अशा लाल मातीतसाहित्य-कला

मैं इतना खामोंश क्यूं!

– अभिजीत हेगशेट्ये 

हर एक कोने में, हर एक कण में है, लहू का सुराग!

टपक रहा है, लहू आस्तिने कातील सें,

झलक रहा है, अभी खौफ चरम बिस्मिल सें

हर एक कोने मे , हर एक कण में, है लहू का सुराग!

ज्येष्ठ अभिनेता नसरुद्दीन शहा यांचा धीरगंभीर, खर्र्या आवाज काळीज छेदत जातो. एक एक शब्द उच्चरताना त्या शब्दांच्या गर्भात दडलेला अर्थ संदर्भासह अगदी निगुतीने आपल्या अंतरंगता प्रकट होत जात आहे अशी विलक्षण उच्चारशैली, नाट्यगृहात एक अनवट उत्कंठात्मक शांतता, स्पॅाटलाईटच्या प्रकाशात नसरुद्दीन शहा यांचा चेहरा, एक मानवतेचा, पारदर्शक विचार घेऊन समोर आलेला. भवरीच्या वेदनेची, हुंकाराची, तगमगीची, संघर्षाची आणि परिवर्तनाची कहाणी घेऊन आलेला.

एक विलक्षण आगळा प्रयोग त्यातही आम्हा रत्नागिरीकरांसाठी तर हे असे काय? अवचित अचंबित… सिनेमातील थरारक प्रसंगाचे वास्तव शोधण्याच्या मुडमध्ये पार झकपक, सो कॅाल्ड सोफेस्टिकेटेड… अचानक किटींच्या चर्चांना गांभीर्यांच्या सीमेपार भिरकावून देणारे, भरत जाधव आणि डेली एपिसोडला तब्बल चार-चार वेळा अगेन अँड अगेन वन्समोअर देणारे… मागे पुढे पहात आहोत. सारेच चुप्प… जणू समोरच्या गंभीरतेने आवाजच गोठलेले… कोणत्या काळात कोणते??? काय चालले आहे.. इस्मत आपा… सदाअत हसन मंटो????

नसीरुद्दीन पुढे जात रहातात..

हमारा अजीज मुल्क सदियोंसे, जात पात मर्दांना बदमडी

नाइन्साफी, और रस्म रिवाजमें अंधे झोके खा रहा है !!!

राजस्थानच्या भवरी देवीची दास्तांए, कथा ते पेश करत जातात… या कथेत ते आजच्या वास्तवाला सोबत घेऊन जात राहतात… त्यात १९७२ ची मथूरा येते, हैद्राबादची रझिमा येते, गुजरातची बिल्कीस बानो येते , दिल्लीची निर्भया येते…अशा अनगिनत… महिला अत्याचारांच्या क्रूर कथांचे संदर्भ देशाच्या चुप्पी धरलेल्या मानसिकतेच्या वेदना उलगड जातात. आणि त्यांनतर त्यांचे वगैरा ऽऽऽ वगैरा ऽऽऽऽ हे उच्चारण इतक्या जबरदस्त ताकदीचे होते की जणू अंतराळून एक अनाकलनीय अजब आवाज ही दास्तांए घेऊन आपल्यासाठी येथे उतरला आहे. आजही हा वगैरा ऽऽऽ शब्दउच्चारण माझ्या कानात या वेदनांचे प्रहार करत आहे. ही कंपने पार हृदय भेदून जात आहेत.

शब्दांची ताकद, त्याचे अर्थ आणि थेट अंतर्मनाला हादरविणारा त्याचा लहेजा याचा इतक्या शक्तीशाली अनुभव पहिल्यांदाच मिळाला. सावरकर नाट्यगृहातील पूर्ण रिकामा रंगमंच, नाही कोठे पडदा, नाही कोठे महेरपी… थेट रोजच्या जगण्याच्या रंगमंचा सारखाच… फक्त एक पोडीयम, शेजारी एक छोटे टेबल त्यावर पाण्याचा जग आणि ग्लास. बस इतकंच…

”एक दास्तां एक हकीगत” ऐकताना थेट ४०-५० वर्षांपूर्वीच्या कोकणातील जुन्या घरांतील माजघरांतील सायंकाळी दिवेलागणीच्या वेळेची आठवण झाली. वीजेचे कनेक्शन नव्हते. सायंकाळी कंदील लावून अंधार दूर करत प्रकाशाचे स्वागत व्हायचे. टीव्ही तर नव्हताच, गाई-गुरे वाड्यात रवंथ करत. पक्षी आणि माणसेही आपल्या घराकडे आलेली असत. लहान मुले आजीच्या भोवती जमा होत आणि आजी त्यांना रामायण, महाभारत, श्रावण बाळ, शिवाजी महाराज आणि अशा अनेक कथा सांगत राही. या प्रत्येक कथेत कथानक विचार देणारे आदर्श देणारे, नियम, शिस्त, चारित्र्य, नैतिकता याचे मार्गदर्शन देणारे, कुटुंब घराणे त्याची प्रतिष्ठा, परंपरा, इतिहास सांगणारे बाळकडूच होते. आज आजी टीव्हीवरील मालिकांत गुंग राहते.

दास्तानगोई शैली या हजारो वर्षांपूर्वीचा मानवी जगण्याचा वारसा परंपरा आहे. मानवाच्या विकसित परंपरेत गोष्ट, कथा हे मानवी जीवनशैलीचे विशेषत्व आहे. गोष्ट सांगणे आणि ती ऐकणे या आविष्कारालाच दास्तान शैली म्हणता. दास्तान म्हणजे गोष्ट आणि गोई म्हणजे सांगणे हे दोन्ही फारसी शब्द आहेत. १३ व्या शतकातील ही परंपरा आपल्याकडे हजारो पारसी शब्दांसोबत शेकडो वर्ष आणि त्याही पूर्वीपासून आहे. इसापनीतीच्या गोष्टी आणि अगदी अलिकडच्या काळात सानेगुरुजींच्या श्यामच्या आईपासून महात्मा गांधी यांच्या ब­ल सांगितलेल्या छोट्या गोष्टी…

यावेळी रत्ना पाठक-शाह यांनी सादर केलेली दास्ताए अत्यंत प्रभावी होती. अकबर आणि अशोक या हिंदू आणि मुलमान असणाऱ्या (इत्तफाक) मित्रांची कथा त्यांचा धर्म, जात, पंथ नसलेला आजाद मुलांचे आजच्या समाजातील असणारे वास्तव आणि बाबरी मशिदनंतर समाजाची आजची मानसिकता ही कथा तर आजच्या दुभंगल्या आणि दुभंगवल्या जाणाऱ्या सामाजिक वास्तवाचे जळजळीत वास्तव… प्रत्येक शब्दागणीक मन अस्वस्थ करत होती.

दीप्ती, नितीन कानविंदे आणि आर्ट सर्कल परिवार यांचे आभार मानण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत. कणकवलीच्या बॅ. नाथ पै एकांकीका चळवळीची आठवण दीप्तीने करून दिली. (वामन पंडित यांच्या कार्याचा सन्मान नुकताच महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) पुरस्काराने पुणे येथे झाला) वामन पंडितांच्या नाट्य चळवळीने कणकवलीकरांची अभिरुची बदलली. तशी रत्नागिरीकरांचीही बदलली आहेच की. एक काळ होता खुल्या नाट्यगृहात रत्नागिरीकर नाट्यरसिक नाट्य प्रेमी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. प्र. ल. मयेकर यांच्या रत्नागिरी वास्तव्यात या रुचीला सामाजिक आणि वैचारिक धार येणे अपेक्षित होते; मात्र गेल्या २०-२५ वर्षांत ही चळवळ आणि विचारधारा आर्थिक आणि राजकियतेची बटीक झाली. जेष्ट सामाजिक, प्रायोगिक नाट्य आणि अन्य कलाकारांना आज रत्नागिरीत आणण्याचे धाडस होत नाही. समोर प्रेक्षक असेल का? ही भीती असते. या वातावरणात आर्ट सर्कलचे हे धाडस विषेश कौतुकाचे आहे.

तरीही अस्वस्थता संपूर्ण प्रयोगभर ग्रासून होती. सभोवताल ही अस्वस्थ जाणवत होता. काहीतरी मनामनात आक्रंदत आहे असे जाणवत होते. निदा फाजली, फैज अहमद फैज… अश्या एक एका शेरो शायरीची पेशकश होत होती…. तरीही ही शांतता…

”कैसे आकाश में सुराख हो नही हो सकता,

एक पथ्थर तो तबियत से उछालो  यारो!!

दुष्यंत कुमार यांचा शेर नसरुद्दीन शहा यांनी अशा जोशभऱ्या आवाजात पेश केला की पार आंतून पेटून उठलो; मात्र तरीही माझ्या हाताची टाळी वाजली नाही… की तोंडातून वा… इर्शाद… शब्द उमटला नाही. सारे प्रक्षागृह ही शांत , स्तब्ध… का? ही शांतता का? मैं इतना खामोंश क्यू? मला प्रश्न पडत राहिला अगदी नाट्यगृहाबाबेर पडेपर्यंत…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button