मुख्य बातमी

वेरळ येथे नारळ लागवड तंत्रज्ञान विषयावर शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वाटप

भाट्ये प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राच्या वतीने आयोजन

लांजा : डॉ. बाळासाहेव सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत भाट्ये (रत्नागिरी) येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामार्फत अखिल भारतीय समन्वित ताड साड संशोधन प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी एक दिवसाचा प्रशिक्षण वर्ग वेरळ येथे २० सप्टेंबरला आयोजित केला होता.

या कार्यक्रमाचे आयोजन लांजा तालुका काजू उत्पादक शेतकरी कंपनी मर्या. यांच्या समन्वयाने करण्यात आले. याप्रसंगी नारळ रोपे आणि दालचिनी कलमे यांचे निविष्ठा स्वरूपामध्ये लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. अध्यक्षीय भाषणामध्ये कृषिविद्यावेत्ता डॉ. किरण मालशे यांनी नारळ व मसाला उत्पादनाचे महत्त्व विषद केले. या प्रशिक्षण वर्गास वेरळच्या सरपंच श्रीमती सुवर्णा जाधव, लांजा कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. आनंद हणमंते यांची विशेष उपस्थिती होती. श्री. हणमंते यांनी नारळ पिकाचे महत्त्व व त्याअनुषंगाने व्यापारी लागवड यावर माहिती दिली.

यावेळी डॉ. सुनील घवाळे यांनी नारळ लागवडीचे सुधारीत तंत्रज्ञान यावर, डॉ. संतोष वानखेडे यांनी नारळ पीक संरक्षण यावर, तर डॉ. किरण मालशे यांनी नारळ पीक व्यवस्थापन आणि मसाला पिकांची लागवड यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाटी केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी तसेच टेक्नोसर्व्ह आणि लांजा तालु‌का काजू उत्पादक शेतकरी कंपनी मर्या. यांच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button