मुख्य बातमी

द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर 

पत्रकार सन्मान - दुर्गेश आखाडे, तर पत्रकार भूषण- कोमल कुळकर्णी- कळंबटे

रत्नागिरी : द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार दैनिक “सामना”चे पत्रकार दुर्गेश आखाडे आणि पत्रकार भूषण पुरस्कार “कोंकण दिनांक” डिजिटल प्लॅटफॉर्मच्या कोमल कुळकर्णी- कळंबटे यांना जाहीर झाला आहे. दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या सभागृहात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे पत्रकार पुरस्कार वितरणाचे हे चौथे वर्ष आहे. द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष सिध्देश मराठे, तालुका उपाध्यक्ष सचिन सावंत आणि कार्यकारिणी सदस्य नरेश पांचाळ यांच्या निवड समितीने पुरस्कारांची निवड केली.

दुर्गेश आखाडे

यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार दुर्गेश आखाडे यांना जाहीर झाला आहे. दुर्गेश आखाडे गेली २५ वर्ष पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्यांचा ‘अधिक अधिक वजा’ हे बालनाट्याचे पुस्तक आणि ‘श्रीमान’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच त्यांचा ‘प्र.ल.’ हा लघुपट सह्याद्री वाहिनीवरून पाच वेळा प्रसारित झाला आहे. त्यांना भागोजी ट्रस्ट मुंबईचा पत्रकारिता विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.

कोमल कुळकर्णी- कळंबटे

पत्रकार भूषण पुरस्कार “कोंकण दिनांक” डिजिटल प्लॅटफॉर्मच्या कोमल कुळकर्णी- कळंबटे यांना जाहीर झाला आहे. गेली १७ वर्ष त्या पत्रकारितेत कार्यरत आहेत. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या विविध कार्यक्रमासाठी त्या २०१२ पासून लेखन करत आहेत. २०१४-१५ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार त्यांना मिळाला असून, रत्नागिरी नगर परिषदेचा उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. २०१६-१७ चा राजमाता जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे २०२१-२०२२ चा पत्रकार भूषण गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

या पुरस्कार वितरणाला उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी उपस्थित रहाणार आहे.

स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? या विषयावर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थीदशेत मुलांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी या उद्देशाने द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन दक्षिण रत्नागिरी हा व्याख्यानाचा उपक्रम राबवत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button