भटक्या जमाती (क) या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमातीसाठी वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : ग्रामीण भागातील भटक्या जमाती (क) या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमातीतील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना पशुसवंर्धन विभागामार्फत ग्रामीण परसातील कुक्कुटपालन संकल्पनेतंर्गत ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या १०० कुक्कुटपल्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये भटक्या जमाती (क) या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमातीसाठी वैयक्तिक लाभाची योजना राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील भटक्या जमाती (क) या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमातीतील पशुपालक/शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील भटक्या जमाती (क) या प्रवर्गासाठी धनगर व तत्सम जमातीतील पशुपालक बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती व महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती रत्नागिरी मार्फत करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज www.mahamesh.org या संकेतस्थळावर १२ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १२वाजेपर्यंत या कालावधीत भरावा.
योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीतकमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.
योजनेच्या अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती, रत्नागिरी तसेच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन गट विकास अधिकारी, पं. स. रत्नागिरी व पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती रत्नागिरी यांनी केले आहे.



