एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराला करबुडे येथे प्रारंभ

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेचे रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबिराचे उद्घाटन करबुडे येथील रामगडे येथे २८ डिसेंबर रोजी झाले.
प्रारंभी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना करबुडे गावचे प्रथम नागरिक सरपंच संस्कृती पाचकुडे यांनी करबुडेतील बारा वाड्यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांची व्यवस्था कशा पद्धतीने केली आहे, कामाचे नियोजन कसे केले आहे आणि पुढील कॅम्प कुठे आयोजित करायचा याबद्दल माहिती देत सहभागी शिबिरार्थिंचे स्वागत केले आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयातील कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, युवकांची भूमिका यावरती भाष्य करत राष्ट्र उभारणीमध्ये युवकांची भूमिका कशी महत्त्वाची आहे याची माहिती दिली आणि शिबिरार्थीना शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवनिर्माण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंदार गीते यांनी भूषविले. शिबिराला उद्बोधीत करताना डॉ. गीते यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची उल्लंघन होणार नाही याचे भान ठेवून कार्यक्रमाचे नियोजन करावे विद्यार्थ्यांनी आपले व कॉलेजचे नाव उज्वल करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना करत शिबिराला शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी गावप्रमुख वैभव कळंबटे, अनंत कारकर, नंदकुमार पाचकुडे, काशिनाथ रामगडे, सचिन पाचकुडे, मुख्याध्यापक विजय राऊत, ग्रामपंचायत सदस्य नेहा रामगडे, पोलीस पाटील हरिश्चंद्र वेदरे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष दिनेश रामगडे, माजी सरपंच सुरेश कारकर, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष विलास वेदरे आणि बहुसंख्य शिबिरार्थी, माजी विद्यार्थी, शाळेचे छोटे विद्यार्थी प्रा. रोहित शेवाळे प्रा. अहलाम खान, प्रा. मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. सुशील साळवी यांनी केले.



