मुख्य बातमी

थिबा पॅलेस वृक्ष तोडप्रकरणी मनसे आक्रमक 

कारवाई न केल्यास बुधवारी मनसे स्टाईल कारवाई चा इशारा

रत्नागिरी : थिबा पॅलेस परिसरात खासगी विकासकामार्फत कामे सुरू केले आहे. या जागेवर आरक्षण आहे तो विषय वेगळाच पण हरित पट्टा असलेल्या जागेतील झाडे तोडीची परवानगी कोणी व कशी दिली? यावर बोट ठेवत रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विरोधात दंड थोपाटले आहेत.

याबाबत प्रशासक तुषार बाबर यांना जाब विचारताना म्हटले आहे की, थिबा राजावाडा ते थिबा पाईंट यादरम्यान निसर्गसौंदर्य संपन्न असलेल्या परिसरात एका खासगी विकासकाने विकासक बांधकाम उद्देशाने हरित पट्टा आरक्षित असलेल्या भागातील अनेक दुर्मिळ वृक्षाची बेसूमार कत्तल केली आहे. ही कत्तल कोणाच्या परवानगीने झाली? यासाठी आपणास अवगत केले होते का? हा प्रकार कोणाला दिसू नये म्हणून ह परिसर पत्रे लावून बंदिस्त केला आहे. कोणाच्या परवानगीने हा निसर्गसंपन्न परिसर बंदिस्त केला आहे. समस्त रत्नागिरीकर व येणाऱ्या पर्यटकांसाठी पर्वणी असलेला हा परिसर का बंदिस्त केला गेला, असे अनेक सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केले आहेत. जगप्रसिद्ध थिबा राजावाडा, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आदींसह अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या परिसरातील वृक्ष कत्तली एकही अधिकारी किंवा नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येऊ नये, हे आश्चर्य आहे.

हा सगळा प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही. ही सर्व कामे थांबवून सर्व पत्रे हटवून तो परिसर पुन्हा मोकळा केला पाहिजे. तसेच जेवढी वृक्षतोड झाली आहे, त्यांची शासन नियमाप्रमाणे दंड आकारणी व तात्काळ वसुली तत्काळ झाली पाहिजे, अन्यथा येणाऱ्या बुधवारी (८ जानेवारी) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने ते पत्रे हटवून तो परिसर रिकामा करेल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, रूपेश चव्हाण, सतीश खामकर, गजानन आहिर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button