मागील वर्षी कोकण रेल्वेला ३०१ कोटींचा विक्रमी नफा : कोकण रेल्वेचे चेअरमन संतोष कुमार झा
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीला दादरपर्यंत नेण्यासंदर्भात मध्य रेल्वेशी चर्चा सुरू

रत्नागिरी : कोकण रेल्वेने मागील आर्थिक वर्षात विक्रमी ३०१ कोटी रुपयांचा नफा कमावला असून, मागील आर्थिक वर्षात ४०७० कोटींची उलाढाल केली आहे.भविष्यात आणखी मोठे प्रकल्प हाती घेतल्याची माहिती कोकण रेल्वेचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी सांगितले. रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीला दादरपर्यंत नेण्यात कोणतीही अडचण नाही, असे सांगतानाच मध्य रेल्वेसोबत या संदर्भात चर्चा सुरू असून, लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोकण रेल्वेच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज (३ फेब्रुवारी) एक स्नेह भेट आयोजित केली होती. यावेळी कोकण रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड च मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर, मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, प्रधान मुख्य अभियंता नाग दत्त उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना चेअरमन संतोषकुमार झा यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन प्रॉफिटमध्ये असल्याचे सांगितले. वाहतूक आणि सिव्हिल प्रोजेक्ट्स ही दोन महत्त्वाची क्षेत्रे आहेत, ज्या माध्यमातून कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उधमपूर ते श्रीनगर हा कोकण रेल्वेसाठी ड्रीम प्रोजेक्ट होता. हा ड्रीम प्रोजेक्ट कोकण रेल्वेने यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, त्याचा सार्थ अभिमान आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे रेल्वेच्या कार्यक्षमतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या मार्गावर १६ बोगदे आणि २२ पूल कोकण रेल्वेने बांधले असून, हे इंजिनिअरिंग क्षेत्रातील एक मोठे यश मानले जात आहे, अशी माहिती झा यांनी यावेळी दिली.
कोकण रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून, यामुळे डिझेलवरील अवलंबन संपुष्टात आले आहे. परिणामी, डिझेलवर होणाऱ्या खर्चात १९० कोटी रुपयांची बचत झाली असल्याची माहिती झा यांनी दिली. हे विद्युतीकरण पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर-मडगांव ही स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला असून, लवकरच त्यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संगमेश्वर येथील प्रवाशांनी इतर गाड्यांच्या थांब्याची मागणी केली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव पाठवला असून, अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या स्तरावर घेतला जाईल, असे झा यांनी सांगितले.
कोकण रेल्वेने विक्रमी नफा कमावत देशभरात रेल्वे क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भविष्यात आणखी नवीन प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत आहे, असे शेवटी ते म्हणाले.



