मुख्य बातमीशैक्षणिक

कोकण बोर्डातून २४ हजार ५४२ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) च्या लेखी परीक्षेला आजपासून (११ फेब्रुवारी) प्रारंभ होणार आहे. ही परीक्षा १८ मार्चपर्यंत चालणार आहे. या परीक्षेसाठी कोकण मंडळातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून २४ हजार ५४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेण्यात येणारी बारावीच्या लेखी परीक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ३८, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अशी एकूण ६१ परीक्षा केंद्रे आहेत. यामध्ये रत्नागिरीतील १६३, तर सिंधुदुर्गमधील ८९ इतकी कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून १६ हजार ५४, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ हजार ४८७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

या परीक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश प्रशासनस्तरावर लागू करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकारान्वये अपर जिल्हादंडाधिकारी जिल्ह्यातील सोबतच्या यादीत नमूद परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात परीक्षेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या दिवशी ११ फेब्रुवारी ते १८ मार्चपर्यंत सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहे.

परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस/ वाहनास प्रवेशास मनाई राहील.

हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांच्याबाबत त्यांचे परीक्षा संबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत. मात्र, त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. या परीक्षेदरम्यान गैरप्रकारांना रोखण्यासाठी कोकण परिक्षा मंडळ स्तरावरून फिरत्या भरारी पथकांची नजर राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button