ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन!

पुणे :जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं बुधवारी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. माधव गाडगीळ यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. पुण्यातल्या डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रूग्णालया त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार चालू होते. मात्र, आज उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. संध्याकाळी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
भारतातील पर्यावरणविषयक जाणिवा आणि विशेषत: पश्चिम घाटांमधील जैवविविधतेबाबतच्या संवेदना जिवंत ठेवणं आणि त्या प्रगल्भ करणं यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. पश्चिम घाटांमध्ये राबवल्या जाणाऱ्या विकासकामांमुळे घाटातील जीवसृष्टी आणि एकूण पर्यावरणीय समतोलासाठी मोठं संकट निर्माण होऊ शकतं, हा धोक्याचा इशारा सर्वप्रथम माधव गाडगीळ यांनीच प्रशासनाला दिला. पश्चिम घाटाच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी २०११ साली तयार केलेला गाडगीळ अहवाल म्हणजे विकासकामांसाठी पर्यावरणाला धक्का पोहोचवण्यासाठी कायम तयार असलेल्या मानसिकतेला ढळढळीत वास्तव दाखवणारा आरसा ठरला.
डॉ. माधव गाडगीळ यांनी भारतातील पर्यावरणविषयक मुद्द्यांवर दिलेल्या योगदानाची दखल संयुक्त राष्ट्रांनीदेखील घेतली. गाडगीळ यांना २०२४ सालच्या यूएनईपीचा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. “सहा दशकांच्या वैज्ञानिक कारकिर्दीत डॉ. माधव गाडगीळ यांचा प्रवास हार्वर्ड विद्यापीठाच्या सभागृहांपासून ते भारत सरकारच्या उच्चपदापर्यंत झाला. पण या संपूर्ण प्रवासात माधव गाडगीळ यांनी स्वत:ला ‘जनतेचा वैज्ञानिक’च मानलं”, अशा शब्दांत UNEP च्या निवेदनात डॉ. माधव गाडगीळ यांचा गौरव करण्यात आला आहे.



