देश-विदेशमहाराष्ट्र राज्यमुख्य बातमी

कर्करोग उपचारांमध्ये भारत-जर्मन सहकार्य वाढविण्याचे राज्यपालांचे आवाहन

पर्यावरण प्रदूषणामुळेही कर्करोगाचा वाढता धोका : जर्मन व भारतीय कर्करोग संशोधकांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : जर्मनीत स्टेम सेल्स आणि कर्करोग क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी भारतातील नामवंत कर्करोग तज्ञांसह महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची २० फेब्रुवारी रोजी राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

जर्मन कर्करोग संशोधन केंद्र (डीकेएफझेड) येथील स्टेम सेल्स आणि कर्करोग विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि जेनाव्हिंटा हेल्थचे सह-संस्थापक प्रोफेसर डॉ. अँड्रियास ट्रम्प यांनी कर्करोग संशोधनावरील भारत जर्मन प्रकल्प आणि कर्करोग निदान – उपचार क्षेत्रातील उत्साहवर्धक प्रगतीबद्दल राज्यपालांना यावेळी माहिती दिली.

शिष्टमंडळाने भारतात कृत्रिम प्रज्ञा आधारित अचूक कर्करोग निदान विकसित करण्याबाबत यावेळी चर्चा केली.

कर्करोगाच्या निदान व उपचारामध्ये भारत – जर्मन सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन यावेळी राज्यपालांनी केले. कर्करोग केवळ शारीरिकदृष्ट्या प्रभावित करत नाही तर मानसिकदृष्ट्या देखील प्रभावित करतो, असे सांगून राज्यपालांनी जर्मन संशोधकांना त्यांच्या संशोधन सहकार्यात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

भारतात जसजशी ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढेल, तसे कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढेल, असे डॉ. अँड्रियास ट्रम्प यांनी राज्यपालांना सांगितले. कर्करोग निदान आणि नवीन औषधे यांच्यातील प्रगतीमुळे आगामी काळात कर्करोगाच्या उपचारांमध्ये क्रांतिकारक बदल होतील, असे त्यांनी सांगितले.

तंबाखू सेवनाव्यतिरिक्त, पर्यावरणीय प्रदूषण, लठ्ठपणा आणि मद्य सेवन यामुळे देखील कर्करोगाच्या संख्येत वाढ होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रतिबंधात्मक उपाय आणि यथाशीघ्र निदान यामुळे कर्करोगाचे प्रमाण कमी होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. .

यावेळी सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील मेडिकल अँड प्रिसिजन ऑन्कोलॉजीच्या संचालक डॉ. सेवंती लिमये, प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ डॉ. अशोक मेहता, जर्मन कर्करोग संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जेनिफर विशहुसेन, जेनाविंटा हेल्थचे सह-संस्थापक डॉ. शुभंकर सूद आणि फिजिओथेरपिस्ट हेईडी ट्रम्प हे देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button