मुख्य बातमी

भू, खिणगिणी भागातील त्या सर्व शेतकऱ्यांना फळपिक विम्याचा परतावा मिळणार : राजेश सावंत

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्न व पाठपुराव्याला यश

राजापूर : हवा मापन यंत्रणांतील दोष व तालुक्या बाहेरील कार्यक्षेत्रात हवा मापन यंत्रावर मोजमाप झाल्याने फळ पिक विमा परताव्यापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील भू, खिणगिणी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना ही फळपिक विमा परताव्याची रक्कम संबधित कंपनीकडून देण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे.

यासाठी स्थानिक शेतकरी यांनी शासन स्तरावर व लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन पाठपुरावा केला होता. तर अनेक शेतकऱ्यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे लेखी पत्र देऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर खा. राणे यांनी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून ही रक्कम शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतल्याने आता शासनाकडून फळ पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत संबधित कंपनीला आदेश देण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले. शेतकरी व लोकप्रतिनिधी यांच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे सावंत यांनी नमूद केले. २९ जानेवारी रोजी राजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

विभागस्तरीय तक्रार निवारण समिती तथा कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. यांचेकडून विमा परतावा रक्कम या सर्व शेतकऱ्यांना अदा करण्यात यावी असा आदेश दिला आहे. त्यामुळे राजापूर तालुक्यातील भू पंचक्रोशी विकास समिती व भू परिसरातील शेतकऱ्यांनी विमा मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसामुळे तालुक्यातील भू-खिणगिणी-कोतापूर- पेंडखळे, दसूर परिसरातील आंबा-काजू बागायदारांचे यंदा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या बागांचा विमा उतरविण्यात आलेला असतानाही लाभ मिळालेला नाही. या परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक बागायतारांना याचा फटका बसलेला आहे. भू मंडळामध्ये एका भू विकास सोसायटीकडून शेतकऱ्यांना सुमारे सव्वादोन कोटी रक्कम मिळणे बाकी आहे. याची तक्रार जिल्हाधिकाकारी यांच्याकडे नोंदविण्यात आली होती. तर भू परिसरातील शेतकरी व भू विकास सोसायटी पदाधकाऱ्यांनी खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, जिल्हा कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांची भेट घेत याबाबत निवेदन दिली होती. याबाबत खा. राणे यांनी देखील शासनस्तरावर पत्र देऊन शासनाचे लक्ष वेधले होते. शेतकरी, लोकप्रतिनिधी यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

फळ पिक विम्याचा परतावा न मिळाल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाला असून कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी संबधित सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशा ओदश दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे त्वरित या परिसरातील शेतकऱ्यांना महसूली निकषानुसार शासनाने पीक विमा नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ द्यावी अशी मागणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button