अशा लाल मातीतआज दिनांक(सदर)

बॅ. नाथ पै आणि राजापूर लोकसभा

देशातील अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचे पडधम वाजू लागले आहेत. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता ही जाहीर झाली आहे. जगातील सर्वाधिक विशाल सार्वभौम लोकशाही देशातील लोकसभेची ही निवडणूक मोदी या नावाभोवती केंद्रित झाली आहे. आपला १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मोदी सरकार पुन्हा येणार की, त्या विरोधात देशात ‘इंडिया’ नावाने एकवटलेला विरोधीपक्ष आपला करिष्म्याची मोहोर उठविणार, हा प्रश्न अनेक लोकशाही मूल्यांच्या आणि संविधान जागराचे विविध पैलू घेत देशाच्या विशाल भूमीवर चर्चिला जात आहे. ५४३ लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या या अफाट, विशाल लोकशाही देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदार संघ जो कोकणच्या राजापूर मततदारसंघापासून सुरू होतो. त्याची चर्चा आणि वारसा हा आजवरच्या प्रत्येक लोकसभा निवडणुकीतले केंद्रबिंदू व सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन झालेला आहे.
राजापूर लोकसभा मतदारसंघ म्हटला की बॅ. नाथ पै यांच्या विद्वत्ता आणि वैभवशाली परंपरा आणि वाटचालीच्या आठवणींचे प्रसंग विवेकवाद आणि आदर्शवादाच्या मूल्याधिष्ठता आणि नैतिक चौकटींची आठवण नव्या पिढीला सतत करून देत रहातात. देशातील लोकसभेचे या मतदारसंघातील खासदार मोरोपंत जोशी यांचा १९५७मध्ये पराभव करत समाजवादी पक्षाचे उमेदवार आंतरराष्ट्रीय समाजवादी युवा परिषदेचे अध्यक्ष नाथ पै बहुमताने निवडून आले. स्वातंत्र्याच्या अत्यानंदी जल्लोषाचा तो काळ. देशाचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू हे देशातील सर्वाधिक लाडके व्यक्तिमत्व. देशातील आणि जगातील तरुणाई नेहरू यांची प्रचंड फॅन होती. आपल्या तेजोमय कर्तृत्वाने, उत्तुंग व्यक्तिमत्वाने लोखोंच्या सभेने सारा देशच जवाहरलालमय झाला होता. येथील बालकांचे ते चाचा नेहरू होते. एक विलक्षण अफाट जनतेचे प्रेम लाभलेला आणि कोणतीही कृत्रिमतेचा लवलेष नसणारा, तुरुंग, आंदोलन आणि स्वातंत्र्य चळवळीतून महात्मा गांधी यांच्या वैचारिक अधिष्ठानातून तयार झालेला नेता अशी त्यांची प्रतिमा, तर त्यांच्यासमोर त्यावेळी तितक्याच वैचारिक प्रगल्भतेने बोलणारे एकमेव व्यक्तिमत्व होते ते म्हणजे बॅ. नाथ पै.
१९६० मध्ये केंद्र सरकारने पाशवी बळाचा वापर करत बॅ. नाथ पै नेतृत्व करत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला. हा संप एक सामाजिक बंडखोरी असल्याचा आक्षेप घेत नेहरूंनी याचा लोकसभेत समाचार घेतला होता. यावेळी लोकसभेत उत्तर देताना बॅ. नाथ पै यांनी नेहरू यांच्या आत्मचरित्रातील एका उताऱ्याचा संदर्भ देत थेट पंतप्रधानांना प्रश्न केला ‘कोणते नेहरू खरे? १९२६ साली इंग्लंडमधील कोळसा कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणारे की, देशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला विरोध करणारे?’ थेट पंतप्रधांनाना प्रश्न करणाऱ्या नाथ पैंना नेहरूंनी कधी काळ्या यादीत टाकले नाही, तर बॅ. नाथ पै यांचे लोकसभेत भाषण सुरू झाले की नेहरू येऊन जाणीवपूर्वक सदनात बसत. एका अतिउच्च लोकशाहीचा वारसा हा या मतदारसंघाच्या आठवणीचा मोठा वसा आहे. बॅ. नाथ पै यांनी राजापूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व तब्बल १५ वर्षें केले. १९५७, १९६२ आणि १९६७ असे तीन वेळा ते मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेतृत्वच बॅ. नाथ पै करत होते. बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्रात समावेश व्हावा यासाठी त्यांनी फार मोठे आंदोलन उभारले, मोर्चे काढले, जेलमध्ये गेले. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये ते इतके भीषण जखमी झाले की त्याचा त्यांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागला. समाजवादी चळवळीतील प्रकांड प्रज्ञावंत म्हणून बॅ. नाथ पै यांची जागतिक पातळीवर नोंद होत असे. त्यांचे अमोघ वक्तृत्वाचे तर अनेक किस्से सांगितले जातात.
२४ मे १९६१ कोकणात प्रचंड वादळ झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो गावांतील घरे उध्वस्त झाली. त्यांची छपरे उडून गेली. त्यावेळी बॅ. नाथ पै परदेशात होते. त्यांना हे वृत्त समजताच त्यांनी संपूर्ण कोकणचा दौरा करत जनतेचे अश्रू पुसण्यासाठी धावून गेले. लोकांना छप्पर उभारण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत जमवत पत्रे दिले. नाथ पै यांची वाट पाहत लोक गावा-गावांतील नाक्यावर जमावाने थांबलेले असत. या प्रत्येकाला भेटत आणि मदतीचा आधार देत नाथ पै जात. याच काळात नाथ पै यांच्या गोवा मुक्ती आंदोलनातून पंतप्रधान नेहरू यांच्या प्रयत्नाने १९ डिसेंबर १९६१ गोवा स्वतंत्र झाला होता. बॅ. नाथ पै हे कोकण आणि देशाचे अत्यंत प्रभावशाली आणि अलोट जनप्रेम लाभलेले नेते होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने तर कोकण ते कारवार आणि महाराष्ट्राच्या गळ्यातील ते ताईत होते. याच काळात देवरूख येथे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा दौरा होता. न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. चव्हाणांना पाहण्यासाठी तोबा गर्दी जमली होती. इकडे देवरूखमध्ये बाबासाहेब आंबेडकर हॉलला बॅ. नाथ पै यांची सभा होती. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उतरले आणि त्यांच्या कार्यक्रमाच्या स्थळी गेले; मात्र तेथे फारच कमी उपस्थिती, तर मैदानावर विमान पाहण्यासाठी जमलेली तमाम जनता बॅ. नाथ पै यांचे भाषण ऐकण्यासाठी आंबेडकर हॉलमध्ये जमलेली. असा नेता असे लोक आणि असे त्यांचे नेत्यावरील विलक्षण प्रेम हे या मतदारसंघातील एक वैशिष्ठ्य आणि प्रगल्भ परंपरेचे द्योतक आहे.

– अभिजित हेगशेट्ये
Email : abhijit.shriram@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button