जाहिरातीत महारेरा तपशील नसल्यास बिल्डरला होणार मोठा दंड!

मुंबई : येथून पुढे गृहनिर्माण प्रकल्पांच्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा नोंदणीक्रमांक, महारेरा संकेतस्थळाचा तपशील आणि क्यूआर कोड संबंधित प्रकल्पाच्या जाहिरातीतील संपर्क क्रमांक आणि पत्ता यात ज्याचा फाॅन्ट मोठा असेल त्या फाॅन्टमध्ये छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय हा सर्व तपशील जाहिरातीच्या वरील भागात उजवीकडे रंगीत मजकुरात छापणे अत्यावश्यक आहे. याबाबतचे निर्देश महारेराने एक परिपत्रक काढून नुकतेच जारी केले आहेत. हे निर्देश तातडीने लागू करण्यात आले आहेत.
या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासकांवर ५० हजारापर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. त्यानंतर १० दिवसांत चुकीची दुरूस्ती करून महारेरा नोंदणीक्रमांक, संकेतस्थळाचा तपशील आणि क्यूआर कोड विहित आकारात ठळकपणे छापला नाही, तर “निर्देशांचा सततचा भंग” गृहीत धरून नियमानुसार यथोचित कारवाई केली जाणार आहे.
महारेराने क्यूआर कोड बंधनकारक यासाठी केलेला आहे की, घरखरेदीदारांना एका क्लिकवर संबंधित प्रकल्पाची माहिती उपलब्ध व्हावी. परंतु अनेकदा हे क्यूआर कोड स्कॅनच होत नाहीत. त्यामुळे त्याचा हेतू साध्य होत नाही. आता क्यूआर कोड स्कॅन होऊ शकले नाही तर त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.



