हरवलेले २५ मोबाईल पोलिसांनी केले परत

रत्नागिरी : जिल्ह्यात विविध ठिकाणांहून हरवलेले ४५ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून, त्यातील २५ मोबाईल काल (ता. ८) जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून नागरिकांच्या गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती घेऊन पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्य्क पोलीस निरीक्षक नितीन पुरळकर, महिला पोलीस हवालदार दुर्वा शेट्ये, तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवालदार रमिज शेख, पोलीस शिपाई नीलेश शेलार यांच्यासह रत्नागिरी शहर, लांजा, चिपळूण, राजापूर, सावर्डे, देवरूख या पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदार यांनी एकत्रित केले. मिळालेल्या माहितीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गहाळ मोबाईलचा शोध घेतला.
यामध्ये एकूण ४५ मोबाईलचा शोध घेऊन ते परत मिळविण्यात त्यांना यश आले आहे. हे परत मिळविलेले गहाळ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना ८ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात परत देण्यात आले.
या प्रसंगी एकूण २७ जणांचे मोबाईल परत देण्यात आले असून, उर्वरीत सर्व मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल सायबर पोलीस ठाणे येथून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.
दरम्यान, सायबर क्राईमसारख्या गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्तीने तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याबाबतही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.




