मुलांबरोबरच पालकांवर संस्कार होणे आवश्यक
डॉ. अक्षता सप्रे : संस्कृत भारतीचा संस्कृत उत्सव कार्यक्रम उत्साहात

रत्नागिरी : सध्याच्या आधुनिक युगात संस्कार आणि आरोग्य एकमेकांना पूरक असलेले भाग आहेत त्यामुळेच मुलांना योग्य वळण लावण्याआधी पालकांवर संस्कार होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. अक्षता सप्रे यांनी संस्कृत भारती आयोजित संस्कृतोत्सव कार्यक्रमात केले.
शहरातील भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन रत्नागिरी उपकेंद्र येथे संस्कृत भारतीतर्फे संस्कृत उत्सव हा कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी झाला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीतील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्या डॉ. अक्षता सप्रे उपस्थित होत्या.
आपल्या मनोगतात बोलताना डॉ. सप्रे म्हणाल्या, ज्याप्रमाणे १६ संस्कार आपल्याला परिचित आहेत अगदी त्याप्रमाणे आपल्या अन्नावर संस्कार होणे आवश्यक आहे. आपले मूल नीट वागत नसेल, तर सुरुवातीस पालकांनी आपण कुठे कमी पडतोय याचा विचार करावा. कोरोनानंतर जशी शारीरिक प्रतिकारशक्ती वाढवण्यावर जोर दिला गेला तसा सद्यस्थितीत मानसिक प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. नंतर संस्कृतभारती दक्षिण रत्नागिरी मंत्री अक्षया भागवत यांनी संस्कृतभारतीचा प्रवास व विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. यानंतर श्रीरामनगर नाचणे येथील बाल संस्कार केंद्रातील गार्गी शिंदे, अदिती गद्रे, सिद्धांत मराठे,अन्वेष कौठनकर, स्वरांजली हेगड़े या लहान मुलांनी एक प्रहसनात्मक नाटिका, एक अभिनय गीत व सामूहिक स्तोत्र गायन केले. याचे संयोजन बाल संस्कार केंद्राच्या शिक्षिका रश्मी मराठे यांनी केले होते.
शोध विद्यार्थी कौशल जोशी यांनी एकपात्री प्रयोग सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. यानंतर प्रा. अविनाश चव्हाण यांच्या संचालनानुसार प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यानंतर संस्कृतभारतीचे दक्षिण रत्नागिरी अध्यक्ष डॉ. दिनकर मराठे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्कृत भाषा आणि तिची महत्ता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला संस्कृत विद्यार्थी, संस्कृत शिक्षक आणि संस्कृत प्रेमी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वरूप काणे, तर आभारप्रदर्शन प्रा. कश्मिरा दळी यांनी केले.



