इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन.

देवरुख : कोकणातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली, देवरुख येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. हा उपक्रम आ.रा.स. अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर, रत्नागिरी आणि प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रा. विवेक कुलकर्णी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. या केंद्राच्या स्थापनेमुळे UPSC, MPSC, PSI, STI, JMFC यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. आ.रा.स. अकॅडमीने यापूर्वीच अनेक विद्यार्थ्यांना यशाच्या दिशेने मार्गदर्शन केले असून, या नवीन केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक संसाधने आणि दर्जेदार मार्गदर्शन मिळेल. प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेने याआधीच इंजिनीयरिंग, फार्मसी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या स्थापनेद्वारे कोकणातील शैक्षणिक स्तर उंचावला आहे. हे नवीन केंद्र या विद्यार्थ्यांना सरकारी सेवांमध्ये करिअर करण्यासाठी मदत करणार आहे.
ॲड. राकेश सत्वे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य दृष्टिकोन कसा ठेवावा यावर मार्गदर्शन केले. “स्वप्ने मोठी ठेवा आणि त्यासाठी अथक परिश्रम करा. यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन आणि सातत्य आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी मानसिक तयारी, वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व स्पष्ट केले.
या वेळी प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांनी संस्थेच्या उद्दिष्टांबद्दल माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना भविष्यातील संधींबद्दल मार्गदर्शन केले.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
साने गुरुजी विचारमंच, रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. नाना मानकर यांनी आपल्या भाषणात शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रमुख साधन असल्याचे सांगितले. “शिक्षणानेच विद्यार्थ्यांना स्वतःचा आणि समाजाचा विकास घडवता येतो,” असे ते म्हणाले. तसेच, त्यांनी साने गुरुजींच्या विचारांचे स्मरण करून प्रामाणिकतेने शिक्षण घेण्याचे आवाहन केले.
माजी गटशिक्षणाधिकारी श्री. अशोक मोहिरे यांनी आजच्या काळातील बदलत्या शैक्षणिक प्रणालीवर भाष्य केले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी योग्य रणनीती कशी आखावी याचे मार्गदर्शन केले. “सतत शिकण्याची जिज्ञासा ठेवा आणि अपयशातून शिकण्याची तयारी ठेवा,” असा मौलिक सल्ला त्यांनी दिला
कुणबी पतसंस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत परवडे यांनी आर्थिक शिस्त आणि शिक्षण यांचा परस्पर संबंध स्पष्ट केला. “शिक्षण हीच खरी संपत्ती आहे आणि ती केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामाजिक समृद्धीसाठीही महत्त्वाची आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सल्ला दिला.
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्ताने श्री कुंभार यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षांसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला. “अपयश आले तरीही प्रयत्न सोडू नका. योग्य दिशेने परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते,” असे ते म्हणाले
श्री. प्रद्युम्न माने,यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या महत्वाची जाणीव करून देण्यात आली. आपल्या भाषणात त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वप्न मोठी पाहण्यास, सातत्यपूर्ण मेहनत करण्यास आणि अपयशाला घाबरू नका, तर त्यातून शिकण्याचा सल्ला दिला. तसेच, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या मोठ्या संधींचा फायदा घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या गरीब प्रथम प्रवेश घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची ही घोषणा केली.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्व मान्यवर, आयोजक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या नवीन मार्गदर्शन केंद्रामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक नवी दिशा मिळेल
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य अमोल खाडे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफीसर विवेक कुलकर्णी आणि गणेश तुळसणकर, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाला श्री. रवींद्र माने, (अध्यक्ष प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव,) सौ. नेहा माने, (कार्याध्यक्षा, प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव,) श्री. प्रद्युम्न माने, (डायरेक्टर, माने इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी, ) सौ. ईशानी माने, ॲड. राकेश सुनीता तुकाराम सत्वे, (संस्थापक- संचालक, आ.रा.स. अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करिअर, रत्नागिरी), श्री. प्रणव जाधव, (नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक,) साडवली सरपंच श्री. संतोष जाधव, उपसरपंच श्री. अभिजित सप्रे, गटशिक्षणाधिकारी श्री. अशोक मोहिरे, माजी सरपंच श्री. राजू जाधव, श्री. नाना मानकर, (अध्यक्ष, साने गुरुजी विचारमंच, रत्नागिरी) श्री. चंद्रकांत परवडी, (चेअरमन, कुणबी पतसंस्था, रत्नागिरी) श्री. नेताजी कुंभार, (प्राचार्य, अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी,) श्री डॉ. महेश भागवत, प्राचार्य राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी आंबव, श्री. बळवंत नलावडे, मुख्याध्यापक, मीनाताई ठाकरे महाविद्यालय, साडवली, श्री. डोंगरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफीसर, राजेंद्र माने पॉलिटेक्निक, आंबव. आदी मान्यवर उपस्थित होते.



