मुख्य बातमी

शीरमध्ये भुस्सखलन; जमिनीचा काही भाग नदीमध्ये कोसळला

गुहागर : सलग दोन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुहागर तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला असून, तालुक्यातील शीर ते जामसूत मार्गावरील वासुदेव पाटील यांच्या घराजवळील रस्त्यालगत भुस्सखलन होऊन जमिनीचा काही भाग नदीमध्ये कोसळला आहे. ही घटना काल (१८ जुलै) घडली. या ठिकाणी भविष्यात भुस्साखलनामुळे शीर – महालक्ष्मी – जामसूत वाहतूक ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यावर वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे.

अति मुसळधार पावसामुळे भुस्सखलनाच्या तसेच डोंगर खाली येण्याच्या घटना गुहागर तालुक्यामध्ये वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील पाचेरी सडा येथेही डोंगर खचून पूर्ण रस्त्यावर आला होता. यावेळी खबरदारी म्हणून काही कुटुंबांचे स्थलांतर केले होते. त्यानंतर चारच दिवसांनी तालुक्यातील शीर – महालक्ष्मी – जामसूत मार्गालगतचा जमिनीचा काही भाग घसरून नदीमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. असाच मुसळधार पाऊस सुरू राहिला तर या मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो.

जामसूत मार्गे शीर महालक्ष्मी रस्ता गुहागर-आबलोली रस्त्याला येऊन मिळतो. त्यामुळे शीरला जाणारी वाहतूक याच मार्गावरून सुरू असते. नदीमध्ये कोसळलेला जमिनीचा भाग हा रस्त्यापासून काही अंतरावरच असल्याने संबंधित विभागाला याविषयी माहिती दिली असून, त्यांनी या घटनेची तातडीने दखल घ्यावी आणि योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी शीर गावच्या सरपंचांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button