रत्नागिरी शहरात महिलांना मोफत स्वच्छतागृहासाठी मनसे आक्रमक
शहरात भाजी विक्री करणाऱ्या महिलांना शुल्क माफीची मागणी

रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरदेखील रत्नागिरीमधील महिलांना बाथरूमसाठी आडोसा शोधावा लागतोय हे रत्नागिरी नगर पालिका प्रशासनास नक्कीच भूषणावाह नाहीये असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा पालिकेविरोधात आक्रमक झाली आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपाजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, शहर अध्यक्ष बाबय भाटकर यांच्या मार्गदर्शनखाली शहर महिला आघाडीमार्फत नगर पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेत शहरात महिलांना होणाऱ्या गैरसोईचा पाढाच वाचला.

रत्नागिरी शहरांत महिलांसाठी एकही स्वच्छतागृह मोफत नाही आहे. मुळात स्वच्छतागृहच अत्यल्प आहेत आणि जी काही मोजकी आहेत त्यामध्ये शुल्क आकारले जाते. पुरुषांना मोफत आणि महिलांना सशुल्क असा भेदभाव का? असा सवाल देखील मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी विचारला. राम आळीमधील स्वच्छतागृहात शुल्क घेऊन देखील भाजी विक्रेत्या महिलांवर तेथील कर्मचारी अरेरावी करत असल्याची तक्रार असल्याचे देखील यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
यासोबतच रत्नागिरी शहरात ग्रामीण भागातून अनेक महिलांना रोजगार नाही म्हणून रस्त्यावर बसून भाजी किंवा आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. या महिलांना पालिकेकडून २० ते ६० रुपये शुल्क आकारले जाते. सकाळ पासून दुपार पर्यंत उन्हात बसून विक्री करून दोन चारशे रुपये कमवून घर चालवणाऱ्या महिलांकडून ४० ते ६० रुपये रोजचे घेणे हे चुकीचे आहे. हे शुल्क माफ करावे व या महिलांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य झाली तर शेकडो महिलांना दिलासा मिळणार आहे.
थिबा पॅलेस परिसरातील सुर्वे घाटीमध्ये गटाराचे पाणी येऊन दुर्गंधी पसरली आहे त्याबद्दल योग्य कारवाई करून तो परिसर दुर्गंधीमुक्त करावा व जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी महिला शहर अध्यक्ष शुश्मिता सुर्वे, शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ, शहर सचिव संपदा राणा यांच्यासह अन्य महिला महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.



