मुख्य बातमी

ज्येष्ठ लेखिका प्रा. रोहिणी गवाणकर यांना मातृमंदिर परिवारातर्फे श्रध्दांजली

रत्नागिरी : देवरुख येथे कार्यरत असलेल्या मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्यकारिणी संचालक प्रा. रोहिणी गवाणकर (वय ९२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांना मातृमंदिर परिवारातर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली.

इंदिराबाई (मावशी) हळबे यांनी मातृमंदिरचे कार्यक्षेत्र विस्तारताना त्या काळातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पुरोगामी विचार पुढे नेणाऱ्या, मुल्याधारीत वैचारिक अधिष्ठान असणाऱ्या अनेक विद्वान महिला कार्यकर्त्यांना मातृमंदिर सोबत जोडून घेतले होते.

कोल्हापूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुचिता कोरगावकर, डॅा. लिला अल्वारीस, डॅा. काशीबाई अवसरे, मंजूताई भिडे, चंद्राताई (माई) किर्लोस्कर, यांतील एक महत्त्वाच्या विदुषी प्रा. रोहिणी गवाणकर यांचे मातृमंदिरच्या वाटचालीतील योगदान महत्त्वाचे आहे.

प्रा. रोहिणी गवाणकर एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात त्या अनेक वर्षे कार्यरत होत्या. विद्यापीठाला राज्य विद्यापीठ म्हणून स्टॅट्युटरी स्टेटस मिळाल्यानंतर व विशेषतः प्रा. सुमा चिटणीस कुलगूरू असताना विद्यापीठात केलेल्या संस्थात्मक बदलांनंतर राज्यशास्त्र विभागाची जबाबदारी यांनी सांभाळली.

प्रा. गवाणकर यांनी निवृत्तीनंतरही विपुल लेखन केले आहे. राजकारणातील स्त्रियांच्या कार्याचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे ही त्यांची तळमळ होती. स्वातंत्र्य लढ्यापासून ते १९९४च्या महिला धोरणापर्यंतचा आढावा घेणारे त्यांचे पुस्तक हे बराच काळ याविषयावर उपलब्ध असलेले मराठीतील एकमेव पुस्तक होते. मृणाल गोरे यांचे ‘पाणीवाली बाई’ हे चरित्र, स्वातंत्र्योत्तर राजकारणातील काही स्त्री नेत्यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारी पुस्तके हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

गेल्या पंचवीस-तीस वर्षांत स्त्रियांच्या राजकीय सहभागाविषयी बरेच अभ्यास झाले आहेत. लिखाण उपलब्ध आहे; मात्र ज्या काळात या विषयाला फारसे ग्लॅमर नव्हते, त्याविषयीचे सिद्धांकन इव्हॉव्ह होत होते त्या काळात प्रा. रोहिणी गवाणकर यांनी निष्ठेने हे काम केले. त्या महाराष्ट्र राज्यशास्त्र परिषदेतही सक्रिय होत्या. तिथेही स्त्रियांच्या राजकीय सहभागाच्या अभ्यासाला व्यासपीठ मिळावे यासाठी त्या प्रयत्नशील होत्या.

प्रा. रोहिणी गवाणकर यांना मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, अध्यक्ष मेघना चाळके यांच्यासह मातृमंदिर परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button