राष्ट्रीय महामार्गाच्या समस्यांसंदर्भात आमदार किरण सामंत यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

नवी दिल्ली : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन संदर्भातील अडीअडचणी आणि समस्यांबाबत तसेच सीआरएफ फंडातून पुलाची कामे प्रस्तावित करण्यासाठी आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली.
यावेळी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरू असणाऱ्या विविध समस्या आणि भूसंपादन संदर्भात आमदार किरण सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी “तात्काळ मार्ग काढू आणि लोकांच्या समस्या सोडून त्यांना न्याय मिळवून देऊ”, असा शब्द आमदार किरण सामंत यांना दिला आहे.

तसेच ज्या ज्या शासकीय विभागातील गाड्या नादुरुस्त त्यांच्या जागेमध्ये बंद पडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या आवारामध्ये अडचण झाली असून त्या नादुरुस्त गाड्यांमुळे परिसरातील सुशोभित केलेली ठिकाणी अस्वच्छ दिसत आहेत. अशा गाड्यांचा लिलाव करणे किंवा स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी आपण निर्णय घ्यावा, असेही आमदार सामंत यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरी यांना सुचविले. विशेष म्हणजे मतदारसंघातील हर्चे बेनगी, कोलघे कांटे, विलये गोवळ पुलांची सीआरएफ फंडातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली असता त्यांनी तात्काळ त्या पुलांच्या फंडासाठी मान्यता दिली आहे. लांजा, राजापूर, साखरपा विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठीही निधीची मागणी यावेळेस करण्यात तसेच रत्नागिरी शहरातील वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक मिनीबसची सुद्धा मागणी यावेळेस आमदार सामंत यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे.
आमदार किरण सामंत यांनी केलेल्या मागण्या मंजूर करणार असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी आभार मानले.



