नवनिर्माण हायमध्ये रांगोळी, मेहेंदी स्पर्धा उत्साहात

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालकांसाठी रांगोळी आणि मेहेंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.



रांगोळी स्पर्धेत कीर्ती माणगावकर यांनी प्रथम, अंजली सावंत यांनी द्वितीय आणि स्वरा कुळ्ये यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मेहेंदी स्पर्धेत सोनम खैरमोडे यांनी प्रथम, नीता भोंडे यांनी द्वितीय तर राधिका पंजाबी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.


नवनिर्माण हायच्या वतीने मुलांबरोबरच पालकांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. पालकांनाही शाळेच्या विविध उपक्रमांत सहभागी करून घेत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा, व्यासपीठ देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो.


याच हेतूने शाळेत रांगोळी स्पर्धा मेहेंदी स्पर्धा घेण्यात आली. यात काढलेल्या रांगोळ्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या रांगोळ्यांमधून “बेटी बचाव बेटी पढाओ”, “हिंसाचार थांबवा, तिला न्याय द्या”, तसेच मोबाईलच्या आहारी जाऊ नका, असे सामाजिक संदेश ही देण्यात आले.


या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्पर्धेनंतर लगेचच पार पडले. यावेळी नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. निकिता नलावडे, प्रा. श्रेया राऊत, संस्थेच्या संचालिका सौ. सीमा हेगशेट्ये, शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अरविंद पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.



