‘कोकण स्पर्श’ चित्र प्रदर्शनाला कलारसिकांचा प्रतिसाद

रत्नागिरी : आपल्या चित्रातून मानवी मनाच्या नानाविध कंगोऱ्यांचा आढावा घेणाऱ्या रत्नागिरीतील चित्रकार नीलेश पावसकर आणि नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेले चित्रकार निखील कांबळे यांच्या ‘कोकण स्पर्श’ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रसंग्राहक विवेक शानभाग, कौमुदी बिल्डर्सचे संतोष तावडे, चित्रकार रवींद्र मुळ्ये, चित्रकार नीलेश शिळकर, प्रद्योत आर्ट गॅलरीचे संस्थापक डॉ. प्रत्युष चौधरी, चित्रकार रूपेश पंगेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या प्रदर्शनाला कला रासिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे प्रदर्शन शहरातील टीआरपी येथील प्रद्योत आर्ट गॅलरीत भरले असून १३ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत कलारसिकांना पाहता येणार आहे. चित्रकार नीलेश पावसकर आणि निखील कांबळे यांनी आपल्या कुंचल्यातून कोकणच्या निसर्गाचे दर्शन तसेच निसर्गातील विविध बारकावे अत्यंत प्रभावीपणे टिपले आहेत. या दोन्ही कलाकारांनी आजवर असंख्य कलाकृती रेखटल्या असून अनेक ठिकाणी त्यांनी प्रदर्शनात भाग घेतला आहे.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कलारसिक अमोल श्रीनाथ म्हणाले, “प्रद्योद कलादालनास भेट दिल्यानंतर तेथील कलाप्रदर्शन पाहून मी स्वतः मंत्रमुग्ध झालो. नवल म्हणजे ज्या शिक्षकांनी मला शाळेत असतांना कलेचे धडे दिले त्या रूपेश पंगेरकर सरांच्या तोंडून माझे कौतुक केले गेले. त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. रत्नागिरीतील सगळ्यांनीच आणि जास्त करून विद्यार्थ्यांनी, पालकांनी ते प्रदर्शन पहावे असे मी सगळ्यांना आवाहन करीन. ही चित्रे ही कलाशिक्षक निखील कांबळे व नीलेश पावसकर यांनी रेखाटलेली आहेत. तसेच डॉ. चौधरी यांनी आपला डॉक्टरी पेशा सांभाळत कला जोपासली यांचे कौतुक वाटते. या कलाकारांसाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद.” समस्त रत्नागिरीकरांनी हे प्रदर्शन पहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. चित्र प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया दोन्ही कलाकारांनी व्यक्त केली.



