मुंबई २६/११ हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला १८ दिवसांची NIA कोठडी.

नवी दिल्ली : मुबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला पटियाला हाऊस कोर्टाने १८ दिवसांची कोठडी सुनावली. तहव्वूर राणाला पटियाला हाऊस NIAच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री उशिरा न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली आणि राणाला १८ दिवसांची कोठडी बजावण्यात आली. राणा १८ दिवसांसाठी एनआयए कोठडीत राहील. यादरम्यान, मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यांमागील संपूर्ण कट रचण्यासाठी एजन्सी त्याची सविस्तर चौकशी करेल. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि २३८ हून अधिक लोक जखमी झाले होते.
तहव्वूर राणाला गुरुवारी भारतात आणले गेले. भारतात प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याबाबत अमेरिकेच्या न्यायालयात केलेला अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारतातील तपास यंत्रणाची पथके अमेरिकेत दाखल झाली आणि त्याला भारतात आणण्यात आले. आता राणाचा ताबा एनआयएने घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
एनआयएने २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने पाठवलेल्या ईमेलसह अनेक भक्कम पुरावे सादर केले होते, जे त्याच्या पोलिस कोठडीसाठी पुरसे ठरतात. या भयानक कटाचा उलगडा करण्यासाठी कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे एजन्सीने न्यायालयाला सांगितले. या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यांमध्ये राणाच्या भूमिकेचीही चौकशी तपासकर्ते करतील. एनआयएने राणाला पटियाला हाऊस कोर्टातून त्यांच्या मुख्यालयात आणले आहे.
एनआयएने २० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने चौकशीसाठी १८ दिवसांची कोठडी दिली आहे. न्यायालयाने निर्देश दिले आहेत की त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी आणि पुढील तारखेला हजर होण्यापूर्वी वैद्यकीय चाचण्या केल्या जातील आणि त्या दरम्यानच्या सर्व वैद्यकीय बाबी पूर्ण केल्या जातील. येत्या काळात तहव्वुर राणाला प्रत्यक्षरित्या न्यायालयासमोर हजर केले जाईल.



