विद्यार्थ्यांसाठी “छावा” हा चित्रपट ५० टक्के सवलतीने प्रदर्शित करावा
राजापूरचे आमदार किरण सामंत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

राजापूर : शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित “छावा” हा चित्रपट ५० टक्के सवलतीने प्रदर्शित करावा, अशी मागणी राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित “छावा” हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला असून, महाराष्ट्र किंबहुना भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा पैलू चित्रपटाद्वारे मांडण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे नेतृत्व, शौर्य आणि बलिदान तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाबद्दल या चित्रपटाद्वारे जगासमोर दाखविण्यात आली आहे.
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जागरुकता आणण्यासाठी हा चित्रपट ५० टक्के सवलतीने दाखविल्यास शासनाचे महत्त्वाचे योगदान ठरेल. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून, त्यांनी महाराष्ट्र व देशाचा इतिहासात अत्यंत महत्वाचे योगदान दिले असल्याने, त्यांच्या जीवनावर आधारित “छावा” हा हिंदी चित्रपट शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलतीने दाखविणेबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी आमदार सामंत यांनी केली आहे.



