आर्टिकल

कुंदना उर्फ सुचिता सोपटे खुनामागील खरे सूत्रधार पोलिसांनी शोधावेत अन्यथा आम्हाला आंदोलन करून शोधावे लागतील

– कमलताई परुळेकर

सावंतवाडीची अंगणवाडी सेविका कुंदना कावळे उर्फ सुचिता सोपटे हिचा मारेकरी सापडला हे कौतुकास्पद; पण हे हिमनगाचे टोक आहे, असे मला वाटते.

कुंदना माझी अंगणवाडी कर्मचारी सभेची सावंतवाडी तालुकाध्यक्ष होती. धाडशी, शूर, बोलकी आणि चारचौघात शोभून दिसणारी अशी कुंदना आमची काही काळ पतसंस्था संचालकही होती. ती परोपकारी वृत्तीची होती. मागीलवर्षी अंगणवाडीच्या संपात ऑफिसकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर फार दडपण आणले जात होते. तेव्हा तर नोकरी गेली तरी बेहत्तर; पण युनियनशी बेईमानी करणार नाही, असे सांगणारी कुंदना फार कर्तव्यनिष्ठ होती. आझाद मैदानावर मुंबईत होणाऱ्या मोर्चात ती पहिली हजेरी लावायची. मी दिवसभर स्टेजवर न खाता-पिता बसायची हे पाहून कायम मोर्चाचे वेळी मला कोल्ड्रिंक, वेफर्स आणून देऊन ताई डायबेटिक आहात, एवढेतरी पोटात घाला सांगणारी कुंदना अशी कितीतरी रूपे आज आठवतात. ती कोणा एकट्या दुकट्याने मारावी इतकी लेचीपेची नव्हतीच. पण ती कशी फसली, काय झाले हे कोडे उलगडणेची जबाबदारी पोलिसांची आहे.

तिने सोमवार ते बुधवार सुट्टी काढली होती. गुरूवारी हजर होणार, असे मदतनीसला सांगितले होते. त्यामुळेच सोमवारी मिळालेले ओसरगावचे प्रेत तिचे नाहीच अशी मी माझ्या सहकारी भगिनींची समजूत काढत होते. ती त्या कुंभमेळ्यात गेली असेल, चार्जिंग संपले असेल, म्हणून फोन लागत नसेल अशी माझी समजूत होती. मी पोलिसांना पण सांगितले होते की गावात उगाचच चौकश्या करू नका, लोक मग काहीही बोलायला लागतील. ती हजर झाली तर तिचे जगणे मुश्कील होईल. एवढा प्रचंड विश्वास मी बाळगून होते; पण आमचे दुर्दैव. तिचा खून झाला. पैशासाठी ड्रायव्हरने तो केला व त्याने खुनाची कबुलीही दिली हे वाचले. पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठला तोही कमी वेळात, हे कौतुकास्पद आहेच. त्यासाठी पोलीस खात्याचे अभिनंदन करायलाच हवे; पण अजून पोलिसांचे काम संपलेले नाही, असे माझे मत आहे.

पाच हजार रुपये तिला सावंतवाडीत कोणीही मैत्रिणीने दिले असते ते घेण्यासाठी ती कोल्हापूरला का गेली? तिथून परत त्याच दिवशी का परतली? सावंतवाडीत तिला चिक्कार गाड्या भाड्याने मिळाल्याच असत्या, मग वेंगुर्लेची गाडी व ड्रायव्हर तिने का बोलावला? अगदी पहिल्याच दिवसापासून तिच्या कुटुंबीयांना ती जिवंत नसल्याची शंका का येत होती? त्यांना कोणी तशी धमकी दिली होती का? तिने एका सोनसूरे या तिच्या माहेरच्या बाईला ३ लाख रुपये उसने दिले होते. ती ते तगादा लावूनही परत करीत नव्हती. त्यांनी तर काटा नसेल ना काढला? ते पैसे तिने ज्यांच्याकडून उसने घेतले होते, ते सुध्दा वसुलीसाठी तिला त्रास देत होते हे कुटुंबीयांना माहिती होते. ते कोण लोक आहेत? ती काहींच्या सहकार्याने इस्टेट एजंटने काम करीत होती, त्यातून हे काय घडले का?

ओसरगावला रात्री ३ माणसे त्या जागेकडे जाताना काहींनी पाहिली असे पेपरला वाचले. ते तिघे कोण होते? एक टोळके उभे होते ते कोणाचे होते? हे सगळे त्या खुन्याकडून वदवून घेणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. ते त्यांनी लवकरात लवकर शोधले पाहिजे, तरच कुंदनाच्या आत्म्याला शांती लाभणार आहे.

सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मते मिळवली, आता या लाडक्या बहिणींना सुरक्षा देण्याची जबाबदारी कोणाची? पुण्यात एसटी स्टँडवर बलात्कार, मस्साजोग सरपंचाला निर्घृण खून हे सर्व ऐकता, या राज्यात गृहमंत्री झोपलाय का, असा प्रश्न पडतो.

सामान्य माणसाने कसं जगायचं? कुंदनासारख्या घटना ऐकून लोक मुलींना शिकवणे, नोकरी करायला देणे, एकटी फिरणे यावर बंधने आणतील आणि परत एकदा बाईने घराबाहेर पडूच नये अशी मनुवादीकालीन परिस्थिती निर्माण होईल याची भीती वाटते. असो.

आमच्या कुंदना उर्फ सुचिता सोपटेला या खुनामागील खरे सूत्रधार शोधल्यावरच शांती मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व प्रश्नांची उत्तरे शोधावीत, नाहीतर आम्हाला आंदोलन करून ती शोधावी लागतील. माझे सर्व जनतेला आणखी आवाहन आहे की, या प्रकरणात ज्यांना ज्यांना काही माहिती आहे त्यांनी ती पोलिसांना द्यावी. पोलीसांवर विश्वास नसेल तर मला सांगावी, मी पोलिसांना देईन; पण हे प्रकरण एवढ्यावरच मर्यादित नाही. नको त्या चर्चा आपसात करू नयेत. आपण सर्वजण मिळून खऱ्या खुन्यापर्यंत पोचण्यासाठी पोलिसांना मदत करूया. नोकरी सांभाळताना आपला जीवही तेवढाच महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवावे. बाहेर जाताना, गृहभेटी करताना आपल्या जवळच्या व्यक्तीला खरे खरे सांगावे, असे मला वाटते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button