आर्टिकल

कुमार शेट्ये : एका सृजनशील राजकीय प्रवासाची अखेर!

– अभिजीत हेगशेट्ये 

रत्नागिरी राष्ट्रवादी (शरदचंद्रजी पवार) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये यांचे या जगातून जाणे हे अनेकांसाठी मन हेलावणारी दुखःद घटना होती. गेली ४० वर्षे रत्नागिरी शहर आणि तालुक्याच्या प्रगल्भ आणि सृजनशील राजकारणातील एक महत्त्वाचा दुवा हरपल्याची भावना सर्वसामान्यांत व्यक्त होत आहे. कुमार शेट्ये यांच्या अत्यंत प्रामाणिक आणि संयमी राजकारणाची लोकाभिमुख हळवी संवेदना हीच खरी सर्वसामान्यांनी त्यांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.

बौद्धिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ शहर म्हणून रत्नागिरीची इतिहासात नोंद आहे. ब्रिटीश काळातही या शहरातील बौध्दिक स्तर अधिक उच्च पातळीचा होता. त्यामुळेच त्याकाळात कोकणातील समुद्र किनाऱ्यावरील दुर्गम अशा या शहराला ब्रिटीशांनी महत्त्वाचे स्थान दिले. येथील एका ब्रिटीश कलेक्टरने त्यांच्या निवृत्तीनंतर रत्नागिरीच्या वास्तव्यावर एक पुस्तक लिहिले. त्यात येथील अंतू बर्वा आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचे वर्णन आहे. पुलंचा अंतू बर्वा त्यानंतर अर्धशतकानंतर आला. येथील बुद्धिमान, विवेकी आणि अत्यंत संयमी व समजदार कधीही बंडखोरी न करणारी मानसिकता हेरतच ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाच्या थिबा राजाला येथे जेरबंद करण्याचे आणि वि. दा. सावरकरांना येथे नजरकैदेत ठेवण्याचे धोरणात्मक निर्णय घेतले असतील. त्याही पेक्षा महत्त्वाचा ब्रिटीशांचा निर्णय महाराष्ट्रातील पहिले मोफत वाचनालय रत्नागिरी (१९२८) येथे सुरू करण्याचा.

अशा समंजस आणि विवेकी रत्नागिरी तालुका आणि शहराचे नेतृत्व करण्याची संधी या तालुक्याचा सभापती म्हणून कुमार शेट्ये यांना मिळाली. कुमार शेट्ये यांच्या राजकारणाचे वैशिष्ठ्य होते सर्वसमावेशक, सर्वांना सामावून घेणारे. त्यांच्या सभापतीपदाच्या काळात मी त्यांना पाहिले आहे. त्यांचे घर आणि कार्यालय हे कार्यकर्त्यांनी ओसंडून वाहत असे. त्यांना भेटण्यासाठी सकाळी ७ पासून कार्यकर्ते विविध कामे घेऊन त्यांच्या घरी येत असत. आताच्या जिल्हाधिकारी कार्यालय असणाऱ्या जागेत पूर्वी रत्नागिरी जिल्हा परिषद सभापती पद कार्यालय होते. तेथे त्यांच्या कार्यालयातही तशीच गर्दी असे. माझ्या घरात पाणी येत नाही, ते माझ्या मुलगीचे त्याच्या नवऱ्याशी पटत नाही अशा विविध समस्या घेऊन लोक त्यांच्याकडे येत आणि त्या प्रत्येक समस्येशी समरस होत त्याला न्याय देण्याचा ते प्रयत्न करत. रत्नागिरी तालुक्यातील घराघरात त्यांची जोडलेली नाळ आजही ते नातेसंबध जोडून आहेत.

काँग्रेस हा त्यांचा पक्ष. त्या राजकीय पक्षाशी प्रामाणिक राहत त्यांनी संपूर्ण आयुष्य राजकारण आणि समाजकारणात व्यस्त गेले. ना. शरद पवार यांच्यावरील त्यांची निष्ठा ही विलक्षण आत्मीयतेची होती. पवार साहेबांबरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि अखेरच्या श्वासापर्यंत पवार साहेब आणि त्यांच्या विचारांशी ते प्रामाणिक राहिले. राजकारणात पदाला चिकटून न राहता नव्यांना संधी देणे हे आजकालच्या राजकारणात अत्यंत दुर्मिळ झाले आहे. मात्र कुमार शेट्ये यांचे राजकारणच दुसऱ्यांच्या हितासाठी होते. त्यांनी त्यांचा स्वार्थ कधीच पाहिला नाही. सतत दुसऱ्याचा विचार करणे आणि त्यांना संधी देणे, त्या माध्यमातून ना. शरद पवार यांच्या नेतृत्वातील विचारधारेचा राजकीय पक्ष अधिकाधिक विस्तारित करणे हेच त्याचे अखेरपर्यंत ध्येय होते. या स्वभावातूनच त्यांनी २००४ साली विद्यमान उद्योगमंत्री ना. उदय सामंत या युवा नेत्याला विधानसभेचे तिकीट देण्याचा विषय समोर आला. त्यावेळी स्वतः विधानसभा तिकीटाचे दावेदार असतानाही उदय सामंत यांच्या नावाला पाठिंबा दिला. इतकेच नाही तर ना. शरद पवार यांनी जेव्हा त्यांना विचारले आपले मत मला महत्वाचे आहे. त्यावेळी उदय सामंत यांच्या नावाची रत्नागिरी विधानसभेसाठी विशेष शिफारस केली आणि अत्यंत धडाकेबाज प्रचार यंत्रणा राबवित त्यांना निवडूनही आणले. याची योग्य जाणीव ना. सामंत यांनाही तितक्याच आत्मीयतेने आणि उत्कटतेने आहे.

साधेपणा हे कुमार शेट्ये यांचा स्थायीभाव होता. गेल्या दशकात रत्नागिरी तालुक्यातील राष्ट्रवादीचा प्रभाव घटत चालला. सत्तेच्या छायेत राहावे, त्याचा लाभ घ्यावा आणि आपले कार्यक्षेत्र विस्तारत राहावे हा सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांचा स्थायीभाव असतो. सत्तेशिवाय त्यांना जगणे म्हणजे पाण्याबाहेर असलेल्या मासोळीसारखी तडफड अनुभवणे असे ते मानतात. यांतून कुमार शेट्ये यांच्या सोबतचे अनेक जुने जाणते वरिष्ठ नेते कार्यकर्ते विविध अमिषांपोटी, काही भीतीपोटी सत्तेच्या कुंपणात जाऊन बसले. त्यांच्याब­द्दल शेट्ये यांचा कधीच आक्षेप नव्हता. तुम्ही तिकडे सुखी आहात ठीक आहे, असे अगदी शांतपणे ते सांगत. या स्थलांतरात त्यांना अनेकवेळा सूचित करण्यात आले; मात्र त्यांनी आपला तात्विक आणि वैचारिक पाया कधी ढळू दिला नाही याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत जवळून अनुभवता आला.

लोकसभा निवडणुकीत मोदींसाठी मत (चारसों पार) आणि मोदींविरोधी मत अशी थेट लढत होती. या राजकीय लढतीबरोबरच सिव्हिलियन मुव्हमेंट संपूर्ण देशात अत्यंत वेगाने कार्यरत झाली होती. डॉ. विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे आणि निखील वागळे यांनी मोदींच्या हुकुमशाही आणि संविधानाला धोका देऊ पाहणाऱ्या धोरणाविराधोत ”निर्भय बनो” आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्रात रान उठविले होते. यांची एक सभा रत्नागिरीत खुल्या मैदानावर घेण्याचे धाडस आम्ही सिव्हिल सोसायटीने केले होते. आमच्यापाशी पैसे नव्हते आणि इतकी मोठी सभा घेणे हे मोठे आव्हान होते; मात्र त्यावेळी पहिला विश्वास दिला तो कुमार शेट्ये यांनी. सभा जोरदार करू या! करू व्यवस्था म्हणत स्वतः पहिला शेअर दिला. या आवाहनाला तमाम रत्नागिरीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि रत्नागिरीच्या इतिहासात एक चमत्कार घडला. लोकांनी उत्स्फूर्तपणे निधी दिला आणि सभाही फार मोठी अभूतपूर्व अशी झाली. यात कुमार शेट्ये यांचा एकूणच सहभाग फार मोठा होता. त्यांनी गावोगाव निरोप पाठविले आणि त्यांच्या शब्दाने हजारो माणसे या सभेला धावून आली.

कुमार शेट्ये यांचा संपर्क जात-धर्मापलीकडचा होता. मुस्लिम समाजात त्यांना मोठा मान होता. संपूर्ण आयुष्य समाजकारणासाठी झोकून देणारे हे व्यक्तिमत्त्व अनेकांचा मानसिक आणि भावनिक आधार होते. त्यांच्या जाण्याने एका सृजनशील संयमी नेतृत्व हरपल्याची भावना आहे. कुमार शेट्ये यांना भावपूर्ण आदरांजली 🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button