रत्नागिरीचे चिआंग चिंग कुओ – उदय सामंत

व्हीआयटी सेमीकंडक्टर या तमिळनाडू बेस कंपनीचा सेमिकन्डक्टर उत्पादन प्रकल्प लवकरच रत्नागिरीत उभारत आहे. जवळपास १९ हजार ५०० कोटी अशी अतिभव्य गुंतवणूक असणारा हा प्रकल्प रत्नागिरी एमआयडीसीत येत असून नुकतेच त्याचे भूमिपूजन उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. हा रत्नागिरीच्या औद्यागिक भवितव्यातील एक महत्त्वाचा क्षण मानावा लागेल. व्हीआयटी सेमीकंडक्टरचे व्यवस्थापक कण्णन यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पाबद्दल माहिती देताना सांगितले तमिळनाडूमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. रत्नागिरी येथे कंपनी हा प्रकल्प सुरू करत आहे. यासाठी उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या विशेष आग्रह आणि सहकार्य यातून हा प्रकल्प येथे करण्याचे नियोजन केले आहे. (अन्यत: तो गुजरातला जात होता) या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोगजाराची संधी मिळेल त्याचबरोबर या प्रकल्पामुळे या परिसराचा जीडीपी वाढेल, रत्नागिरी हे उद्योग जगतात मोठे शहर होईल. या प्रकल्पासाठी लागणारे अद्ययावत तंत्रज्ञान तयार करण्यासाठी येथील मुलांना परदेशात विशेष प्रशिक्षणाची सुरवात करत आहोत. या कार्यक्रमाला रत्नागिरी परिसरातील बहुतांश महाविद्यालय, तंत्रनिकेतन, कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो मुले विशेष निमंत्रित होती. सेमी कंडक्टरचे आज जगातील मायाजाल आणि त्याभोवती फिरणारे तंत्रज्ञान, आर्टिफिशीअल इंटेलिजन्स, रोजगाराच्या संधी आणि जागतिक पातळीवरील त्याचे महत्त्व याची स्वप्ने या मुलांच्या डोळ्यात दिसत होती. या मुलांच्या स्वप्नांना वास्तवाचा स्पर्श निश्चितच लाभेल आणि रत्नागिरीतील भीषण रोजगाराच्या प्रश्नाला पर्याय मिळेल अशी आशादायक विश्वास या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलसत होता हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य होते.
अमेरिकेतील सिलीकॅान व्हॅली ही सेमीकंडक्टरची मूळ जननी मानली जाते. जगातील हजारो तरुण या नव्या संशोधनावर काम करत आहेत. आजही त्यावरील संशोधानतील वर्चस्व हे अमेरिकेचेच आहे. हा सेमिकंडक्टर, इलेक्ट्रॅानिक्स चीप निर्माण करणारा व्यवसाय उपलब्ध तंत्रज्ञान आणि कौशल्य आणि मेहनत यातून जपानचा एक भाग झाला. मात्र गेल्या दोन दशकांत हा उद्योग रिपब्लीकन चायना म्हणजेच तैवानचा मुख्य भाग झाला. आज तैवान जगातील ५० टक्के सेमीकंडक्टरचा निर्माता आहे. तैवानचे जगातील सेमिकंडक्टर निर्मितीवर वर्चस्व आहे. जगातील सर्व देश तैवानच्या निर्मितीवर अवलंबून आहेत. दोन वर्षांपूर्वी अचानक भारतात कारचे उत्पादन थंडावले होते. त्याचे कारण होते चिप्सची उपलब्धता होत नाही. आज कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा मुख्य हृदयच ह्या चीप्स आहेत. नव्या तंत्रज्ञानातील हृदय बनविण्याचा कारखानाच उदय सामंत रत्नागिरीत आणत आहेत. ही त्यातील मोठी जमेची बाजू आहे.
तैवान हा चीनच्या पूर्व किनारपट्टीचा छोटासा देश. रिपब्लिकन चीन म्हणून त्याची ओळख आहे. १३ व्या शतकात तो नेदरलॅन्डचा भाग होता. रत्नागिरी आणि तैवान यांच्यात अनेक बाबतीत साम्य आहे. तैवानला पॅसिफिक महासागर आहे, तर कोकणला अरबी महासागर. विस्तीर्ण किनारपट्टी हे दोन्ही प्रांताचे वैशिष्ठ्य आहे. तैवानच्या पाककृती वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. येथे बबल चहा, दूध आणि बुडबुडे, टॅापीओका फ्रुट ज्यूस आदी विविध प्रकारचे फळे पदार्थ असतात. कोकणात आंबा , काजू, फणस, रातांबा, सोलकडी, लज्जतदार मासेकरी आणि खवैय्यांना आकर्षित करणारे खूप काही… तैवान येथील आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे प्रतिभावान, उच्च अभियांत्रिकी कुशल कर्मचारीवर्ग… यांत कोकण तर प्रतिभावंतांची खाणच आहेच. आता कुशल अभियांत्रिकी वर्ग होईल तयार… त्यामुळे सेमी कंडक्टर उद्योग म्हणजे कोकणसाठी एक मिसाल ठरणार आहे.
तैवानमध्ये सेमी कंडक्टर उद्योग प्रस्थापित होणे आणि जागतिक बाजारपेठेत त्याचा ५० टक्के वाटा काबीज करणे यातील मुख्य शिल्पकार आहेत, ते तैवानचे राजकीय धुरंधर नेतृत्व ‘चिआंग चिंग कुओ’. दीर्घ कौटुंबिक राजकीय परंपरा असलेले चिआंग हे पूर्वी चायनामध्ये राजकीय नेतृत्व होते. रिपब्लिकन चायना मुव्हमेंट त्यांनी तैवानमध्ये आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. तैवानला ग्लोबल मार्केटमध्ये संधी मिळावी यासाठी प्रथम (OME) वेफर मॅन्युफॅक्चरिंग आणि मायक्रो चीप उत्पादन प्रकल्प त्यांनी तैवानमध्ये सुरू केले. बदलते तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटलेजिन्सचा तंत्रज्ञानातील प्रवेश यामुळे सेमी कंडक्टर्स आणि मायक्रोचीप याची गरज आणि मागणी वाढू लागली. जिआंग जिंग कुआ यांनी याची गरज ओळखूत तैवानला या उद्योगात मोठी गुंतवणूक करत जागतिक बाजारपेठेत संधी निर्माण केली. यातील संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करत त्यात पायाभूत गुंतवणूक केली. आज तैवानची सेमीकंडक्टर ग्लोबल बाजारपेठेवर हुकूमत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत कोकणातील मोठ मोठ्या उद्योग प्रकल्पांना होणारा विरोध लक्षात घेऊन आता थेट सेमी कंडक्टर प्रकल्पच रत्नागिरीत थेट त्यांच्या मतदारसंघात आणत आहेत. हा प्रकल्प आकाराला येत जाईल तसे त्यातील रोजगाराच्या आणि उद्योगव्यवसायाच्या संधी वाढत जाणार आहेत. रत्नागिरीला ग्लोबल दर्जा प्राप्त होईल आणि त्याचे शिल्पाकर म्हणजेच रत्नागिरीचे ”चिआंग चिंग कुओ” होण्याचा सन्मान ना. उदय सामंत यांना लाभेल याचा फायदा राज्याच्या राजकारणात मोठा होऊ शकेल.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात आणि त्यातही रत्नागिरी शहर आणि विधानसभा मतदारसंघात विविध उदघाटने, भूमिपूजनं, लोकार्पण आदी कार्यक्रमाची धुवांधार आतषबाजी सुरू आहे. या प्रत्येक गोष्टीसाठी, कामासाठी कोट्यवधी रुपयांच्या घोषणा, निधीचे आकडे समोर येत आहेत. येत्या महिनाभरातील या योजना आणि निधींचे घोषित झालेले आकडे पाहिल्यास ते किमान ३-४ हजार कोटींच्या घरात सहजच जातील. यांतील सेमीकंडक्टर प्रकल्प भूमिपूजन आणि गुंतवणूक याचा आकडा चक्क १९ हजार ५०० कोटींचा आहे. त्या सोबत त्याचे ट्रेनिंग सेंटर आणि त्या नंतर येणारे उद्योग असे आणखी काही शे- हजार कोटी आकडे येतच राहतील. या सर्व हजारो कोटी आकड्यांच्या घोषणात रत्नागिरीकर स्वतःला शोधत आहे. मी कोठे आहे? मला, माझ्यासाठी कोणता निधी? त्यातही लाडकी बहीण मात्र महिला वर्गाला फारच प्रिय झाली आहे. अगदी नोकरी करणाऱ्या महिन्याला २०-२२ हजार कमावणाऱ्या महिलांनाही या लाडक्या बहिणीने हक्काने साथ दिली आहे. आता काही उगीच टिका करतात आमचा पैसा वाटत आहेत म्हणून! परंतु बहिणी बेहद खूष आहेत.
यांतील सेमीकंडक्टरच्या निमित्ताने बेरोजगारांच्या रोजगाराच्या प्रश्नाला चालना मिळाली आहे. चक्क ३२ हजार रोजगाराच्या संधी रत्नागिरी जिल्ह्यात मिळणार आहेत. येथील तरुणाला आता नोकरीच्या शोधात बाहेर जाण्याची गरजच लागणार नाही. हेच काय तर अमेरिका- युरोप – ऑस्ट्रेलिया-दुबई गेलेले जवळपास पाच हजार तरुण रत्नागिरीकर आपल्या मुलखात परतण्याचा विचार करत आहेत. ही आर्थिक परिवर्तनाची मशाल आता पेटली आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत हे अत्यंत मुत्सद्दी राजकारणी. आचारसंहिता लागण्यासाठी काही तासांचा कालावधीच बाकी असताना ट्वेन्टी- ट्वेन्टीची अखेरची ओव्हर ते फार धडाकेबाजपणे खेळत आहेत. संपूर्ण मैदानात फिल्डर्सचा पत्ताच नाही आणि गोलंदाज तर सैरभैर झालेला. अखेरच्या शटकात नो बॅालवर नो बॅाल पडतो आहे आणि सामंत साहेब फक्त एका पाठोपाठ एक षटकार खेचत आहेत. सेमिकंडक्टरचा ३२ हजार रोजगाराचा त्यांचा षटकार तर पार चंपक मैदान पार करत शिरगावच्या खोऱ्यात गडप झाला आहे. एक स्वप्न साकारत आहे या डोळ्यात, रत्नागिरीच्या ”चिआंग चिंग काऊ” यांनी दिलेले…


