अशा लाल मातीत

गुवाहाटी ते कॅशलेस हॅास्पिटल

आरोग्य सेवा आणि रत्नागिरी यांचे सूर काही जुळत नाहीत. गेल्या दशकात रत्नागिरीत अनेक नवनवी अद्ययावत रुग्णालये आली. वर्षभरापूर्वी शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले, तरीही रत्नागिरीकरांचा आरोग्य सुविधा घेण्यासाठी रत्नागिरी बाहेर जाण्याचा आग्रह काही कमी होत नाही. या शहरात उत्तम आरोग्य सुविधांची वानवाच असाच थेट ठपका मारला जातो. कधी भरमसाठ बिलं होतात, तर कधी सुविधाच नाही वगैरे… यावर एकदम जालीम उपाय सुचवत रत्नागिरीचे कार्यसम्राट पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक कॅशलेस रुग्णालय सुरुवात करत, या शहराला एक अत्यंत सुखद धक्का दिला आहे. या कॅशलेस हॅास्पिटलमध्ये कॅश काऊंटरच असणार नाही. सर्व सुविधा अत्यंत अद्ययावत कार्पोरेट दर्जाच्या आणि त्याही मोफत!

नुकतेच अत्यंत शानदार कार्यक्रमात उद्घाटन झालेल्या लोकमान्य टिळक कॅशलेस रुग्णालयाचा किस्सा मोठा गमतीशीर आहे. त्याची नाळ थेट गुवाहाटीच्या राजकीय घडामोंडीशी जोडली गेल्याची हकीकत खु­द्द पालकमंत्री ना. उदय सामंत यांनीच आपल्या भाषणात सांगितली. ना. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडत आपल्या सुरुवातीच्या ४० सहकाऱ्यांसह भाजपच्या सोबत जात थेट गोहाटी गाठले. महाराष्ट्राच्या राजकीय रणनितीचे केंद्रच गुवाहाटी झाले होते. आपल्यासोबत अधिकाधिक शिवसेनेचे आमदार यावेत यासाठी ना. शिंदे यांचा प्रयत्न सुरू होता आणि इनकमिंगही जोरदार सुरू होते. याच काळात शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू गोटातील ना. उदय सामंत हे मात्र मातोश्रीच्या सोबत अखेरपर्यंत होते. या अवघड परिस्थितीत पुढील रणनिती आखत होते.

पुढील बदलते राजकारण आणि भाजपचे डावपेच यांत आपला कितपत निभाव लागेल याची काळजी भल्याभल्यांना लागून राहिली होती. त्यातून संरक्षण मिळणारी गुवाहाटी ही एकमेव जागा होती. या परिस्थितीत ना. उदय सांमत यांना अगदी अखेरच्या म्हणजे फारच अखेरच्या क्षणी मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू बालमित्र आणि कोकणचे ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी गुवाहाटी मोहिमेत सहभागी होण्यासाठी आयोजन केले. उद्योगमंत्री पद मिळणार याचे आश्वासन सोबत होतेच आणि ४८ वा सहभागी आमदार म्हणून ना. उदय सामंत थेट खास विमानाने प्रदीप ढवळ यांच्यासोबत गुवाहाटी पोहोचले आणि पुढच्या अनेक गोष्टी घडत गेल्या.

प्रदीप ढवळ हे मूळ कोकणातील; मात्र ते अस्सल ठाणेकर आहेत. ज्ञानसाधना या महाविद्यालयात तब्बल २० वर्षे प्राध्यापक म्हणून असणारे प्रदीप ढवळ अत्यंत उर्जशील लेखक आहेत. ”नरेंद्र ते विवेकानंद एक झंझावात”, “जॅार्ज वॉशिंग्टन कार्व्हर एक ओॲसीस” हा चरित्र गंथ, ”सन्यस्त ज्वालामुखी” हे अत्यंत गाजलेल्या नाटकाचे लेखक तसेच “शिवबा” नाटक आणि “संताजी घोरपडे” या चित्रपटाची निर्मिती हा त्यांचा साहित्य ऐवज. या व्यतिरीक्त त्यांचे लेखनसाहित्य प्रकाशित आहे. नाट्य क्षेत्रात त्यांचे मोठे नाव आहे. ठाण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत परिचित असे हे नाव.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते बालपणीचे अत्यंत घनिष्ठ मित्र; मात्र तरीही राजकारणाच्या कोणत्याही पदापासून ते नेहमीच दूर रहातात. नुकतेच एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी लिहिलेले ”योध्दा कर्मयोगी” हे पुस्तक फार चर्चेत आहे. साहित्य क्षेत्रातील कार्यासोबत त्यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. ठाणे येथे त्यांच्या शिक्षण संस्थेमार्फत शाळा महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि विविध कौशल्याधारीत कोर्सेस चालविले जातात. यांत शेकडो मुले शिक्षणाचा लाभ घेत आहेत.

मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांसाठी कॅशलेस रुग्णालय सुरू करण्याची संकल्पना राबविण्याचे ठरले. ही संकल्पना प्रदीप ढवळ यांचीच होती बहुदा… मुख्यमंत्र्यांनी ती जबाबदारी प्रदीप ढवळ यांच्याकडेच दिली आणि वर्षभरापूर्वी ठाणे येथे प्रदीप ढवळ यांच्या ट्रस्टतर्फे कॅशलेस हॉस्पिटलची सुरुवात झाली. या रुग्णालयाला ठाणेकरांकडून इतका अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आणि लोकांच्यात या रुग्णसेवेब­द्दल जे समाधान प्रतीत झाले, त्यातून ही संकल्पना महाराष्ट्रातील अन्य भागांत राबवावी, असा विचार सुरू झाला. यांत रत्नागिरीचे आमदार आणि विद्यमान पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी तात्काळ ही संकल्पना उचलून धरत ती रत्नागिरीत राबवावी त्यासाठी आवश्यक ती सारी यंत्रणा आपण देऊ शकू असे सांगितले. शासनाची एखादी योजना तातडीने रत्नागिरीकडे वळविण्यात आणि त्याचा पाठपुरावा करण्यात ना. सामंत हे अत्यंत माहीर आणि ­मुत्सद्दी मानले जातात. आजवर रत्नागिरी शहर आणि मतदारसंघात इतक्या मोठ्या प्रमाणावर शासकीय योजना आणि निधी यांचा लाभ देणाऱ्या नेत्याचे नेतृत्व मिळाले नाही, हे विरोधक ही मान्य करतात.

मुख्यमंत्र्याच्या संकल्पनेतील योजना मुख्यमंत्र्यांच्या मित्रानेच करावी हा सामंत यांचा आग्रहही परफेक्ट होता. रुग्णालय उभारणे एकवेळ सोपे आहे; मात्र ते चालविणे, त्यासाठी डॉक्टर्स आणि कौशल्याधारित स्टाफ उभारणे तो टिकविणे हे रत्नागिरीसारख्या ठिकाणी अत्यंत मुश्कील आहे; मात्र हे आव्हान प्रदीप ढवळ यांनी स्वीकारले. सत्तेच्या प्रांगणात राहूनही निरपेक्षपणे काम करणाऱ्या व्यक्ती असतात याची अनुभूती अत्यंत अभावाने येते. डॉ. प्रदीप ढवळ हे असेच एक अत्यंत निरपेक्ष व्यक्तिमत्व. सत्तेच्या अत्यंत जवळ अगदी वर्षा बंगल्यात त्यांना मानाचे पान आणि स्थान असताना ते या राजकीय परिक्षेत्राच्या बाहेर स्वतःला ठेवत सामाजिक कार्यात आणि प्रसिद्धीपासून दूर राहत काम करत राहतात हा त्यांचा गुणविशेष आहे.

रत्नागिरी येथील कॅशलेस हॅास्पिटल उभारताना त्यांनी या प्रकल्पासाठी स्वतःला पूर्णतः झोकून दिले आहे. मागील काही महिने त्यांचा मुक्काम पोस्ट रत्नागिरी आहे. येथील प्रत्येक गोष्ट अत्यंत उत्तम दर्जाची आणि काटेकोर निगराणीतच पूर्ण होत आहे. तेथे कोणतीच तडजोड नाही. सोबत रत्नागिरीतील प्रतिथयश आणि आपल्या कामाच्या दर्जाबाबात अत्यंत काटेकोर मानले जाणारे आर्किटेक्ट संतोष तावडे. त्यामुळे उत्तमातील अत्युत्तम म्हणावे अशा ह्या रुग्णालयाची आखणी आणि उभारणी झाली आहे. याचे मोठे श्रेय रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनीही आहे, कारण या दर्जेदार कार्याला तितकेच दर्जेदार सहकार्य त्यांनी केले, हे फार महत्त्वाचे होते. साधना फाऊंडेशन ट्रस्टच्या डॉ. समिधा गोरे आणि त्यांची सहकारी टीम या हॉस्पिटलचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी ही टीम मुंबईहून रत्नागिरी येथे येऊन रहात आहे हे विशेष आहे.

हॅास्पिटलमध्ये ॲापरेशन थिएटर ते आयसीयू आणि ओपीडी, आयपीडी वार्ड खूप आकर्षक आणि अद्ययावत आहेत. येथे हार्ट, कॅन्सर ते रिप्लेसमेंटपर्यंत सर्व ऑपरेशन होणार आहेत. त्यासाठी तज्ञ डॉक्टर असणार आहेत. ह्या साऱ्या सुविधा निव्वळ मोफत. येथे औषध विक्री केंद्रही आहे. त्यातही काही औषधे मोफत मिळणार असे सांगितले गेले. हे सारे अविश्वसनीय वाटले म्हणून पुन: पुन्हा विचारले त्यावर ही शासकीय योजनेचा भाग असून यासोबत काही सीएसआर माध्यमातून ही निधीची तरतूद असल्याचे सांगितले गेले. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या इच्छेने आणि ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे कॅशलेस रुग्णालय सुरू झाले… गुवाहाटीचा हा दोघांचा प्रवास रत्नागिरीच्या कॅशलेस या अत्यंत उर्जशील, सर्जनशील सकारात्मकतेत प्रकटला हा रत्नागिरीकरांसाठी एक अनमोल ठेवाच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button