राजापुरात संततधारेने पुराच्या पाण्याची शक्यता
पुराच्या पाण्याची जवाहर चौकाच्या दिशेने आगेकूच

राजापूर : बुधवारपासून (१७ जुलै) संततधार पडणाऱ्या पावसाने गुरूवारीही जोर धरल्याने राजापूर शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. सायंकाळी पुराच्या पाण्याने जवाहर चौकाच्या दिशेने कुच केल्याने शहरात पुराचे पाणी भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान पुराची शक्यता लक्षात घेऊन नदीकिनारी असलेले व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. तर पावसाचा जोर लक्षात घेऊन प्रशासनानेही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
तर संततधार पडणाऱ्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील विजपुरवठाही काही ठिकाणी खंडीत झाला आहे. मात्र तालुक्यात कोठेही नुकसान वा पडझड झालेली नाही.
गेल्या पंधरड्यापासूनच पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेल्या आठवड्यात ७ जुलै रोजी शहरात पुराचे पाणी शिरले होते. त्यानंतर १४ जुलैला देखील पुराचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र पावसाचा जोर ओसरल्याने पूर ओसरला होता. आता १७ जुलैपासून पुन्हा पावसाने तालुक्यात जोर धरल्याने अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गुरूवारी (१८ जुलै) सकाळी पुराच्या पाण्याने जवाहर चौकात पिकअप शेडपर्यंत धडक मारली होती. त्यामुळे जवाहर चौकाकडे येणारी एसटी वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. तर बंदरधक्का परिरसरात दर गुरूवारी भरणारा आठवडा बाजारही एसटी डेपो परिसरात भरला होता; मात्र दुपारी काही प्रमाणात पुराच्या पाण्याची पातळी कमी झाली होती.
गुरूवारी सायंकाळी पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने पुराच्या पाण्याने जवाहर चौकाच्या दिशेने कुच केली होती. त्यामुळे पावसाचा वाढता जोर आणि पाण्याची वाढती पातळी लक्षात घेऊन व्यापारी व नागरिक अगोदरच सतर्क झाले असून त्यांनी सामानाची हलवाहलव करण्यास सुरूवात केली आहे.



