार्यात आहे. “विजयनगर” वंशातल्या जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीच्या आड येणाऱ्या ब्राह्मण धर्माचे वर्चस्व हटवून समस्त बहुजनांचेही क्षत्रियीकरण केले. त्यामुळे साताराच्या नागेवाडीचा नागनाक महार गडरक्षक- गडकरी झाला. “होता जिवा, म्हणून वाचून शिवा,’ ही म्हण तयार झाली. जिवा महाले हे नाभिक समाजातील होते. ऐतिहासिक कर्तबगारीने ते शिवरायांशी जोडले गेले. परंतु, ह्या जोडीला कुजक्या भटबुद्धीचा ‘कवी योगेश’ ह्याने टोपणनावानं “तांबडी माती” या चित्रपटातील गीतात घुसडलं आणि “जिवा-शिवाची बैलजोडी” करून घुमवलं. ह्याच संस्कारातून अहिल्यानगरचा ‘भाजप’चा नगरसेवक श्रीपाद छिंदम याने महाराजांचा उल्लेख शिव्या देऊन केला होता. दिल्लीचा ‘भाजप’ नेता जय भगवान गोयल याने नरेंद्र मोदींची तुलना “आजच्या युगातले शिवाजी” अशी भलामण करून केली होती. विनोद तावडे राज्याचे ‘सांस्कृतिकमंत्री’ असताना शिवरायांच्या पुण्यतिथीला (२०१८) रायगडावर ढोल वाजवण्याचा उत्सव झाला.
जेम्स लेन आला आणि शिवचरित्राची नासधूस करून गेला असे झालेले नाही. इतिहासाचार्य राजवाडे, ब.मो. पुरंदरे, निनाद बेडेकर आदिंनी लेखनातून शहाजीराजांना सतत गैरहजर दाखवणे; रामदास-कोंडदेव हे ‘गुरू’ नसताना तसा उल्लेख करणे; कोंडदेव यास सतत शिवबा- जिजामाता भोवती दाखवणे, असे उद्योग केले आहेत. पुरंदरेंनी तर त्यापुढे उडी मारून “दादोजी, जिजामाता आणि शिवबा यांचे गोत्र एकच” अशी विकृत कल्पना शिवचरित्रात मांडलीय. त्याची चर्चा घडावी, ह्याच हेतूने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच ब.मो.पुरंदरे यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा घाट घातला; आणि त्याला महाराष्ट्रभरातून विरोध होऊनही तो तडीस नेला. त्यामुळेच “रामदास नसते तर, छत्रपतींना कोणी विचारले नसते,” अशी अवमान करणारी भाषा कोश्यारी ह्याने वापरली.
याबद्दल त्यांना तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी काही सांगावे, अशी अपेक्षा ठेवायची, तर तेही “नाशिकचे पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का?” असे बोलून मोकळे झाले होते. त्यांनी असे बोलावे ; प्रसाद लाड यांनी शिवरायांचं जन्मस्थळ ‘शिवनेरी’वरून रायगडाला हलवावे; गोपीनाथ पडळकरांनी अफझलखानकरवी शिवरायांचा कोथळा काढावा किंवा सी.आर. पाटील यांनी शिवरायांना “पाटीदार” करावे ; हे प्रकार अनवधानाने होण्यासारखे नाहीत. हा तर, बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, ताराराणी, महात्मा फुले, राजर्षि शाहू, डॉ. आंबेडकर आदि महामानवांबाबत ‘जोक्स’ तयार करणे; त्याचा कुजबुज तंत्राद्वारे प्रचार करणाऱ्या ‘संघी मानसिकता’ असणाऱ्यांचा होलसेल धंदा आहे.
‘संघ-भाजप’चे चालक शिवरायांचे नाव घेतात; पण प्रत्यक्षात त्यांच्या उलट विचाराचे काम करतात. त्यांना शिवाजीराजे हे मतांचे ध्रुवीकरण करणाऱ्या दंगलींसाठी आणि सामाजिक वर्चस्वासाठी पाहिजेत. शिवरायांचे शेतकरीहित, स्त्री सन्मान, सामाजिक समता, उदार धार्मिक धोरण याच्याशी त्यांचे काहीही देणे-घेणे नाही. शिवरायांची नैतिकता आणि प्रगल्भता त्यांच्यात येणे शक्य नाही. कारण त्यांची ती वृत्तीच नाही; तसा संस्कारच नाही! ह्याची साक्ष ज्ञानोबा- तुकोबांच्या मानवतावादी विचारांपेक्षा ‘मनुस्मृती’ला श्रेष्ठ म्हणणारा मनोहर भिडे वरचेवर देत असतो. अशांपासून विशेषत: बहुजन- मराठा समाजाने दूर राहायला हवं. अशांना साथ देणे; म्हणजे शिवरायांची बदनामी करणार्यांना ताकद देण्यासारखे आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्यांना मदत करण्यासारखे आहे. ते टाळा. कारण –
सह्याद्रीच्या कडेकपारी,लढले शिवराया।
हिमालयाच्या स्वातंत्र्याचा,घडविला मूळपाया॥



