रत्नागिरी जिल्हा वृत्त

मिरजोळेतील रिक्षाचालकाकडून गांजा सदृश्य अमली पदार्थ जप्त

रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री विरोधी कारवाई हाती घेतली आहे. या कारवाई अंतर्गत गुरुवारी तालुक्यातील मिरजोळे येथे कारवाई करण्यात आली. एका रिक्षा चालकाकडून गांजा सदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अमली पदार्थांना प्रतिबंध व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक, मा. श्री धनंजय कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना दिलेल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार केली. त्यांच्या मार्फत महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालण्याबाबत अधिक सूचना दिल्या होत्या.

दिनांक ३ एप्रिल रोजी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक हे रत्नागिरी शहर परिसरात गस्त घालत असताना मिरजोळे-नाचणकर चाळ, रत्नागिरी परिसरामध्ये एका रिक्षा चालकाच्या संशयित हालचालीवरून त्याच्याकडे चौकशी केली असता सदरचा इसम हा पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी लक्ष्मण रवी नायर (वय 34 वर्ष रा. नाचणकर चाळ मिरजोळे ता.जि. रत्नागिरी) असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिस पथकाने त्याच्या ताब्यातील पिशवी, पंचांसमक्ष तपासून खात्री केली असता त्यामध्ये 477 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ मिळून आला म्हणून त्यास ताब्यात घेण्यात आले तसेच आरोपी लक्ष्मण रवी नायर याचेवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 129/2025 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 22(अ), 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आरोपी नायर याच्याकडून 477 ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ व एक ऑटो रिक्षा (क्रमांक MH08-AQ-1665) असे मिळून एकूण 1,70,000/- हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button