चाकरमान्यांनी गावाकडे वळावे : सुभाष लाड
हर्दखळे (ता. लांजा) गावातील प्राथमिक शाळेचा अमृत महोत्सवी कार्यक्रम उत्साहात

लांजा : “चाळीस वर्षांपूर्वी गाव मुला-माणसांनी भरलेला होता. शेतीच्या कामासाठी माणसं डोंगरदऱ्या भटकत होती. इथल्या प्राथमिक शाळेतील शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी इथली मुले शहरात गेली ती पुन्हा माघारी फिरली नाहीत. त्यामुळे हळूहळू गावातली घरे बंद पडू लागली. आज पर्यटन स्थळ होईल असे नैसर्गिक वरदान मिळालेल्या हर्दखळे गावात रोजगाराची संधी आहे. त्यासाठी चाकरमान्यांनी पुन्हा गावाकडे वळावे, असे आवाहन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी केले.
तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी डोंगर रांगात असलेल्या हर्दखळे गावातील प्राथमिक शाळेला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने गावातील स्थानिक व मुंबईतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन भव्य स्वरूपात शाळेचा अमृत महोत्सव साजरा केला. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. चाळीस वर्षांपूर्वी याच गावच्या डोलारखिंडीतून पायी चालत शिपोशी गावात असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी गेलो असल्याची आठवण श्री. लाड यांनी ताजी केली.
या महोत्सवासाठी शाळेचे माजी विद्यार्थी व या शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावलेले सर्व शिक्षक एकत्रित आले होते. त्यात अनेकजण वयोवृद्धही होते. सध्या कार्यरत असलेले या शाळेचे मुख्याध्यापक श्री. बंडबे, इतर सर्व शिक्षकांनी तसेच शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रम समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी प्रचंड मेहनत घेऊन कार्यक्रमाचे रेखीव नियोजन केले होते.
शाळेच्या पटांगणात असलेल्या खुल्या व्यासपीठावरती विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे काम केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, लांजाचे गटविकास अधिकारी संतोष मेहत्रे, गटशिक्षण अधिकारी श्री. सावंग,अमृत महोत्सवी समितीचे अध्यक्ष राम शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हर्दखळे गावचे सरपंच गणेश इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला.
शाळेच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने हर्दखळे गावाचा इतिहास, इथले लोकजीवन याची महती सांगणारे गीतकार सुभाष लाड यांनी लिहिलेले व भैरवी जाधव हिने गायलेले ‘माझं गाव हर्दखळे’ या गाण्याच्या ध्वनीचित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. सकाळी गावातील ऐतिहासिक महादेवाच्या मंदिरापासून शाळेपर्यंत पारंपरिक वेशभूषेत शाळेतील मुले, पाहुणेमंडळी आणि ग्रामस्थ यांचा सहभाग असलेली ग्रंथदिंडी काढण्यात आली.

दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात महिलांचे हळदी-कुंकू, मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम, स्मरणिकेचे प्रकाशन, शाळेत सेवा बजावलेल्या शिक्षकांचा सत्कार तसेच कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांच्या गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जयराज मांडवकर यांनी शाळेचा इतिहास समोर ठेवला. कार्यक्रमाचे निवेदन संजय शेलार यांनी केले.



