मुख्य बातमी

केंद्रीय अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत उद्या सर्वपक्षीय निदर्शने

रत्नागिरी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याब‌द्दल अपमानास्पद उद्‌गार काढले. डॉ. आंबेडकर यांच्या झालेल्या अपमानाब‌द्दल अखंड देशामध्ये निषेध आंदोलने सुरू आहेत. या अनुषंगाने २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथे मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध निदर्शने केली जाणार आहे. या आंदोलनास रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वपक्षीय आंबेडकरवादी बंधू-भगिनींनी स्वयं प्रेरणेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून लोकशाही वाचविण्यास योगदान द्यावे, असे आवाहन सर्व पक्षीय आंबेडकरवादी आयोजक नेत्यांकडून करण्यात आले आहे.

या संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व पक्षीय आंबेडकरवादी विचारांच्या प्रमुख कार्यकत्यांची बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, रत्नागिरी येथे २२ डिसेंबर रोजी झाली. या बैठकीला रत्नागिरीतीलील सर्व पक्षीय आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती. बैठकीचे अध्यक्षस्थान एल. व्ही. पवार यांनी भूषविले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेत जाहीर अवमान करणाऱ्या अमित शहा यांनी तात्काळ गृह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा असा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. अमित शहा यांनी तमाम भारतीयांना विषमतेच्या नरकातून बाहेर काढून लोकशाहीच्या सर्वांग सुंदर स्वर्गात आणणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच अपमान केला नाही, तर प्रत्येक लोकशाहीवादी, समतावादी भारतीयांच्या अस्मितेचा अवमान केलेला आहे. या विरोधात २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथे मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेध निदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनास रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्वपक्षीय आंबेडकरवादी प्रत्येक घरामधील बंधू-भगिनींनी आपल्या राष्ट्र निर्मात्या बापाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी स्वयं प्रेरणेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकशाही वाचविण्यास योगदान द्यावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश अध्यक्ष एल. व्ही. पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव राजेंद्र आयरे, माजी आमदार बाळ माने, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य बशीर मूर्तुझा, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी, ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते बी. के. पालकर,

समाज सेवा संघाचे अध्यक्ष रघुवीर शेलार, भारत मुक्ती मोर्चाचे अशोक भाटकर, भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य शिवराम कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नीलेश भोसले, ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख, प्रशांत साळुंखे, बौध्द विकास संघाचे पावस विभाग अध्यक्ष प्रकाश पवार, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, भीम युवा पँथरचे रत्नागिरी अध्यक्ष अमोल जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button